Wednesday, November 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील सा.बां. खात्यातील बदल्यांचे अर्थकारण, अधीक्षक अभियंता कार्यालयातील जुनाट पद्धतीचा लोकनाट्य तमाशा मंडळ

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्यातील सार्वजनिक बांधकाम खात्यातील बदल्यांचा विषय अगदीच ऐरणीवर आला आहे. एकाच कार्यालयात एकाच कार्यासनात १० ते १२ वर्षे राहण्याची कला तिथल्या लिपिक कलाकारांना आहेच. दुसर्‍या कार्यालयात बळेबळेच बदली झाली आणि जावचं लागलं तर त्या दुसर्‍या कार्यालयातही जुन्याच कार्यालयात जे कार्यासन होते त्याच कार्यासनात ते रुजू होतात. ऑडीट, टेंडर, एसएससी, बजेट ही कार्यासन म्हणजे सोन्याची अंडी देणार्‍या कोंबड्या आहेत. त्यामुळे सा.बां. खात्यातील बदल्यांना अनन्य साधारण महत्व आहे. आमदार मंत्री सर्व नेते कार्यकर्त्यांना रांगेत उभं करतात, पण इथले कर्मचारी टक्केवारीच्या आमिषानं आमदारांनाही विंगेत थांबायला लावतात. प्रश्‍न टक्केवारीचा असतांना नां… त्यामुळे हे सहन करावं लागतं. त्यामुळे बदली आणि कार्यकारी कार्यासनांवर टपुन बसलेल्या बगळ्यांना तातडीने काढुन त्याच्या जागीत जोपर्यंत नवीन उमेदवार येत नाही तो पर्यंत खात्यातील स्वाहाकार थांबणार नाही.


पुण्याच्या अधीक्षक अभियंता पदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी निगडीत अधिकारी येवून बसले आहेत. पूर्वी पुण्यात कार्यकारी अभियंता पदाचा कारभार सांंभाळला आहे. त्यामुळे इथलं पाणी तसं त्यांना नवीन नाही. त्यामुळे बदल्यांचे वगनाट्य त्यांना पुरतं ठाऊक आहे.
बदल्यांचे अर्थकारण –
अधीक्षक अभियंता यांचेकडील विभाग स्तरावरील लिपिक ते स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता यांच्या बदल्यांचे आदेश कागदावर रेखाटले जातात. बदली कुठे झाली याची नाव दिली जातात, परंतु बदलीच्या जागी नवीन कोणत्या कर्मचार्‍याची नियुक्ती झाली ते मात्र आदेशात देत नाहीत. इथच खरी गोम आहे.
बदली आदेश काढुन पाण्यात गळ टाकून बसलेली मंडळी, मासा कधी गळाला लागतो याची वाट पाहत बसलेले असतात. मासा आपोआपाच बदलीचा आदेश पाहून सैरावैरा धावत लिंबाच्या झाडापासून वडाच्या झाडापर्यंत पळत सुटतो. मग काय, घेणं-देणं ठरतं. आणि बदली आदेशाची अंमलबजावणी न करता तो कागद तसाच ठेवून दिला जातो. दरवर्षी अशा बदल्या होत असतात. त्यावरच तर अधीक्षक अभियंता यांचं मोठ्ठं अर्थकारण दडलं आहे.
पुण्याच्या कौन्सिल हॉल शाखेत मुखेकर नावाचे लोकसेवक कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यालयातील मळेकर नावाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांची ८ ते १० वर्षापासून तिथंच कार्यरत आहेत. कोणत्याही बदली आदेशात त्यांचे नाव नसते. ही नेमकी कोणत्या प्रकारची किमया आहे, ती किमया शासनाचे आदेश वडाच्या झाडाला टांगुन कशी करतात ह्याचे मोठे कोडे आहे. मळेेकरांसारखे इतरही अनेकजण आहेत.
आता मुखेकर आणि चव्हाण साहेब एकाच छताखाली आहेत. दूरवरून मुळे हे पाहतही आहेत, पण सध्या लॉकडाऊनमुळे चौफुला बंद असल्याने सर्वांचीच अडचण झाली असावी अशी सध्या शासकीय मध्यवर्ती इमारतीत चर्चा रंगु लागल्या आहेत. बदल्यांचे अर्थकारण यातच दडले आहे. राज्य शासन एक एक रूपया करून आता राज्याचा कारभार चालविण्यासाठी ३ हजार कोटीचे कर्जरोखे काढले आहेत, परंतु पुण्याच्या सा.बां. खात्यात मात्र पॉंचो उँगलीया घी मध्ये आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.
सध्या कौन्सिल हॉलची देयक दणादण निघत आहेत, वैदयकीयची देयक निघत आहेत. ही देयक का व कशी काढली जात आहेत त्याचा समाचार आपण पुढे घेवू.