Friday, December 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे शहर पोलीस दलातील ५७५ पोलीसांना (अतिविलंबाने) पदोन्नती

पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/
पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या ५७५ पोलीस अंमलदार यांना पोलीस नाईक ते सहा. पोलीस फौजदार या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. २४ बाय ७ अशी ड्युटी असणार्‍या पोलीसांना अतिविलंबाने का होईना आज पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. शासनाच्या बहुतांश खात्यातील कर्मचारी पदोन्नतीसाठी कागदी तलवारी घेवून उभे असतात. परंतू शासनाच्या पोलीस विभागातील कर्मचार्‍यांच्या हातात खरे खुरे घोडे असतांना देखील त्यांना कागदी घोडा नाचविता येत नाही हे खरे वास्तव आहे.


पुणे शहर पोलीस दलातील गट क संवर्गातील पोलीस शिपाई ते सहा. पोलीस फौजदार यांची २०२०-२१ मधील सेवाज्येष्ठता व पदोन्नतीची माहिती, माहितीच्या अधिकारान्वये अनिरूद्ध चव्हाण यांनी विचारण्यात आली होती. जन माहिती अधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त श्री. बजरंग देसाई यांनी आस्था – ३ कडील प्रशासकीय अधिकारी श्रीमती एस.आर. भालचिम यांचेकडून असंबंध स्वरूपाची माहिती देण्यात आली होती. तसेच गट क संवर्गातील सेवाज्येष्ठता आणि पदोन्नतीची प्रक्रिया सुरू असल्याने सद्यःस्थितीत माहिती उपलब्ध नसल्याचे २७ मे २०२१ रोजीच्या पत्रात नमूद केले होते. सेवाज्येष्ठता आणि पदोन्नतीबाबत पोलीस आयुक्त स्तरावर झालेल्या बैठकीचे इतिवृत्तही देण्यास असमर्थता दर्शविण्यात आली होती.
दरम्यान २३ जुन २०२१ रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, पुणे शहर पोलीस दलामध्ये आस्थापनेवर कार्यरत असलेले पोलीस शिपाई ते पोलीस हवाल दर्जाचे पोलीस अंमलदार यांना पदोन्नती देण्यासाठी अपर पोलीस आयुक्त प्रशासन डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपआयुक्त मुख्यालय श्रीमती सपना गोरे, सहा. पोलीस आयुक्त आस्थापना मच्छिंद्र चव्हाण व प्रशासकीय अधिकारी श्रीमती शशिकला भालचिम यांची समिती स्थापन करण्यात आल्याचे नमूद केले आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार, २३ जुन रोजी पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.


पुणे शहर पोलीस दलातील गट क संवर्गातील पोलीस नाईक ते सहा. पोलीस फौजदार यामध्ये २०० पोलीस हवालदार यांना सहा. पोलीस फौजदार या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. २४९ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तर १२६ पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. अशा प्रकारे पुणे शहर पोलीस दलातील ५७५ पोलीस अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यापूर्वी १७२ अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आली होती. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पुणे शहर पोलीस दलातील अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शासनाच्या प्रत्येक खाते व विभागात प्रथम नियुक्ती पासून सेवानिवृत्तीपर्यंत पदोन्नतीचे टप्पे निश्‍चित केलेले असतात. तथापी प्रथम पदोन्नतीचा टप्पा पूर्ण करून पाच सहा वर्ष उलटून गेली तरी, पदोन्नती दिली जात नाही. शासनाच्या बहुतांश खात्यातील कर्मचारी पदोन्नतीसाठी कागदी तलवारी घेवून उभे असतात. परंतू शासनाच्या पोलीस विभागातील कर्मचार्‍यांच्या हातात खर्‍या खुर्‍या बंदूका असतांना देखील त्यांना कागदी तलवार आणि कागदी बंदूक हाती धरता येत नाही हे खरे वास्तव आहे. शेवटी विलंब आणि अतिविलंबाने का होईना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली आहे.

याबाबत पदोन्नती झालेले पोलीस अंमलदार यांना पोलीस आयुक्त अमिताभ
गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त प्रशासन डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपआयुक्त मुख्यालय श्रीमती सपना गोरे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी यांना पुढील वाटचालीस सत्वर शुभेच्छा दिल्या आहेत.