Saturday, November 16 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील….. बिब्ब घ्या, बिब्ब्- शिक्के काई वसुलदारांची हिटलरशाही चालायाची न्हाई

police pune

पुणे/दि/ प्रतिनिधी/

                सुया घे, पोत घे, वाळ घे, मनगटी घे बाईऽऽ, बिब्ब- शिक्क- रिठं हाईत बाई ऽऽऽ अस्सं म्हणुन कटलरी मालाची विक्री तत्कालिन काळात पुण्यासह राज्यात होत होती. सध्या ऍमेझॉन किंवा इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी देशात शिरकाव केल्यापासून वैदू किंवा वैदिणीच्या ह्या व्यवसायावर संक्रांत आली आहे. परंतु मागील हजार पाचशे वर्षांपासून हा व्यवसाय त्यांच्याकडंच होता. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्या व्यवसायात बिब्ब घालण्याचे काम मोठ्या वेगाने सुरू केलं आहे. ह्या वस्तु एकतर वैदिणीकडे मिळायच्या किंवा आठवडी बाजार किंवा गावगावच्या जत्रमध्येच ह्या वस्तु मिळत असतं. आता मात्र सर्वत्र कटलरी मालाची दुकाने झाली आहेत हा भाग वेगळा. परंतु सध्या पुणे शहर पोलीस आयुक्तालयाची देखील अशीच काहीशी अवस्था झाली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अकरा साडे अकरा हजार  पोलीसांपैकी, हजार दीड हजार म्हणजे एकुण १५ टक्के पोलीस कर्मचार्‍यांनी ८५ टक्के  पोलीसांना ओलीस धरले आहे. हीच ती १५ टक्के वसुलदारांची जमात आहे. ह्याच १५  टक्के वसुलदार जमातीने ८५ पोलीसांचे श्रेय लाटण्याचे किंवा त्यांच्या कामात बिब्बा  घालण्याचे  काम वेगात सुरू आहे. पोलीस म्हटलं की एक प्रकारचा दरारा वाटायचा.  परंतु सध्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसारखे वसुलदार  वागत असल्याने पोलीसांचा दरारा कमी होवून तो अधिकच रसातळाला घेवून जाण्याचे सर्व श्रेय पुणे शहर पोलीस आयुक्तालयासह पोलीस ठाणे स्तरावरील वसुलदारांना जाते. सर्वसामान्य नागरीकांना पोलीस हे गंभिर वाटतात तर अवैध धंदे करणारांना हेच पोलीस गमतीदार वाटतात. खरं तर ते गंभिरही नाहीत आणि गंमतीदारही नाहीत. त्यांना अव्वल दर्जाचे गमताड म्हटल्यास वावगे ठरुच नये. वरीष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांचा कालावधी आला की, हेच अधिकारी मुंबईची वाट धरतात तर वर्ग दोन व तीन मधील पोलीस कर्मचारी ह्याच मुंबईची वाटणार्‍यांची बदलीसाठी पाट सोडत नाहीत. त्यामुळेच ते गमताड आहेत ते ऊगाच नाही.

शब्दांचा चमत्कार करून, नमस्कार मिळविणार्‍या वसुलदारांचे प्रताप –

                पुणे शहर पोलीस आयुक्तालयात न भुतो, न भविष्यती अशा प्रकारच्या वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या इतिहासात प्रथमच झाल्या आहेत. पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अति. पोलिस आयुक्त चारही परिमंडळाचे पोलीस उपायुक्त, काही सहायक पोलीस आयुक्त यांच्या बदल्या झाल्या आहेत. खरं तर ह्या घाऊक बदल्याच होत्या. निविदा कामांचे टेंडर काढुन कामे करून घेण्याची शासनात एक पद्धत आहे, अगदी त्याच धर्तीवर घाऊक पद्धतीने ह्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. जसे वरीष्ठांनी घाऊक पद्धतीने बदल्या करवुन घेतल्या, वरीष्ठांच्या पावलावर पाऊल ठेवून वर्ग तीन मधील शिपाई, हवालदार, नाईक एएसआय पर्यंत सर्वांनी मोठी ताकद लावुन बदल्या केल्या आहेत. माहितीच्या अधिकारात माहिती प्राप्त झालेनुसार ३१ मे रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्वसाधारण बदल्यांचे आदेश जारी झाले त्यामध्ये ९५० पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या.

