पुणे/दि/ प्रतिनिधी/
मध्यवर्ती पुणे शहरातील हॉटेल प्यासावर कधीच कारवाई होऊ शकत नाही. ड्राय डे असो की लॉकडाऊन. कोणत्याही काळात प्यासा कधीच बंद नव्हतं. सदासर्वदा २४ बाय ७ प्यासा सुरूच होतं. पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र. १ वर मागील ३० वर्षात अनेक तुर्रमखान आले आणि गेले, परंतु त्यांनी देखील प्यासावर कारवाई करण्याची हिंम्मत दाखविली नाही. प्यासा चा इतिहास, भुगोल, नागरीकशास्त्र त्याही पुढे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचा सर्वांनीच अभ्यास केला होता. परंतु हिंमत कुणामध्येच नव्हती. परंतु आर्यन लेडी प्रियंका नारनवरे यांनी कोणाचाही मुलहिजा न बाळगता प्यासावर कारवाई करून, मध्यवर्ती शहरातील गुन्हेगारी मोडीत काढली आहे.
मध्यवर्ती पुण्यातील हॉटेल प्यासा मध्ये अवैध मद्य विक्री आणि हुक्का पार्लर चालविल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी रात्री विशेष पथक तयार करून, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी धडक कारवाई करून, प्यासाचा मॅनेजर मनोज शेट्टी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बारव्यतिरिक्त भर रस्त्यातच टेबल टाकुन विनापरवाना मद्यविक्री करणे, संचारबंदीच्या काळातही उशिरापर्यंत बार सुरू ठेवणे, हुक्का पार्लर चालविणे याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. पोलीसांनी हॉटेल मधुन १ लाख १० हजार रुपयांची विदेशी मद्यासह रोख व हक्का साधने मिळुन एकुण १ लाख १९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे शहरातील काही बांधकाम, ज्वेलरी, कॉन्ट्रॅक्टर, मद्यसम्राटासारख्या व्यावसायिकांवर पोलीसांची नेहमीच कृपादृष्टी असल्याचे सांगितले जाते. यात मध्यवर्ती पुणे शहरातील हॉटेल प्यासाचा वरचा क्रमांक आहे. शहरात काहीही घडले तरी प्यासा कधीच बंद नसायचे अशी त्याची ख्याती होती. मागील ५० वर्षात या हॉटेलवर कधीच कारवाई झाली नाही. आज नगरसेवक, आमदार,खासदार मंत्री म्हणून मिरविणारी मंडळी प्यासाच्या मांडवाखालुन गेले आहेत. रात्री उशिराने एखाद्याचा कोटा संपला तरी मध्यरात्री १२ वाजो की, २ वाजो… हमखास मद्य मिळण्याचे ठिकाण म्हणजे प्यासा. ही ख्याती अनेक वर्षांपासून प्यासाने पाळली आहे. कायदयाची भिती नव्हतीच.
शहरातील संघटीत गुन्हेगारीवर पोलीसांची कारवाई –
पुणे शहराच्या उपनगरातील अनेक संघटीत गुन्हेगार व टोळ्यांविरूद्ध कारवाई केल्याची बातमी येत होती. परंतु पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील गुन्हेगारीबाबत कुठेही वाच्चता होत नव्हती. उपनगरातील गुन्हेगार पुण्यात येवून कारवायात दंग असायचे. परंतु मध्यवर्ती शहरात कधीच कारवाई होत नव्हती. परंतु पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यापासून, गुन्हेगारी मोडीत काढली जात आहे. शहरातील छोट्या मोठ्या टोळ्यांवर बेधडक कारवाई सुरू आहे.
