Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील अवैध धंदयाच्या साम्राज्य विस्तारात दोन्ही पोलीस उपायुक्तांचे योगदान, फरासखाना, खडक आणि स्वारगेट पोलीसातील कृत्य

  • महाराष्ट्र मद्यराष्ट्र तर पुणे शहर गॅम्बलिंग सिटी
  • गुरूवार पेठेचे नामांतर आंदेकर पेठ
  • गुरूवार पेठेत अवैध धंद्याच्या विस्तारासाठी सर्वसामान्य नागरीकांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून घरे-वाडे खाली करण्याचा सपाटा –
  • भारत पाकीस्तान फाळणी वेळची परिस्थिती गुरूवार पेठेत आली आहे….

पुणे/दि/ प्रतिनिधी/
वैदिक धर्मशास्त्रानुसार ब्राह्मण, क्षेत्रिय, वैश्य आणि शुद्र यापैकी शुद्र अर्थात आजचा ओबीसी वर्गाचे राजकीय आरक्षण, मराठा आरक्षणाचा प्रश्‍न गंभिर बनला आहे. अतिशुद्र अर्थात संविधानाचा अंमल सुरू होण्यापूर्वी ज्यांना अस्पृश्य म्हणून गणले जात होते ते अनु. जाती व अनु. जमाती यांची नोकरी भरती आणि पदोन्नतीतील आरक्षण. हे सगळे आरक्षणाचे प्रश्‍न राज्य, केंद्र आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आहेत. तारीख पे तारीख करीत गेली दहा पंधरा वर्ष वेळकाढुपणा राज्यकर्त्यांनी केला आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, अनु. जातीवरील अत्याचार, शैक्षणिक प्रवेश याबाबत राज्यातील नागरीकांच्या मनांत आग धगधगत आहे. हे सगळ्या गंभिर प्रश्‍नांचा विसर पडावा म्हणून राज्यातील सरकारने किराणा मालाच्या दुकानातून मद्य अर्थात दारू विक्रीचा परवाना देण्याचे धोरण जाहीर केले आहे. संपूर्ण महाराष्ट्र मद्याच्या आहारी पाठविण्याचा चंगच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार, खासदारांनी उचलला आहे. पुणे शहरात देखील काही आलबेल नाही. राज्यकर्ते आणि पोलीसांच्या आशिर्वादाने पुणे शहरात जुगार अड्डे पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहेत. जुगाराचे प्रकारही आधुनिकतेप्रमाणे वाढले आहेत. थोडक्यात महाराष्ट्र हे मद्यराष्ट्र तर पुणे शहर हे गॅम्बलिंग सिटी होण्याच्या पार पुढे गेली आहे. भविष्यातील पिढी देखील मद्यधुंद आणि जुगारी निर्माण करण्यात पुढचे पाऊल उचलले आहे यात शंकाच उरली नाही.

शनिवार वाडा ते स्वारगेट = गॅम्बलिंग रोड –
पुण्यातील शनिवार वाडा ते स्वारगेट हा रस्ता २४ तास गजबजलेला असतो. कपडे आणि सोन्याचे व्यापारी संपूर्ण शहरात असले तरीही आजही पुण्यातील लक्ष्मीरोडवर कपडे आणि सोने चांदीच्या खरेदीसाठी येणार्‍यांची संख्या कमी नाही. सणावाराला मंडईत आलेच नाहीत असे कधी होत नाही. मंडई देखील भरभरून वाहत असते. त्यामुळे हे वाहते पब्लिक अवैध धंदेवाल्यांनी ओळखुन याच रस्त्यावर असलेले पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. १ यांचेकडील फरासखाना पोलीस स्टेशन, खडक पोलीस स्टेशन आणि पुढे पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. २ यांच्याकडील स्वारगेट पोलीस स्टेशन आहेत.
वाहत्या पब्लिकच्या खिशातील पैसा काढण्यासाठी इथल्या अवैध धंदेचालकांनी शहराच्या पेठांतील गल्लीबोळात जुगार अड्डे तयार केले आहेत. फरासखाना, खडक आणि स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत कमालीचे अवैध धंदे सुरू झाले आहेत. थोडक्यात शनिवार वाडा ते स्वारगेट या रस्त्याचे नाव आता गॅम्बलिंग रोड ठेवणेच आता शिल्लक राहिले आहे.

