Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

प्रकाश आंबेडकरांचा मोदी-भाजपवर घणाघात- पेट्रोल दरवाढ रिलायन्सची दिवाळखोरी घालवण्यासाठी

prakash ambedkar conference

औरंगाबाद/दि/ भाजप सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर रिलायन्सची दिवाळखोरी घालवण्यासाठी आणि त्यातून दलाली खाण्यासाठी वाढविल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शेतक-यांना साले म्हणणारे आणि सालगड्या प्रमाणे वागवणा-या भाजप सरकारने देशात राजेशाही नसल्याचे लक्षात घेण्याचा इशारा आंबेडकरांनी येथील  जंबिंदा मैदानावर आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या शेतकरी मेळाव्यात दिला.

                प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी आणि बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवेसी प्रमुख असलेल्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) यांच्या आघाडीची घोषणा मंगळवारी औरंगाबादमधील जाहीर सभेत करण्यात आली. महाराष्ट्रात या आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर असतील असे खासदार ओवेसींनी स्पष्ट केले.

                भाजप, कॉंग्रेस यांनी दलित, मुस्लिम आणि वंचित, बहुजनांचा ७० वर्षे फायदा उचलला असल्याचे सांगत ओवेसी म्हणाले, आता आमच्या मतांवर आम्हीच निवडून येऊ. वंचित बहुजन आणि एमआयएमची आघाडी मत विभागणीसाठी उभी राहिली असल्याची अवई उठवली जाईल त्याला, बळी पडू नका असे आवाहनही त्यांनी केले.

                राफेलवरुन मोदींवर हल्लाबोल करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘मोदी हे स्वतः खात नाही, ते दुस-याला खाऊ घालतात आणि त्यातून आपला वाटा घेतात. हा कार्पोरेट भ्रष्टाचार त्यांनी सुरु केला आहे.’

भाजप सरकारच्या काळात द्वेषाचे वातावरण पसरवले जात असल्याची टीका करत आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने मॉब लिंचिंगपासून दूर राहिले पाहिजे.

                द्वेष पसरवून देशात अशांतता निर्माण करणे हाच आरएसएस  भाजपचा डाव आहे, असे करुन दंगली घडवायच्या आणि मग आणीबाणी लागू करण्याचा त्यांचा इरादा असल्याचे आंबेडकरांनी म्हटले.

                छोट्या व्यापा-यांनी भाजपची साथ सोडावी, अन्यथा आत्महत्या करावी लागेल असा इशार आंबेडकरांनी दिला.