Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेच्या धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाच्या ,विदयुत कामातील गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी

पुणे/दि/प्रतिनिधी/
पुणे महापालिकेतील नोंदणीकृत ठेकेदार आशय एंटरप्राईजेस यांनी प्रमुख स्मशानभूमीत विद्युत विषयक कामे न करताच सुमारे एक कोटी रुपयांची बनावट व बोगस बिले तयार करून ती मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती. बनावट बिल प्रकरणी मागाहुन त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आशय एंटरप्राईजेस ही एकच संस्था नसुन पुण्यात अशा प्रकारच्या अनेक ठेकेदारांच्या टोळ्या कार्यरत आहेत. पुणे शहरातील धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाने देखील विद्युत विषयक कामे न करताच बीलांची अदायगी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांनी उपआयुक्त कार्यालयाकडे केली आहे. तसेच या भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. बोबडे व श्रीमती नाथी यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाने माहे २०२०-२१ या कालावधीत करण्यात आलेली बहुतांश कामे बोगस व निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत. मार्च अखेर ज्या कामांच्या बिलांची अदायगी करण्यात आली, ती कामे तक्रार अर्ज दिल्यानंतर, घाई घाईने नोव्हेंबर अखेर व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात उरकण्याचा प्रयत्न होतांना दिसत आहे. तथापी स्वयंरोजगार संस्थाना देण्यात आलेल्या कामांत देखील गैरव्यवहार झाला असल्याच्या तक्रारी विविध सामाजिक संघटनांनी करण्यात आलेल्या आहेत.
निकृष्ट दर्जांच्या साहित्याचा वापर –
निविदा कामांच्या टेंडर स्पेशिफिकेशनमध्ये नमुद असल्यानुसार, विद्युत विषयक कामांसाठी वापरावयाचे साहित्य हे आयएसआय मार्क व उच्च मानांकित कंपन्यांचे वापरण्याबाबत निर्देश आहेत. तथापी धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाने विद्युत विषयक कामांसाठी वापरण्यात आलेले विजेचे पोल अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले आहे. वर्षसहा महिन्यापूर्वी करण्यात आलेले विजेचे पोलला गंज चढला असून ते तुटून पडत आहेत. ज्या ठिकाणी डिझायनिंगचे व बिडाचे पाईप लावण्यात आले आहेत, ते बीडाचे पोल देखील निकृष्ट असून, बर्‍याच ठिकाणच्या पोलंना तडे गेले आहेत, तुटले आहेत. तसेच ते पोल तुटत असल्याचेही दिसून येत आहे. तसेच जमिनीखालून करण्यात आलेली वायरिंग देखील आता उघडी पडल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी तर मानांकिम कंपन्यांचे केबल्स वापरण्यात आल्याचे टेंडरमध्ये नमूद असतांना, आता प्रत्यक्षात संबंधित केबल्स देखील निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. कामे न करताच बिलांचा धडाका –
मार्च एंडींगच्या धसकल्यामुळे, तसेच १५ मार्च २०२० रोजीपर्यंतच बील सादर करण्यचे आदेश आयुक्त कार्यालयाने काढल्यामुळे अधिकारी आणि ठेकेदारांची चांगलीची गोची झाली होती. त्यामुळे जानेवारी व फेबु्रवारी २०२० या मार्च एंडच्या एक महिना अगोदर काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेस नियमानुसार व नियत कालावधीनुसार वेळ दिल्यानंतर, अवघ्या दोन पाच दिवसात १० / १० लाख रुपयांच्या निविदा कामांची मोजमापे पूर्ण करून बिलांची मंजुरी करण्यात आली आहे. धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाने १५ ते २२ मार्च २०२० पर्यंत सगळ्याच निविदा कामांच्या बीलांची अदायगी करण्यात आली. तथापी निविदा कामांना अजूनही सुरूवात झाली नाही. कामे अजूनही अपूर्ण अवस्थेत आहेत. तर काही ठिकाणी कामे दिसून येत नसल्याचे आढळले आहे.
याबाबत आमचे वार्ताहर श्रीनाथ चव्हाण यांनी नमूद केलं आहे की, टेंडर कामांचे इस्टीमेट तयार करतांना, संबंधित विभागाचे अभियंते जागेवर गेले असल्याचे दिसून येत नाही. यामुळेच संबंधित कामांचे ठिकाण नेमके कुठं आहेत हे देखील अभियंत्यांना माहिती नाही. तरी देखील कामांची मोजमापे टेंडर स्पेसिफीकेशनमध्ये जसे आहेत तसे नोंदवून, बिलांची अदायगी करण्यात आली आहे. नियमानुसार कनिष्ठ अभियंत्यांनी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून काम सुरू असल्याचे, तसेच कामांचे स्टेज, कामातील त्रुटी काढुन संबंधित कामे गुणवत्तापूर्ण करून घेण्याची जबाबदारी असते. तसेच कनिष्ठ अभियंता यांनीच कामांची मोजमापे घेवून ती रजिस्टर मध्ये नोंदविणे आवश्यक असते. परंतु धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयात नियमांचे उल्लंघन करण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केल आहे.


भ्रष्टाचारी अधिकार्‍यांच्या बडतर्फीची मागणी –
धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाकडील कनिष्ठ अभियंता श्री. रजत बोबडे व उपअभियंता श्रीमती नाथी यांनी कामाचे ठिकाणी जावून कामांची मोजमापे लिहली नाहीत. तसेच कामाचे अंदाजपत्रक करतांना कामाचे अगोदरचे व कामे पूर्ण झाल्यानंतरचा अहवाल तयार केला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच काम नेमकं कुठे केलं आहे, हे इस्टीमेट करणार्‍यांना देखील माहिती असू नये यासाठी दुसरी शोकांतिका नाही. त्यामुळे संबंधित अभियंत्यांवर कारवाईची मागणी देखील सामाजिक संघटनांनी केली आहे.
दरम्यान धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय ज्या उपआयुक्तांच्या अधिनस्थ येते, त्या उपआयुक्त कार्यालयाकडून होत असलेली पाठराखण धोकादायक वळणार असून अशा कुप्रवृत्तींवर वेळीच निर्बंध आणणे आवश्यक ठरत असल्याचे अनेकांचे मत झाले आहे. त्यामुळे धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाकडील विद्युत विषयक कामांची तपासणी करून दोषीं अभियंत्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याची होत आहे.