खडक पोलीस स्टेशन हद्दीतील गॅम्बलिंग-
खडक पोलीस स्टेशन हद्दीत सध्या अवैध व बेकायदा धंद्याना उधान आले आहेत. खडक पोलीसांच्या योग्य त्या सहकार्याने जुगार अड्डे, क्लब अवैध दारूचे पाट वाहत आहेत. खडक पोलीस स्टेशन हद्दीतील कासेवाडी, लोहियानगर, गंज पेठेत मटका, जुगार, सोरट आणि अवैध दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ढावरे नावाचा इसम हे धंदे कंट्रोल करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच वसिम व गोरख तसेच बबल्या हे इसम कार्यरत असल्याचे सांगितले जाते.
तर खडक पोलीस स्टेशन हद्दीतील गुरूवार पेठ जैन मंदिर अंबामाता मंदिराच्या आतमधील वाड्यांमध्ये गॅम्बलिंग हब निर्माण झाले आहेत. पुणे शहरासह मुंबई आणि परराज्यातील गुजरात येथुन खेळीया जुगार खेळण्यासाठी येत आहेत. जुगाराचे सगळेच नवे जुने प्रकार इथे पहावयास मिळतात. मटका, सोरट, रनिंग मटका, गुडगुडी, अंदर बाहर, चक्री, यापेक्षाही मोठ मोठे अवैध बेकायदा उद्योग सुरू आहेत. तर रमीचे ७/८ टेबल सध्या कार्यरत आहेत. एक टेबल ६० हजारापासूंन ते दोन ते पाच लाखांपर्यंत जात असल्याचेही सांगितले जात आहे. दिवस व रात्रीची एकुण २४ तासाची कमाई लक्षावधी व कोट्यवधी रुपयांपर्यंत जात असल्याचे सांगितले जात आहे. दिवस- रात्र गांजा, सिगारेटचे धुर बाहेर पडत असतात. तर अंमली पदार्थांचा वापर देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे स्थानिक नागरीकांनी सांगितले आहे.

गुरूवार पेठेत अवैध धंद्याच्या विस्तारासाठी सर्वसामान्य नागरीकांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून घरे-वाडे खाली करण्याचा सपाटा –
दरम्यान गुरूवार पेठेतील जैन मंदिर अंबामाता मंदिराजवळील गॅम्बलिंग हब चा विस्तार वाढत आहे. शहर, जिल्हा आणि परराज्यातून खेळीया येत असल्यामुळे तसेच देशी विदेशी दारू, गांजासह अंमली पदार्थ सहज मिळत असल्याने, आधी एक संपूर्ण वाडा, त्यानंतर दुसरा वाडा आणि आता तिसरा संपूर्ण वाडा ताब्यात घेण्याचा सपाटा सुरू आहे. लहान मुले, मुली, तरूण तरूणींना या ठिकाणी सहजपणे वावरण अशक्य झाले आहे.
अतिशय अचकट विचकट आणि गलिच्छ शिवीगाळ व वर्तनामुळे स्थानिक नागरीकांना नको- नको करून टाकले आहे. जीविताची भिती आणि मुलांना वाईट वळण लागत असल्याने नागरीक जीव मुठीत धरून घरे दारे सोडून निघुन जात आहेत. भारत पाकीस्तान फाळणीवेळी देखील नागरीकांवर एवढी वेळ आली नसेल एवढी भयंकर व भयावह परिस्थिती इथे निर्माण झाली आहे. खडक पोलीसांना ५ पेट्या भरून बिस्कीटे मिळत असल्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. एवढी दशहत निर्माण झाली असल्याचे स्थानिक नागरीकांनी सांगितले आहे.

गुरूवार पेठेचे नामांतर करून आंदेकर पेठ ठेवायचे काय…
गुरूवार पेठेतील अवैध धंदयाचा विस्तार पाहुन राज्यकर्ते देखील एव्हाना जागे झाले आहेत. महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून अवैध धंदयाचा रक्षक बनला असल्याचे ऐकिवात आहे. हाणमार करून, किळवाणे प्रकार पंटरव्दारे करून स्थानिक नागरीकांना घरे वाडे खाली/ रिकामे करण्याचा सपाटा सुरू आहे. थोड्याच दिवसात गुरूवार पेठ गॅम्बलिंगचे हब म्हणून पुढे येत आहे. आता गुरूवार पेठेचे नामांतर गॅम्बलिंग पेठ किंवा आंदेकर पेठ करण्याची वेळ आली आहे. खडक पोलीस स्टेशन हद्दीतील कु्रर व दशहतवादी कृत्यांचा पंचनामा आता पुढील अंकात पाहणार आहोतच.

