Tuesday, December 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

कॉंग्रेस ची अवस्था जुन्या जमीनदारासारखी?

घराणेशाही आणि एकाधिकारशाही यांचा अनिष्ट संगम असलेला पक्ष म्हणून कॉंग्रेसची ख्याती आहे. बिगरभाजपवादी पक्ष कॉंग्रेसच्या बुडत्या जहाजातून प्रवास करण्यास तयार नाहीत. कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला घराणेशाहीचा मोह सुटत नाही. बहुतांश घटकराज्यांत भाजपची किंवा भाजपप्रणीत राज्य सरकारं असल्यामुळे राज्यपातळीवरील पक्षसंघटना डबघाईला आलेली आहे. आहेत त्या नेत्या-कार्यकर्त्यांत सुसंवाद नाही, अशा परिस्थितीत २५ वर्षांपूर्वी २८८ पैकी २०० आमदार असलेला कॉंग्रेस पक्ष आज केवळ ४४ आमदारांवर आलेला आहे. तरीही कॉंग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे सातत्याने सांगणारे नाना पटोले ह्यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेसच्या नशिबी राज्यात फरफटत जाणे एवढेच आहे. ह्या फरफटीला अधिकच गती दिली ती तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी.


कहा है युपीए? यूपीए आता उरली नाही, असा जबरी टोला ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्र भेटी दरम्यान लगावला. त्यामुळे महाराष्ट्रात उरल्या सुरल्या कॉंग्रेसच्या खेम्यात वळू घुसल्याचा भाव आहे. त्याची धग दिल्ली पर्यंत पोहोचली. विशेष म्हणजे यूपीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या समक्ष दीदींचे हे वक्तव्य असल्याने ‘युपीए नाही म्हणजे सोनिया गांधी अध्यक्ष नाहीत’ हयावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे येत्या निवडणुकीत ममता बॅनर्जी आणि शरद पवार एकत्र येऊन आघाडी स्थापन करणार आणि कॉंग्रेसला ‘खिंडीत गाठणार’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपविरोधात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए ऐवजी गोळा होऊ शकणार्‍या पक्षांचा नवा पर्याय देण्याचे संकेत आहेत.
ममता ह्यांनी ‘जय मराठा, जय बांगला’चा नारा दिला. त्यांच्या या नार्‍यामुळे आगामी काळात ‘मराठी राजकारण की मराठा राजकारणी’ घेऊन दीदी पुढे जाणार, ह्याची खुमासदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रीय राजकारणात पवारांच्या नेतृत्वात तिसरी आघाडी ही पटकथा अनेकदा लिहिण्याचा प्रयत्न पवारांनी केला होता. मात्र, दरवेळी त्यांच्या ‘फडात कोल्हा शिरलेला’ असायचा. दिल्लीचे तख्त काबीज करण्याच्या पवारांच्या क्लृप्त्या दरवेळी बिरबलाची खिचडी ठरल्या. राजकीय समीकरणे बदलली की, पवार एका पायावर तयार होऊन भूमिका बदलत असतात. त्यामुळे दीदींच्या कहा है युपीए वर मौन बाळगत भाजपला पर्याय आणि लोकांचा ज्यांच्यावर विश्वास आहे, अशा मार्गाने आम्ही जाऊ असे शरद पवार म्हणाले ते उगीच नाही. अर्थात, कॉंग्रेस हा भाजपला पर्याय नाही आणि लोकांचा सोनिया राहुल ह्यांच्यावर विश्वास नाही, इतके ठळक विधान पवारांनी ह्यावेळी केले आहे. त्यामुळे बिटवीन लाईन वाचण्याची गरजच पडली नाही.
