Tuesday, December 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

कोरेगाव-भीमा लढाईतील ५०० शूरवीर मावळ्यांचा अभिमान का बाळगावा?

छत्रपती शिवाजी राजांनी सुरू केलेला शिवशक पेशव्यांनी बंद पाडला आणि मुस्लिमांचा फसली शक सुरु केला. पेशव्यांनी संस्कृत विद्वान छत्रपती संभाजीराजांना तीन वेळा मारण्याचा कट केला आणि शेवटी औरंगजेबाच्या ताब्यात देऊन ब्राह्मणीधर्मानुसार त्यांना हाल हाल करून ठार मारले. पहिल्या बाजीराव पेशव्याने जोरावरखानाचा पराभव करून गुजरात जिंकणार्‍या मराठा सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना तह करण्यासाठी बोलावून कैदेत टाकले आणि त्यांना कैदेत मारले. बाजीरावाने त्यांच्या मुलाला द्वेषापोटी दगाबाजीने ठार मारले. पहिल्या शाहू महाराजांनी मध्यस्थी केल्यामुळे बाजीरावाला जीवदान मिळाले,अन्यथा त्याच वेळेस उमाबाई दाभाडे यांनी बाजीरावाला ठार केले असते.
तिसर्‍या पानिपत युद्धाच्या वेळेस अब्दाली युद्धाचे नियोजन करत होता, तर पेशवे यज्ञ, याग,होम हवन, भेदाभेद, व्रतवैकल्ये करण्यात दंग होते. पेशवे हे भोजनाच्या वेळेस जाधवराव, निंबाळकर, शितोळे, शिरोळे, जेधे, बांदल, पासलकर, ढमढेरे, घोरपडे, शिंदे, होळकर, भोसले, पवार इत्यादी मराठा सरदारांनादेखील पंक्तीला घेत नसत, इतके ते भेदभाव पाळत असत. शिवाजीराजानी कधीही भेदभाव केला नाही. पेशव्यानी अनैतिकतेचा कळस गाठला होता. अब्दाली युद्धाचे नियोजन करत होता, तेंव्हा पेशवे जप तप आणि भोजनाचे नियोजन करत होते. केवळ पेशव्यांच्या गलथान कारभारामुळे मराठयांची एक पिढी पानिपतात गारद झाली. म्हणजे सदाशिवबहाऊ पेशवे यांनी एक लाख मराठयांना अब्दालीच्या समोर नेवून बळी दिले,तेंव्हा महाराणी ताराराणी म्हणाल्या बरं झालं पेशवाई बुडाली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे सातारा गादीचे वंशज पहिले छत्रपती प्रतापसिंह महाराज हे लहान वयात गादीवरती आले, तेव्हा दुसर्‍या बाजीराव पेशव्याने त्यांच्या शिक्षणावर बंदी घातली, कारण हा बाल छत्रपती शिकला तर शहाणा होईल आणि शहाणा झाला तर तो आपल्या अंकित राहणार नाही, म्हणून त्यांच्या शिक्षणावर बंदी घातली. छत्रपती घराणे त्यांना चोरून शिकवेल म्हणून पेशव्यांनी सातारच्या राजवाड्याभोवती गुप्तहेर नेमले, तेव्हा छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या मातोश्री बाळराजांना मध्यरात्री चोरून शिकवायच्या. छत्रपतींची ही अवस्था तर सामान्य रयतेचे पेशव्यांनी काय हाल केले असतील? याची कल्पना करा.
पेशव्यांनी सुरू केलेला जुलूम कायमचा नष्ट व्हावा यासाठी सातारा येथील तरुण छत्रपती चतुरसिंग भोसले यांनी सैन्य जमविले. ते सैन्य घेऊन पुण्याकडे पेशव्यांना धडा शिकवण्यासाठी सातारा येथून निघालेल्या छत्रपती चतुरसिंग भोसले यांना दुसर्‍या बाजीरावाने दगाबाजीने पकडून कोकणातील कांगोरी किल्ल्यात डांबून त्यांचे खूप हालहाल केले,त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
दुसरा बाजीराव पेशवा आणि त्याचा सेनानायक त्र्यंबक डेंगळे यांनी सातारच्या छत्रपती प्रतापसिंह महाराजांचा खूप छळ केला. छत्रपतींच्या कुटुंबाला त्यांनी वासोटा किल्यावर नजरकैदेत ठेवले. छत्रपतींचे सेवक असणार्‍या पेशव्यांनी छत्रपतींनाच कैदेत ठेवण्यापर्यंत मजल गेली होती. इतका सत्तेचा माज त्यांना आला होता.
दुसर्‍या बाजीराव पेशव्याचा भाऊ अमृतराव पेशवेव्याने खंडणी न देणार्‍या शेतकर्‍यांना तापलेल्या तव्यावर उभे करून छळले, तर शेतकर्‍यांच्या लहान मुलांच्या बेंबीत आणि कानात तोफेची दारू भरून त्याला अग्नी द्यायचा, यामुळे मुलांचे डोके आणि पोट फुटायचे, इसिस आणि तालिबान्याप्रमाणेच पेशवे क्रूर, निर्दयी आणि पाताळयंत्री होते.