फरासखाना हद्दीतील अवैध धंद्याचे दळण- वळण…..
पिठाच्या गिरीचा शोध लागण्यापूर्वी तत्कालिन काळात जात्यावर धान्य दळले जात असायचे. देशी विदेशी व्यापाराला त्यामुळेच दळण- वळण हे नाव तर पडले तर नसावे ना…अशी शंका येते. हेच दळण काल- आज आणि उद्याही फरासखाना पोलीसस्टेशन हद्दीत कायम दिसत. श्रीमंत दगडूशेठ दत्तमंदिरा समोरील लॉटरी आणि एक आकडी लॉटरीचे अड्डे तर कधीच बंद होत नाहीत. सोरट आणि चिमणी पाकोळीचा धंदा तर जोरात आहेच. पुढे सोमा काची याचा जुगार अड्डा सर्वश्रुत आहे. दरमहा ह्याच्या व त्याच्याकडून २ बिस्कीटांच्या पेटीमुळे फरासखान्याचे तर तोंडच उचकट नाही. आता शिवाजीनगरातील काही मंडळी फरासखाना हद्दीत बाजार मांडल्याचे ऐकिवात आहे. थोडक्यात काय तर अवैध धंदे वेगाने सुरू आहेत. पोलीस दळण दळत आहेत एवढच ते.

भारत पाकीस्तान फाळणी आणि निर्वासित…
ब्रिटीशांच्या गुलामीतून भारत स्वतंत्र होत असतांना पाकीस्तानची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी दोन्ही प्रांतातील निर्वासितांची मोठी समस्या निर्माण झाली होती. दोन्ही देशातील नागरीक आपली घरदार सोडून निघाले होते. अगदी तशीच अवस्था आज गुरूवार पेठेतील जैन मंदिर अंबामाता मंदिराजवळील नागरीकांची झाली असल्याचे पाहण्यात आले आहे.
अवैध धंद्याच्या विस्तारासाठी स्थानिक नागरीकांचे छळ करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यातील एका वृद्ध महिलेने तर भारत पाकीस्तान फाळणीची आठवण करून दिली. खडक पोलीसच या कटात सामिल असल्याने, नागरीकांची कोणतीही दाद ऐकुण घेतली जात नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणी पोलीस आयुक्तांनीच या प्रकरणी अधिक लक्ष देण्याची विनंती गुरूवार पेठेतील नागरीकांनी व्यक्त केली आहे.

स्वारगेट अबबबबबबबऽऽ –
शनिवार वाडा ते स्वारगेट = गॅम्बलिंग रोड वरील स्वारगेट पोलीस स्टेशन म्हणजे पुराणी हवेली आहे. थोडक्यात १९५२ साली प्रसिद्ध अशा गुरूदत्त यांच्या साहेब, बीबी और गुलाम यांच्या चित्रपटाला शोभेल अशी ही पुराणी हवेली आहे. जुन्या काळातील शेवटचे पोलीस स्टेशन म्हणुन स्वारगेट पोलीस ठाण्याचा बोलबाला होता.
पोलीस स्टेशनच्या मागील २६ वर्षांपासूनच्या इतिहास भुगोलाचा मी साक्षीदार आहे. स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत एकेकाळी ४० झोपडपट्ट्या, चाळी होत्या. त्यातील २०० पोलीस म्हणजे तिळगुळाचा लाडूच. कुठे खट् वाजले तर पोलीस स्टेशन मध्ये एखाद दुसरा कर्मचारी आढळुन येत होता अशी स्थिती स्वारगेट पोलीस स्टेशनची होती. आज त्याच पुराणी हवेलीची अवस्था भयंकर झाली असून, दत्तवाडीतील मामाने स्वारगेट पोलीस हद्दीत जुगारचे बस्तान बसविले आहे. तिकडं वर्षानुवर्षाचे व्होल्गा चौकातील जुगारात शेख, शाहु आणि अच्छुचे बिर्‍हाड स्थापन केले आहे.
सगळीकडे जुगार अड्डे, गांजाचा धुर आणि देशी विदेशी दारूची तस्करी वेगात सुरू आहे. स्वारगेट पोलीसांना किती बिस्कीटे मिळतात हे मात्र ज्ञात नाही. परंतु बिस्कीटाशिवाय कामच होत नाही एवढं मात्र नक्की.
दरम्यान शनिवार वाडा ते स्वारगेट = गॅम्बलिंग रोड वरील फरासखाना पोलीस स्टेशन, खडक पोलीस आणि स्वारगेट पोलीस स्टेशन मधील गैरकारभाराचा पंचनामा पुढील अंकापासून सादर केला जात आहे. तुर्तास इतकेच.क्रमशः