Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सरकारी कर्मचार्‍यांनाही ड्रेस कोडचे बंधन, … आणि पुणे महापालिकेतील अधिकारी-कर्मचार्‍यांना शिष्ठाचाराचे रट्टे देण्याची गरज

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
शासकीय कर्मचार्‍यांनाही ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश सरकारने जाहीर केले आहे. दरम्यान पुणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना देखील डे्रस कोड बरोबरच शिष्ठाचार पाळण्याचे रट्टे देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दरम्यान महापालिकेतील सामान्य प्रशासन विभाग याकडे लक्षच देत नाहीये. सेवक वर्ग विभाग म्हणजे सध्या तरी पाणथळ जागेत रवंथ करण्यासाठी बसलेल्या गुरांचा तांडा झाला आहे.


राज्य शासनाने त्यांच्या कार्यालयीन कर्मचार्‍यांसाठी डे्रस कोड लागु करण्यात आला आहे. शासकीय कार्यालये व मंत्रालयात आता जीन्स टी शर्ट आता घालता येणार नाही. महिलांनाी साडी,सलवार चुडीदार,ट्राउझर पॅन्ट, त्यावर कुर्ता आवश्यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव करावा. तर पुरुष कर्मचार्‍यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर असा पेहराव करावा.
गडद रंगाचे चित्र विचित्र नक्षीकाम चित्र असलेले कपडे परिधान करू नये.
सरकारी कार्यालयामध्ये कर्मचार्‍यांनी स्लीपर्स वापरू नये.
महिला अधिकारी व कर्मचार्‍यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट यांचा वापर करावा तसेच पुरुष अधिकारी व कर्मचार्‍यांनी बूट, सॅन्डल याचा वापर करावा.
आठवड्यातील एक दिवस ( शुक्रवारी) सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी खादीचे कपडे परिधान करावे.
परिधान केलेला पेहराव स्वच्छ आणि नीटनेटका असावा असे आदेश जारी केले आहेत.
डे्रस कोड मागे शासनाची भूमिका असून, शासकीय कार्यालये व मंत्रालयातून राज्य सरकारचा कारभार चालविण्यात येतो. लोकप्रतिनीधी, सर्वसामान्य नागरिक, अधिकारी हे त्यांच्या कामासाठी कार्यालयाला भेट देतात. अशा वेळी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्माचारी यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग आहे. तसेच कार्यालयीन वेळेत उपस्थित असताना सरकारी कर्मचारी अनुरुप ठरेल अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचार्‍यांची जनमानसातील प्रतिमा मलिन होते.
शासकीय कर्मचार्‍यांकडून चांगल्या वागणुकीची तसेच व्यक्तीमत्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते. या परिस्थितीत जर अधिकारी, कर्मचारी यांची वेशभूषा अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कामकाजावर देखील होतो. या सर्व गोष्टींचा विचार करता मंत्रालय तसेच सर्व राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीने असावा, या विषयी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.


पुणे महापालिकेतील अधिकारी-कर्मचार्‍यांना शिष्ठाचाराचे रट्टे देण्याची गरज-


पुणे महापालिकेची मुख्य इमारत म्हणजे आर्यभूषणचा कट्टा झाला आहे. कुणीही यावं, कुठंही बसाव, अधिकारी कर्मचारी देखील आपआपल्या जागेवर निटसे बसत नाहीत. महापालिकेच्या व्हरांड्यात, मेन डक, मुख्य इमारतीच्या हिरवळीवर, राहिलं सुयलं ऑलिंपिया आणि गावठाणाच्या बोळात तास्न तास अधिकारी कर्मचारी रेंगाळत असतात. गप्पांचा फड जमलेला असतो. चहा पिण्याच्या बहाण्याने, लघुशंकेच्या बहाण्याने अधिकारी कर्मचारी बाहेरच असतात.
वर्ग १ मधील अधिकार्‍यांनी एखाद्या इमारत निरीक्षक, कनिष्ठ अभियंता यांना काही विचारणा करण्यासाठी बोलाविले असता, हेच ज्युनिअर अभियंते वरीष्ठांच्या कार्यालयाबाहेरून आत येऊ का असे न विचारताच, धाड्कन आत येतात आणि वरीष्ठांच्या टेबलाला रेमाटून थांबतात. २०१० ते २०१९ पर्यंत, भरती झालेले कर्मचारी, अभियंते तर अगदीच ज्युनिअर असल्या सारखे वागत असतात. कशाचच यांना धरबंद नाही. आपल्या समोर वरीष्ठ थांबलेले आहेत, ते काही विचारत आहेत, याचे त्याला काही सोयरसुतकच नसते. निटशी उत्तरेही देत नाहीत. थोडक्यात अदब काय असते किंवा हल्लीच्या भाषेत प्रोटोकॉल/ शिष्ठाचार कशाशी खातात हेच माहिती नाहीये. वरीष्ठ अधिकारी पोर्च मधुन जात असता, समोरून कनिष्ठ कर्मचारी येत असतांना, वरीष्ठांना प्रथम मार्ग देवून, मानवंदना देवून, मागाहुन आपण जावे हे तर दूर दूर पर्यंत पुणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना ठाऊकच नाही.