तर दुसर्या बाजूला, लॉकडाऊन काळात पदभार स्वीकारलेल्या प्रियंका नारनवरे यांनी देखील विशेष पथकं तयार करून, संघटीत टोळीविरूद्ध रणशिंग फुंकले आहे. नानापेठेतील नाल्यालगत असलेल्या जुगार अड्ड्यावर कधीच कारवाई होत नव्हती. तिथं प्रथम छापेमारी करून, धंदा उध्वस्त करण्यात आला. नाना पेठ, गणेश पेठेतील गुन्हेगारी मोडून काढली. त्यानंतर त्यांनी मंडईकडे मोर्चा वळविला. हॉटेल प्यासाची मनमानी सुरूच होती. नियम धाब्यावर बसवुन मद्यविक्री, हुक्का पार्लर सुरू होते. हॉटेल प्यासाची राज्यातील व केंद्रीय मंत्र्यापर्यंत ओळख असल्याचे बोलले जाते. त्यात काहींचा सहभाग आहे. पुण्या- मुंबईतील हॉटेलचा संपूर्ण व्यवसाय याच मंडळींच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे दुरच. परंतु कारवाईचा विचार देखील दुरदूरपर्यंत कुणीच केला नव्हता. प्रियंका नारनवरे यांनी केलेली कारवाई म्हणजे, सर्वच प्रकारचा दबाव झुगारून केलेली ही मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
धडकेबाज श्री व सौ नारनवरे –
पोलीस उपायुक्त परिमंडळ एकचा पदभार स्वीकारल्यानंतर, प्रियंका नारनवरे यांनी मागील ३० वर्षात ज्यांना जमलं नाही, ती कामं करून दाखविली आहेत. अगदी सामाजिक न्याय खात्याचे आयुक्त पदावर श्री. प्रशांत नारनवरे कार्यरत आहेत. सामाजिक न्याय खात्यातील लाखोंनी टपाल प्रलंबित होते. शेकडोंनी प्रकरणांवर निर्णय प्रलंबित होता. याबाबत प्रशांत नारनवरे यांनी सहा गठ्ठा पद्धतीचा अवलंब सुरू केला. खरं तर आज सामाजिक न्याय आयुक्तालयात मनुष्यबळ अपुरे आहे. नवीन भरती नसल्यामुळे एकाच कर्मचार्याकडे अनेक कार्यासनाचा कारभार देण्यात आलेला आहे. केवळ ५० टक्के मनुष्यबळावर कामकाज सुरू आहे. कर्मचार्यांच्या अडचणी असल्या तरीही श्री. प्रशांत नारनवरे यांच्या मॅनेजमेंट मुळे शेकडोंनी फाईलस उपसल्या आहेत. निर्णयाप्रत आणलेल्या आहेत. सामाजिक न्याय आयुक्तालयात दर हजारी टपालात माहितीस्तव टपाल ७० टक्के असते. परंतु ह्याच ७० टक्के टपालामुळे आवक बारनिशी पाच लाखांच्या पुढे गेली होती. श्री. प्रशांत नारनवरे यांच्या सहा गठ्ठ पद्धतीमुळे खरं तर हा शोध लागला आहे. धडाकेबाज कामगिरीमुळे आज आयुक्तालयातील ढिगभर कामांचा उपसा झाला आहे.
पुणे शहराला आयपीएस प्रिंयका नारनवरे आणि आयएएस श्री. प्रशांत नारनवरे यांच्या सारखे उत्तम प्रशासक लाभल्यामुळे शासनाची यंत्रणा गतिमान झाली असल्याचे बोलले जात आहे. कायदा सर्वांनाच समान आहे हे प्रियंका नारनवरे यांनी दाखवुन दिले आहे.
पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या अगोदर सुहास बावचे कार्यरत होते. राजकीय पाठबळामुळे कमालिची मग्रुरी ठासुन भरली होती. सर्वसामान्य नागरीक म्हणजे त्यांच्या लेखी कवडीची किंमत नव्हती. अवैध धंदयावर कारवाई तर सोडाच परंतु अवैध धंदयात त्यांची भागीदारी असल्याचे बोलले जाते. त्यांचा पुण्यातील शेवटही राजकीय मग्रुरीत झाला हा इतिहास आहे. बावचे सारखे ढिगभर आले आणि गेले. परंतु कामगिरी ही नारनवरे यांनीच करू दाखविली आहे.