Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

ग्राहकांना भेसळयुक्त मध चाखायला लावणार्‍या पतंजली, डाबर, बैद्यनाथवर कारवाईचा बडगा

नवी दिल्ली/दि/
ग्राहकांच्या जीभेला भेसळयुक्त मधाची चव चाखायला लावणार्या पतंजली, डाबर, बैद्यनाथ, झंडू, हितकारी, एपीएस हिमालय या कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला (एफएसएसएआय) कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या आठवड्यात, पर्यावरणविषयक कामांवर नजर ठेवणार्या सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरनमेंट (सीएसई) ने दावा केला आहे की भारतात विकल्या जाणार्या ब्रँडेड कंपन्यांच मधात मोठ्या प्रमाणात साखरेची भेसळ आढळली. मात्र तथापि कंपन्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एक अधिकृत निवेदन जारी करून मधात भेसळ केल्याच्या वृत्तावर चिंता व्यक्त केली आहे. मार्केटमध्ये विकल्या जाणार्या बहुतेक ब्रँडेड मधात साखरेचे प्रमाण जास्त असल्याची बातमी विभागाला मिळाली आहे.
ही एक गंभीर समस्या आहे. कोविडसारख्या साथीच्या आजारात लोकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा प्रकार आहे. यामुळे जोखीम वाढली आहे.
या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे निर्देश ग्राहक व्यवहार विभागाने सीसीपीएला दिले आहेत. सीसीपीएने एफएसएसएआयला या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे. सीएसईने १३ टॉप ब्रँड्स तसेच कित्येक लहान ब्रँडच्या प्रोसेस्ड आणि कच्च्या मधातील शुद्धता तपासली.
७७ टक्के नमुन्यात साखर मिसळली गेल्याचे सीएसईच्या निदर्शनास आले आहे. चाचणी केलेल्या २२ नमुन्यांपैकी केवळ पाचच नमुने चाचणीत खरे उतरले.