ममता दिदींच्या वक्त्यव्यावर कॉंग्रेसने मिळमिळीत प्रतिक्रिया दिली. त्याचा फार काही गाजावाजा झाला नाही. ममता ह्या भाजपच्या ईशा-यावर सर्व करताहेत, हा ठेवणीतला आरोप झाला. परंतु तो काही वाजला नाही. मुळात पवार आणि ममता ह्या कॉंग्रेसच्याच बायप्रॉडक्ट आहेत. कॉंग्रेसने राजीव गांधी यांच्या हत्येनंतर नरसिंह राव यांचं नेतृत्व पुढे आणलं. सीताराम केसरी यांनी काही काळ नेतृत्व केलं. मात्र, कॉंग्रेसला गांधी घराण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे याच गरजेतून उदय झाला तो सोनिया गांधी यांचा. १९९६ पासून आलेल्या तीनही सरकारांमध्ये कॉंग्रेसला सत्तेपासून बाहेरच राहावं लागलं होतं. मार्च १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात दुसर्‍यांदा सत्तेत आलेलं ‘एनडीए’चं सरकार जयललितांनी पाठिंबा काढल्यानं एका मतानं पडलं आणि त्यानंतर कॉंग्रेसमधल्या नाट्याला सुरुवात झाली. या नाट्याच्या केंद्रस्थानी होते शरद पवार. वाजपेयी सरकार जाण्याच्या एक वर्ष अगोदर १९९८ मध्ये कॉंग्रेसच्या अध्यक्षा बनलेल्या सोनिया गांधींनी सरकार स्थापनेचा दावा केला. पण, मुलायमसिंह यादवांनी सोनियांच्या विदेशी असण्याचा मुद्दा पुढे करत कॉंग्रेसला पाठिंबा देण्याचं नाकारलं. सोनियांच्या पंतप्रधान होण्याच्या शक्यतेला आक्षेप घेतला, स्पष्ट विरोध केला. त्यानंतर कॉंग्रेसमध्ये फूट पडली.
शरद पवारांसारख्या नेत्याला कॉंग्रेसमधून काढून टाकण्यात आलं. त्याआधी ममता बॅनर्जी यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडत तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली. १९९९ मध्ये शरद पवारांनी एक पत्र सीडब्ल्यूसी ला पाठवलं होतं त्यावेळी सोनिया गांधींच्या बाजूने बहुमत होतं. त्यामुळे तारीक अन्वर, शरद पवार, पी. ए. संगमा यांना काढून टाकण्यात आलं होतं. शरद पवारांचं कॉंग्रेसमधलं दुसरं बंड आणि त्या बंडाचं अपत्य म्हणून ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’ची स्थापना आणि दुसरं म्हणजे, ‘हिंदुत्वा’च्या धाग्यानं बांधल्या गेलेल्या भाजपा-शिवसेना ‘युती’च्या सरकारचा पराभव होणं आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सोयरिक होऊन पुढच्या पंधरा वर्षांसाठी ‘आघाडी’चं सरकार महाराष्ट्रात येणं ह्या १९९९ मधल्या ठळक घडामोडी होत्या.
शरद पवारांनी श्रीमंत मराठ्यांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष स्थापन केला. त्याला तशी विशिष्ट कारणे होती. १९९५-९९ या काळात दक्षिण महाराष्ट्रातली साखर कारखानदारी धोक्यात आली होती. भाजपा-सेना युतीने त्या दृष्टीने आपला हातभारही लावला. साखर कारखान्यांची चौकशी करणे, निवडणूक पद्धती बदलणे, अशा अनेक धोरणांमुळे कारखानदारांच्या हितसंबंधांना धोका पोहोचला. शिवसेनेत ४५ मराठा आमदार असूनही सत्तेची सूत्रं मराठा नेतृत्वाकडे नव्हती. ग्रामीण भागातील श्रीमंत शेतकरी जातीही अस्वस्थ होत्या. मराठा जातींतली ही फूट शिवसेनेला फायदेशीर ठरत होती. महाराष्ट्राच्या बदलत्या अर्थव्यवस्थेत शेतकरी जातींचं महत्त्व कमी होऊ लागलं होतं. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी सोनिया गांधींना विरोध करत १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यामुळे शहरी मध्यमवर्ग आणि श्रीमंत शेतकरी यांचा एकत्र येण्याचा मार्ग खुला झाला. १९९९ मधलं शरद पवारांचं बंड श्रीमंत मराठा शेतकर्‍यांचे आणि निमशहरी भागातल्या शेतकरी जातींचे हितसंबंध जपण्यासाठी होते. श्रीमंत शेतकर्‍यांना जागतिक बाजारपेठेत उभं करणे, त्यासाठी लागणारी साधने राज्याने पुरवणे, १९६० सालापासून शेतीक्षेत्रातून मिळालेला नफा नवीन अर्थव्यवस्थेत गुंतवण्याकरता राज्याकडून नवी क्षेत्रे खुली करणे वगैरे बाबी साध्य करण्याप्रमाणेच शेतीक्षेत्राचा कमी होत जाणारा राज्य उत्पन्नातील वाटा, सेवाक्षेत्राचा वाढता विस्तार आदी बाबीही राष्ट्रवादीच्या स्थापनेत महत्त्वाच्या ठरल्या. नुकतीच ममता ह्यांनी ‘जय मराठा, जय बांगला’चा दिलेला नारा हा राष्ट्रवादीच्या स्थापनेचा आणि मूळ जनाधाराला फुंकर घालणारा आहे.
