Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पवारांनी मोदींना क्लीनचीट दिल्यानंतरही कॉंग्रेसने आघाडी केली तर ती राजकीय अनैतिकता-ऍड. आंबेडकर

सोलापुर/दि/

                शरद पवारांनी राफेल करारात मोदींना क्लीनचीट दिली आहे. पवारांचे हे वक्तव्य कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना खोटे ठरवणारे आहे. यानंतरही कॉंग्रेसने पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी केली तर ही राजकीय अनैतकिता ठरणार असल्याचे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. सोलापूर येथे आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात बाळासाहेब आंबेडकरांनी मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. मोदींचे हात नाही तर त्यांचे तोंड कार्पोरेट भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याचा आरोप त्यांनी केला.

                शरद पवारांनी मोदींना क्लीनचीट देण्याच्या मुद्यावरुन प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांवर शरसंधान साधले. ऍड. आंबेडकर म्हणाले, ‘शरद पवारांनी दोन दिवसांपूर्वी मोदींना क्लीनचीट दिली. मोदी सगळ्यात चांगला माणूस असल्याचे सर्टिफिकेट पवारांनी देऊन टाकले. एकीकडे राहुल गांधी ओरडून-ओरडून सांगत आहेत की मोदी चोर आहे आणि शरद पवार म्हणतात मोदी चांगला माणूस आहे.

                पवारांनी मोदींना क्लीनचीट देऊन एक प्रकारे राहुल गांधी आणि कॉंग्रेसलाच चॅलेंज केले आहे. एक प्रकारे राहुल गांधी जे आरोप करत आहेत ते सर्व खोटे असल्याचेच एक प्रकारे पवारांनी म्हटले आहे. 

                आम्ही कॉंग्रेससोबत आघाडी करण्यासाठी तयार आहोत. मात्र ते (कॉंग्रेस) म्हणतात राष्ट्रवादीला सोबत घ्या. आता आम्हाला पाहायचे आहे की पवारांच्या या वक्तव्यानंतरही कॉंग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेणार का? असे झाले तर राजकारणात नैतिकता राहिली नाही, असेच म्हणावे लागेल अशी खंत ऍड. आंबेडकरांनी व्यक्त केली.