Tuesday, December 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

महाराष्ट्रात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई:आंबेडकर

मुंबई/दि/
शिवसेना आणि भाजपमध्ये हिंदुत्वाच्या मुद्यावरून शाब्दिक चकमक सुरू आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी टीका केली आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आहे. फक्त महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांमध्ये सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई सुरू आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली.


भाजपने सुरू केलेलं मंदिर आंदोलन आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेली शाब्दिक चकमक या पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकारने अद्यापही मंदिरं सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार मंदिरं उघडी न करून इतर पक्षांना आंदोलन करण्याची संधी देत आहे. त्यामुळे मंदिरं सुरू करण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्रव्यवहारावरही प्रतिक्रिया केली.

राज्यपालांची भूमिका योग्यच आहे. केंद्राच्या निर्णयाचं पालन होतं की नाही, हे पाहण्याचा आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना जे प्रत्युत्तर दिलंय त्याचा आशय केवळ मंदिर उघडण्याबाबतचा आहे, असं सांगतानाच राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या पत्रव्यवहारात अदब पाळला गेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच,
भाजपने सुरू केलेल्या मंदिर आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही, असं सांगतानाच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना कायम असून सध्या राज्यात या दोन्ही पक्षात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई सुरू आहे, असंही ते म्हणाले.