राष्ट्रमंच ने केली राष्ट्रवादीची गोची!
भाजपविरोधात शरद पवार यांनी विरोधकांना एकत्र करण्यासाठी तिसरी आघाडी उभी करण्याची सुरुवात केली, असा प्रचार सुरू झाला होता. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी तिस-या आघाडीसाठी २२ जून २०२१ रोजी बैठक आयोजित केली असा गाजावाजा झाला. त्या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल कॉंग्रेस, आरजेडी, राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षाचे नेते आणि काही पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.हया बैठकीचा पॉलिटिकल मायलेज घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला. तथापि, भाजपविरोधात शरद पवार यांनी विरोधकांना एकत्र करण्यासाठी बोलवली ही चुकीची माहिती आहे. ही राष्ट्र मंचची बैठक होती, असे स्पष्टीकरण माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केल्याने राष्ट्रवादीची गोची झाली होती.
विरोधी पक्ष एकत्र येत तिसरी आघाडी उघडणार ही शक्यता यशवंत सिन्हा आणि माजिद मेमन यांनी फेटाळली होती. ही बैठक राष्ट्रमंचची आहे, तिसर्‍या आघाडीची नाही, असं स्पष्ट करण्यात आलं, त्यामुळे पवारांच्या निमंत्रणात राष्ट्रीय राजकारणात (सोशल मीडियात राष्ट्रवादीने रंगविलेली) तिसरी आघाडी उभी झाली, ह्याला टाचणी लागली. मंगल कार्यालयात आयोजित इतरांचे लग्न हे मंगल कार्यालयाच्या मालकाच्या घरचे नसते, तर मंगल कार्यालय भाड्याने दिलेले असते म्हणून पत्रिकेवर मंगल कार्यालयाचा पत्ता असतो.


कॉंग्रेस ची अवस्था जुन्या जमीनदारासारखी?
कॉंग्रेसची अवस्था नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी झाली आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं होतं. आजच्या कॉंग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या कॉंग्रेसची झाली आहे, असं पवार म्हणाले होते. हा आरोप कॉंग्रेसने देखील मनावर घेतला नव्हता. नाना पटोले ह्यांचे एक वक्तव्य वगळता कॉंग्रेस मध्ये सर्व सामसूम होती. नाना पटोले हेच भाजपात जाऊन आल्याने त्यांना कॉंग्रेसची नेते मंडळीदेखील दखलपात्र समजत नाहीत. पवार मात्र प्रमाणपत्र वाटून मोकळे झाले होते.
कॉंग्रेसचा असंतृष्ट जी २३ गट!
कॉंग्रेसमध्ये कधीकाळी बोलबाला असलेल्या गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, मनिष तिवारी यांच्यासारखे नेते जे ॠ२३ म्हणून ओळखले जातात. ते सातत्याने कॉंग्रेस हायकमांडला पत्र लिहून डागण्या देत असतात. उथउ मीटिंग बोलवा. आत्ताच्या परिस्थितीबद्दल चर्चा होणं गरजेचं आहे. अशा मागण्या कॉंग्रेसचे जुने-जाणते नेते करताना दिसतात. कॉंग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक बोलवण्याची मागणी होते. परंतु, कॉंग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलावली जात नाही. कपिल सिब्बल यांनी भूमिका मांडल्यानंतर त्यांच्या घरावर युथ कॉंग्रेसचा मोर्चा जातो. त्यांची कार डॅमेज करण्याचा प्रयत्न होतो. त्याबाबत राहुल गांधी किंवा हायकमांडकडून काहीच प्रतिक्रिया येत नाही. मात्र, कॉंग्रेसचे इतर नेते यांनी ट्विट करून भूमिका मांडल्या. पी. चिदंबरम, विवेक तनखा यांच्यासारखे नेते टीका करतात. जम्मू कश्मीर मध्ये भाजपात जाणारे जनप्रतिनिधी गुलाम नबी ह्यांचे निकटवर्ती असतात. अशा गृहकलहात गुरफटलेल्या कॉंग्रेसला ममता, पवारांनी आणखी धक्का दिला आहे.