बातमीचे कारण –


(खरं तर शिष्ठाचाराची बातमी १५/२० दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केली जाणार होती. मध्येच पोलीस विभागाकडील महत्वाच्या बातम्यांमुळे ती बातमी प्रसारित करता आली नाही. बातमी कारणही तस्संच आहे. लक्षात राहणार्‍यासारखे… एका कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात मी बसलो असतांना, राजेंद्र राऊत दारातच उभे राहिले. कनिष्ठांनी खरं तर उभे राहणे अपेक्षित होते. परंतु ते उभे राहिले नाहीत. मी खुर्चीवरून अलगदपणे त्यांना स्मितहास्य केले. नंतर विधी विभागाकडून जात असतांना, पुन्हा श्री. राऊत हे येत असतांना, अचानकपणे बांधकाम दोन चे कार्यकारी अभियंता आले, त्यांनी लगेच पोर्चमधुन बाजूला होवून, राऊतांना नजरेने मानवंदना देवून, त्यांना मार्ग करून दिला. मागाहून ते पुढे गेले. ह्याला म्हणायचा शिष्ठाचार. पण हेच जेंव्हा दुसरे कार्यकारी कार्यालयात का झाले नाही यामुळे रट्टावून बातमी देण्याचे मनात होते. ती आता डे्रेसकोडमुळे प्रसारित करण्याचा मुहूर्त मिळाला.)
राज्य शासनाने याबाबतची अनेक परिपत्रके काढली आहेत. पुणे महापालिका सेवक वर्ग विभागात देखील परिपत्रके आहेत. परंतू जुन्या कर्मचार्‍यांनी एक एक कागद जमा करून नस्ती बनविलेली फाईल सध्या सेवक वर्ग विभागातूनच गायब झाली आहे. त्यामुळे साहजिकच शिष्ठाचारही लुप्त झाला आहे.
परंतु राज्य शासनाच्या पोलीस विभागात बघा… पो. शिपाई, पो. नाईक, हवालदार सारखे कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, यांच्यापुढे येताना किती अदब पाळतात. पोलीस उपनिरीक्षक हे वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना मानवंदना दिल्याशिवाय त्यांच्यापुढे उभे राहत नाहीत. वरीष्ठ निरीक्षक देखील सपोआ, उपायुक्त यांच्यापुढे सॅलूट देतात.
महसुल विभागात देखील तलाठी, मंडल अधिकारी हे नायब तहसिलदार, तहसिलदार यांच्या कार्यालयात प्रवेश करतांना अदब पाळतात. कृषी सहकार खात्यात देेखील ही परंपरा आहे. एवढच काय… जिल्हा परिषदेत देखिल अधिकारी कर्मचारी शिष्ठाचार बाळगतात. मग पुणे महापालिकेतच एवढा गबाळा कारभार कशासाठी… पुणे महापालिकेची मुख्य इमारत म्हणजे चौफुला नाहीतर आर्यभूषणचा कट्टा वाटला आहे की काय… असा प्रश्‍न पडतो. त्यामुळे शिष्ठाचाराबाबत जुनेच परिपत्रक, नव्याने काढुन सर्वत्र पोहचविण्याची आवश्यकता आहे.
सामान्य प्रशासन म्हणजे पाणथळ जागेत रवंथ करण्यासाठी बसलेल्या गुरांचा तांडा –
सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबत योग्य व विहीत कालखंडानंतर, शासनाची परिपत्रके, आदेश यांचे नव्याने प्रसारण करणे आवश्यक आहे. नवीन भरती झालेल्या व जुन्या कर्मचार्‍यांसाठी देखील अशा प्रकारची परिपत्रके प्रसारित करून, कार्यालयीन शिस्त व शिष्ठाचार पाळण्याचे आदेश देणे क्रमप्राप्त आहे. परंतु हल्ली सेवक वर्ग विभागात बदल्या, पदोन्नती, पगाराला इकडं- कामाला तिकड, भाऊबंदकी, पुढारीगिरीचं पेव फुटल आहे.
कामापेक्षा इतरच बाबींवर अधिक लक्ष केंद्रीत झालं आहे. थोडक्यात पाणथळ जागेत बसलेल्या गुरांसारखी अवस्था झाली आहे. त्यात अधिक वेळ न दडविता, कार्यालयीन शिस्त व शिष्ठाचाराचे परिपत्रक काढुन पुणे महापालिकेच्या गौरवशाली परंपरेला साजेचे वर्तन होणे आवश्यक आहे.
पुणे हे विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते, मग पुणे महापालिका ही अदबखोरांचा अड्डा हे नामाभिमान आपल्याला परवडण्यासारखे आहे काय हे देखील जपणे आवश्यक आहे.