इंदूरच्या विठोजी होळकर यांना पुण्यात हत्तीच्या पायाला बांधून पेशव्यांनी हालहाल करून ठार मारले. पेशवेकाळात अस्पृश्यांना तर माणूस म्हणून जगायचा अधिकार नव्हता. त्यांचा प्रचंड छळ झाला.कंबरेला केरसुणी आणि गळ्यात मडके अशी अस्पृश्याची अवस्था होती.
पेशव्यांनी सर्वाधिक छळ ब्राह्मण महिलांचा केला, त्या छळाचे या ठिकाणी वर्णन करणे देखील उचित ठरणार नाही. छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्या समतावादी, बुद्धीप्रामाण्यवादी, लोककल्याणकारी, महिलांचा सन्मान करणार्‍या शासन व्यवस्थेला मूठमाती देण्याचे काम पेशव्यांनी केले, त्यामुळेच ५०० शूरवीर मावळ्यांनी ३०० ब्रिटिशांच्या मदतीने २८ हजार पेशव्यांचा कोरेगाव भीमा येथे पराभव केला. त्या ५०० शूरवीरामध्ये मराठा, महार, मुस्लिम, राजपूत, मातंग, धनगर, इत्यादी मावळे होते.
सर्व जातीधर्मातील मावळे खांद्याला खांदा लावून भावाप्रमाणे पेशवाई विरोधात लढले. त्यांची यादी पेरणे कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभावरती आहे. त्या ५०० सैनिकांपैकी खंडोजी माळवदकर हे एक शूर मराठा वीर होते. त्यांना ब्रिटिशांनी बक्षीस म्हणून जमीन इनाम दिली, त्यांना विजयस्तंभाचे इनचार्ज केले.
या लढाईत शिलेदार खंडोजी माळवदकर यांनी शौर्य गाजवले. त्यांनी बजावलेल्या मोलाच्या कामगिरीमुळे इंग्रजांनी १८२२ साली उभारलेल्या विजयस्तंभाचे इनचार्ज म्हणून खंडोजी यांना नेमले व जमादार हा हुद्दा देऊन, रेजिमेंटल कोट, मेडल देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच २६० एकर इनामी जमीन देखील देण्यात आली विजयस्तंभाची देखभाल करण्याची जबाबदारी इंग्रजांनी माळवदकर वंशाजाकडे दिलेली आहे. हा विजयस्तंभ जुलमी पेशवाईचा केलेल्या पराभवाचे आणि शूरवीर मावळ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे. हा विजयस्तंभ म्हणजे जुलमी पेशवाई विरोधात मारलेली पाचर आहे. त्या स्तंभाचा आदर,सन्मान व रक्षण करणे ही सर्व मावळ्यांची नैतिक जबाबदारी आहे.
५०० मावळ्यांनी ३०० ब्रिटीशांची मदत घेतली किंबहुना ब्रिटिश आणि पाचशे मावळे एकत्र येऊन पेशव्याविरुद्ध लढले, म्हणून त्यांना देशद्रोही ठरवता येणार नाही, कारण १८१८ साली देश,राष्ट्र ही संकल्पना नव्हती, त्या काळात विविध संस्थाने होती. देश,राष्ट्र ही संकल्पना १९४७- १९५० नंतर आली. ५०० मावळ्यांना देशद्रोही ठरविणार्यांनी टिपू सुलतानविरुद्ध इंग्रजांना मदत करणार्‍या पेशव्याबद्दल आपले मत स्पष्ट करावे, तसेच पेशव्यांनी १८०२ साली इंग्रजाबरोबर वसईचा तह केला होता व इंग्रजांची तैनाती फौज पदरी बाळगली होती. छत्रपती प्रतापसिंह महाराजांना कैद करण्यासाठी इंग्रजांना मदत करणार्‍या व शनिवारवाड्यावरचा जरीपटका खाली उतरवून इंग्रजांचा युनियन जॅक फडकविनार्‍यानी राष्ट्रवादाच्या व देशप्रेमाच्या वल्गना करणे हास्यास्पद आहे.
एवढे मात्र नक्की की शिवरायांच्या मावळ्यांचे ५०० वंशज जुलमी पेशवाईविरुद्ध खांद्याला खांदा लावून १ जानेवारी १८१८ रोजी लढले व शिवस्वराज्याची वाताहात लावणार्‍या पेशव्यांना धडा शिकवला, त्यांचा तमाम मराठा, बौद्ध,ओबीसी,एससी, अल्पसंख्यांक यांना अभिमान वाटायला हवा. त्यामुळे आम्ही १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत आहोत.आपल्या पूर्वजानी एकोपा जपला,आपणही एकोपा जपूया! -डॉ.श्रीमंत कोकाटे(साभार व्हॉटसऍप)
संदर्भग्रंथ-
१)छत्रपती शिवाजी महाराज – वा. सी. बेंद्रे
२)छत्रपती संभाजी महाराज – वा. सी. बेंद्रे
३)नामांतर औरंगाबाद आणि पुण्याचे – शरद पाटील
४)पानिपत १७६१ – त्र्यंबक शं. शेजवलकर
५)सातारच्या राज्यक्रान्तिचा इतिहास – प्रबोधनकार ठाकरे
६)दाभाडे घराण्याचा इतिहास – परांडकर
७)महात्मा फुले – धनंजय कीर