प्रशांत किशोर आणि शरद पवार भेटी.
११ जून रोजी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली होती. २१ जून २०२१ रोजी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट झाली. दहा दिवसांत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दोन वेळा चर्चा झाली. त्यानंतर प्रशांत किशोर ह्यांनी तृणमूल कॉंग्रेसचे महासचिव पद स्वीकारले हा काही योगायोग नव्हता. त्यानंतर ममता ह्यांनी मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये असताना महाराष्ट्राचा दौरा करून युपीए बाबत मोठे विधान करणे ही ठरवून केलेली कृती दिसते.
पुलोदचा प्रयोग.
तसेही समग्र शरद पवार समजायचे असतील, तर शालिनीताई पाटील लिखित आत्मचरित्र वाचले पाहिजे. त्यातील पुलोदचा प्रयोग आणि वसंतदादा एपिसोड मध्ये त्यांनी खरे शरद पवार उलगडले आहेत. १९७८ मधील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीचे निकाल त्रिशंकू लागले. आणीबाणीनंतर झालेल्या या निवडणुकीत इंदिरा कॉंग्रेसबरोबरच रेड्डी कॉंग्रेसलाही फटका बसला. तर निवडणूक निकालात जनता पक्षाला सर्वाधिक ९९ जागा मिळाल्या. दुसरीकडं इंदिरा कॉंग्रेसला ६२, तर रेड्डी कॉंग्रेसला ६९ जागा मिळाल्या. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला १३, माकपला ९ आणि अपक्षांना ३६ जागा मिळाल्या होत्या. स्पष्ट बहुमत कुणालाही नव्हतं. मात्र, जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. जनता पक्षाला रोखण्यासाठी इंदिरा कॉंग्रेस आणि रेड्डी कॉंग्रेस यांनी आघाडी केली आणि मार्च १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर इंदिरा कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील नेते नासिकराव तिरपुडे यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
सरकार सत्तेवर आले. नासिकराव तिरपुडे यांनीही वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. या काळात त्यांनी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यावर टीका केली, असं म्हटलं जातं. पण, हे सगळं सुरू असताना शरद पवार अचानक ४० आमदारांना घेऊन सरकारमधून बाहेर पडले आणि त्यानंतर अल्पमतात आलेल्या वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
पुढे बाहेर पडलेल्या शरद पवारांनी समाजवादी कॉंग्रेसची स्थापना केली. त्यानंतर शरद पवारांनी जनता पक्षाशी हातमिळवणी करून ‘पुलोद’ (पुरोगामी लोकशाही दल) चा राजकीय प्रयोग केला. यात समाजवादी कॉंग्रेस आणि जनता पक्षाबरोबर शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते. केवळ ४० आमदारांचं संख्याबळ असताना ‘पुलोद’च्या माध्यमातून शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अवघ्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्रीपद सांभाळणारे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. पण, या घटनेनंतर शरद पवारांवर त्यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप करण्यात आला. तो शिक्का शरद पवारांवर कायम आहे.
अशातच महाराष्ट्रातील सरकार पडण्याच्या तारखा जाहीर करणार्‍या भाजपला सुखावणारा एपिसोड ममता पवार भेटीत असून ‘कॉंग्रेस मुक्त भारत’ आणि त्याला पवारांचा हातभार ह्यासाठीची पवारांची खेळी म्हणून राजकीय जाणकार पाहतात.
राजेंद्र पातोडे, प्रदेश महासचिव,
वंचित बहुजन युवा आघाडी,
महाराष्ट्र प्रदेश