                त्यानंतर पिंपरी चिंचवड आयुक्तालय होणार हे निश्‍चित झाल्यानंतर मोठ्या प्रतिक्षेनंतर २७ जुलै २०१८ रोजी दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली. तर तिसरी यादी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे भर रविवार म्हणजे ३० जुले २०१८ रोजी इतिहासात प्रथमच बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. व सर्वात शेवटी चौथी यादी ३ ऑगस्ट २०१८ रोजी करण्यात आली.

                सहाय्यक पोलीस आयुक्त ते पोलीस आयुक्त या पदापर्यंतसर्वांनीच मोठी ताकद वापरून पुण्यात तेही महत्वांच्या जागांवर कब्जा मिळविला. त्यामुळे तत्कालिन प्रभारी पोलीस आयुक्त संजिवकुमार यांनी ज्या १२० पोलीस कर्मचार्‍यांना व तत्कालिन सह पोलस आयुक्त सुनिल रामानंद यांनी ज्या ६० वसुलीबहाद्दरांना पुणे शहर पोलीस आयुक्तालयापासून दूर ठेवले होते, त्या सर्वांनी मोठी ताकद वापरून, चारही सर्वसाधारण बदली प्रक्रियेमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. माहे २०१८-१९ या वित्तीलब्ध वर्षातील बदली प्रक्रियेत वसुलीवाला या पदावर नवीन चेहरे कुठे दिसतच नाहीत. सर्व जागा जुन्या जाणत्या मातब्बर व गब्बर वसुलदारांनी पटकाविल्या आहेत.

                पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा, विशेष शाखा, सामाजिक सुरक्षा अशा प्रकारे बिनकामाच्या १२ ते १५ विंग्ज कार्यरत आहेत. ते काय काम करतात हे त्यांनाच ठाऊक. परंतु ह्या पोलीस ठाण्यापासून ते पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत प्रत्येकांचे वसुलदार नियुक्त केले जातात व नियुक्त केले गेले आहेत. तसेच काही वसुलदार हे गुन्हे शाखेत पगाराला आहेत, परंतु काही पोलीस कर्मचारी हे पोलीस ठाण्याची वसुली २०/३० टक्के कमिशन घेवून करीत आहेत. परंतु या सर्वांचा डोळा मात्र वेश्याव्यवसायिक, हॉटेलचालक, अंमलीपदार्थ व्यापारी, गुटखा विकणारे, मटका, लॉटरी, देशी विदेशी दारूची चोरटी आयात निर्यात करणारे, तसेच वेगवेगळ्े बेकायदेशीर धंदे करणारे लोक यांच्या धंद्यांना विभागनिहाय परवानगी देणे, त्यांच्या अडीअडचणी सोडविणे, अशा प्रकारचे अवैध धंदे बंद करणार्‍या महिला व सामाजिक कार्यकर्त्यांना ठोकठाक करून, प्रसंगी गुन्हे दाखल करून, त्यांचा बंदोबस्त करणे एवढे मोठ्ठे काम या वसुलदारांकडे असते.

                दरम्यान वेश्याव्यवसायिक, विभागस्तर व आंतरराज्यीय सेक्स रॅकेट माफिया, हॉटेलचालक, पब, बारचालक, अंमलीपदार्थ व्यापारी, गुटखा विकणारे, मटका, लॉटरी, देशी विदेशी दारूची चोरटी आयात निर्यात करणारे, तसेच वेगवेगळ्े बेकायदेशीर धंदे करणारे लोकांना संरक्षण पुरविण्या बरोबरच, पोलीस ठाणे ते पोलीस आयुक्तलय व आयुक्तालयातील वेगवेगळ्या विभागांचे वसुली कुणाकडे दयायची, एखादया विभागातील अधिकार्‍याने आडमुठे धोरण अवलंबिल्यास, माध्यंमां मार्फत त्यांना सरळ करणे, जवळची माणसे वसुलीसाठी बसविणे अशा प्रकारची सेवा देखील या वसुलदारांकरवी होत असते.

                पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अकारा साडेअकरा हजार पोलीसांपैकी दीड हजार पोलीसांनी ९ साडेनऊ हजार पोलीस कर्मचार्‍यांना ओलीस धरले आहे. याच एक दीड हजार पोलीसांच्या मेहेरबानीमुळे खात्याची बदनामी होत असते. परंतु त्याचे सर्व खापर संपूर्ण पोलीस खात्यावर येवून पडते. म्हणजे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील १५ टक्के पोलीसांनी ८५ टक्के पोलीस कर्मचार्‍यांना ओलीस धरले आहे.

पोलीस उपायुक्त परिमंडळ एक – नागपुर ते पुणे, व्हाया मुंबई –

                सध्या पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील बहुतांश वरीष्ठ पोलीस अधिकारी हे नागपुर पोलीस आयुक्तालयात कार्यरत होते. म्हणून अख्यंच्या अख्खं नागपुर पोलीस आयुक्तालय पुणे शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे. सर्वच वरीष्ठ पोलीस अधिकारी भांबावलेले आहेत. चार सहा महिने झाले तरी ते अद्याप पावेतो स्थिर झाले नसल्याचे चित्र दिसत आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र. १ यांच्या कार्यालयात देखील अशाच प्रकारचे चित्र दिसत आहे. या कार्यालयातील काही जुन्या प्रशासकीय कामकाज करणार्‍या व्यक्तीची बदली झाल्यामुळे प्रशासकीय कामांसाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र. १ पोरके झाले आहे. आलेले टपाल, जावक टपाल, कोणते टपाल साहेबांपुढे ठेवायचे, कोणते टपाल बटवडा करून ते कनिष्ठ कार्यालयाकडे पाठवायचे ह्याचे काही धरबंधच राहीलेला नाही. त्यामुळे अनेक टपाल व पत्रव्यवहार प्रलंबित आहे, कित्येक धारिका प्रलंबित आहेत. त्यातच प्रतिनियुक्तीवरील बहुतांश पोलीस कर्मचार्‍यांचे परिमंडळ एक कार्यालयातील सेवा सात आठ वर्षे झालेले आहे. त्यामुळे कामात निरसपणा व कंटाळलेलापणा आलेला आहे. त्यामुळे सहायक पोलीस आयुक्त व पोलीस ठाणे स्तरावर काय कमालिचा गोंधळ माजलाय हे सांगायलाच नको.

                सध्या जेथे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक बसतात तिथे दोन पोलीस ठाणी व दोन सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यरत आहेत. त्यापैकीच एक फरासखाना पोलीस ठाणे आहे. यांच्या हद्दीतील अवैध कृत्यांचे वृत्त मागील अंकात प्रसारित करण्यात आले होते. त्यामुळे ते येथे उद्धृत करण्याची आवश्यकता नसली तरी, या पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदेचालविणार्‍यांची दादागिरी वाढली आहे. त्याला जितके पोलीस ठाणे जबाबदार आहे, तितकेच गुन्हेशाखा, सामाजिक सुरक्षा शाखा, विशेष शाखा जबाबदार आहे. त्यामुळे ह्या सर्व शासनाच्या यंत्रणांना वठणिवर आणण्याएैवजी पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांचे मुळातच कार्यालयीन कामकाजात लक्षच नसल्याचे दिसून येत आहे. कदाचित त्यांना दुसर्‍या ठिकाणी काम करण्याची इच्छा असावी असे दिसते.

                पोलीस उपायुक्त श्री. बावचे यांनी पदभार स्वीकारल्या दिवसापासून ते आज पर्यंत किती जणांना मेमो पाठविले व किती जणांनी मेमोला उत्तर दिले आणि आजपर्यंत एकाही पोलीस कर्मचार्‍याला ममो दिला नसेल तर इतके काही सर्व आलबेल सुरू आहे, असे मुळीच नाही. खंर तर ह्या १५ टक्के पोलीसांनी ८५ पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना ओलीस धरले आहे असे म्हटल्यास वावगे ठरूच नये. वर्ग तीन मधील पोलीस कर्मचार्‍यांच्या कामात हस्तक्षेप करायचा आणि वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांना स्वतःच्या बोटावर नाचवायची कला वसुलदारांच्या अंगी बाणावली आहे. त्यामुळे ह्या सर्व प्रकरणी एक गंभिर चौकशी समिती नियुक्त करून, प्रतिनियुक्तीवरील पोलीस कर्मचारी व वसुलदारांना त्यांच्या त्यांच्या विभागासह परिमंडळ सोडून इतरत्र बदल्या करणे हितवाह आहे. अन्यथा पोलीस ठाण्यात वा आयुक्तालयात – अवैध धंदे करणारे साहेबांच्या पुढे खुर्चीवर बसलेले तर सर्वसामान्य नागरीक मात्र दारात हाताची घडी घालुन बसलेले कायम दिसतील हे मात्र नक्की. (पुढील अंकात – फरासखाना विभागातील पोलीस ठाण्यातील तळीरामांनी अवैध धंदे चालकांची तळी-भंडारा उचलण्याची उचलेगिरी)