
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेत मागील 10 ते 12 वर्षांपासून आरोग्य निरीक्षकांच्या बहुचर्चित बदल्यांचे आदेश 14 ऑगस्ट रोजी अति. आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन यांनी जारी केले. 15 ऑगस्ट व पुढे गणेशोत्सव असल्यामुळे, गणेश विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 8 सप्टेंबर 2025 रोजी कार्यालयीन वेळेनंतर कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करून दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष बदली विभागात रूजु होण्याचे आदेश देवून, यासाठी स्वतंत्र कार्यमुक्ती आदेशाची (रिलिव्ह मेमो) ची आवश्यता नाही असेही आदेशात नमूद केले होते. तथापी कार्यमुक्त करण्यात येवून आज 10 दिवस झाले तरी पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागातील आरोग्य निरीक्षक बदलीच्या ठिकाणी रूजु झाले नाहीत. तसेच काही रुजु झाले तरी त्यांना आरोग्य कोठ्या देण्यात आलेल्या नाहीत. सर्व आरोग्य निरीक्षक यांना सांगण्यात येत आहे की, दोन दिवस थांबा… निवडणूकीचे कारण देवून बदल्या रद्द करणार आहेत. दरम्यान कोणताही आरोग्य निरीक्षक बदलीच्या ठिकाणी रुजु होण्यास तयार नाही. तसेच संबंधित क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्त व उपआयुक्त आरोग्य निरीक्षकांच्या बदल्यांचा उत्सुक नाहीत. त्यामुळे आयुक्त नवलकिशोर राम व अति. आयुक्त एम.जे.प्रदीप चंद्रन यांच्या आदेशाला ठोकरीने उडवून लावण्याचे काम पुणे महापालिकेतील आरोग्य निरीक्षकांनी केले एवढे मात्र निश्चित.
घनकचरा विभागात बदली अधिनियमांची एैशी की तैशी –
पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात कोणत्याही मोकादमाची, आरोग्य निरीक्षकाची बदली सहजा सहजी होत नाही. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत राहण्याची सवय झाली आहे. एखादयाची बदली केली तरी संबंधित बदली झालेला मोकादम व आरोग्य निरीक्षक, माननियांपासून मंत्रालयापर्यंत जावून, बदली रद्द करून आणण्याची परंपरा घनकचरा विभागात आहे. त्यामुळे मागील 10 वर्षात ज्या आरोग्य निरीक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) याची बदली झाली, तो आजही आहे त्याच क्षेत्रिय कार्यालयात कार्यरत असल्याचे दिसून येते. बदलीनंतर एक/ दोन महिने माननियांपासून मंत्रालयापर्यंत जाण्यासाठी वेळ जात असल्याने त्यावेळी मेडिकल व इतर शिलकीच्या रजा टाकायच्या, बदली रद्द होणार असे एकदा दिसून आले की, बदलीच्या कार्यालयात 10/12 दिवसांसाठी रुजु व्हायचे आणि पुन्हा आहे त्याच ठिकाणी पुन्हा कार्यरत व्हायचे अशी ही घनकचरा विभागातील बदल्यांची परंपरा आहे.
दरम्यान नॅशनल फोरम वृत्तपत्राने मागील 7/8 महिन्यांपासून पुणे महापालिकेतील मोकादम व आरोग्य निरीक्षकांच्या बदल्याचा मुद्दा लावून धरला होता. तसेच संबधित आरोग्य निरीक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) बदलीच्या ठिकाणी का रुजु होत नाहीत, याची सखोल मिमांसा आयुक्त व अति. आयुक्तांना निवेदनाव्दारे कळविल्यानंतर, तसेच वारंवार बातम्या प्रसारीत केल्यानंतर, मात्र पुणे महापालिकेच्या आयुक्तांना देखील पुणे शहरातील कचऱ्याचे आणि कचरा प्रकल्पांचे रहस्य उलगडले. त्यामुळे आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी कधी नव्हे तर मागील 10 वर्षात प्रथमच आरोग्य निरीक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या समुपदेशनाने केल्या. तरी देखील बहुतांश आरोग्य निरीक्षक बदलीच्या ठिकाणी रुजु झाले नाहीत. यामागे सहायक महापलिका आयुक्त म्हणजे वॉर्ड ऑफिसर यांचाच अडथळा ठरत आहे. वॉर्ड ऑफिसर आरोग्य निरीक्षकांना सोडण्यास तयार नाहीत, तसेच कुणी बदलीच्या ठिकाणी रुजु झाले तरी त्यांना आरोग्य कोठ्या देण्यात येत नाहीत. यामागे भल्लमोठ्ठ अर्थशास्त्र दडले असून, स्वतःचे आर्थिक गणित बिघडू नये यासाठी सर्वच चिंतेत असल्याचे मागील एक आठवड्यापासून मी स्वतः पाहत व अनुभवत आहे. महाराष्ट्र शासनाच्या बदली अधिनियमाची, घनकचरा विभागात एैशी की तैशी करण्यात आलेली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने हात वर केले –
दरम्यान दर सोमवारी पुणे महापालिकेत अभिलेखे पाहण्यासाठी खुले केले जातात. काल सोमवारी सामान्य प्रशासन विभागात आरोग्य निरीक्षक बदलीच्या कार्यालयात रुजु झाल्याच्या अहलाच्या अभिलेख्यांची मागणी केली. तथापी सामान्य प्रशासन विभागातील जन माहिती अधिकारी तथा अधीक्षक दिपक फणसे यांनी अभिलेख वहीवर नमूद केले की, सदर आरोग्य निरीक्षकांच्या बदली व रुजु अहवाल अद्याप पावेतो प्राप्त नाही. असा शेरा मारला आहे. याचा अर्थ आरोग्य निरीक्षकांच्या बदलीतील रुजु अहवाल संबंधित खातेप्रमुख यांनी सामान्य प्रशासन विभागास कळविला नाही. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने हात वर केले आहेत. सरळ सरळ आयुक्त नवल किशोर राम व अति. आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन यांच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षता आरोग्य निरीक्षक यांनी लावलेल्या आहेत. दरम्यान बदली आदेशातील परिच्छेद 5 वर स्पष्टपणे नमूद आहे की, या आदेशा व्यतिरिक्त प्रत्यक्ष कामकाजाच्या खात्यामध्ये परस्पर खातेस्तरावर बदल केल्यास संबधित सेवक व खातेप्रमुख यांच्या विरूद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. तसेच परिच्छेद 3 वर नमूद आहे की, बदली आदेशातील एकुण 53 आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या समुपदेशन करून करण्यात आल्या असल्याने अन्य ठिकाणी बदली करण्या करीता किंवा सध्याच्या खात्यात/ ठिकाणी ठेवण्याकरीता कोणत्याही प्रकारचा दबाव, शिफारस तसेच विंनती अर्जाची दखल घेण्यात येणार नाही असेही नमूद आहे. तथापी बदली आदेशातील कोणत्याही आदेशाची आज 10 दिवस झाले तरी अंमबलजावणी करण्यात आली नाही.
थोडक्यात काही प्रश्न अनुत्तरी आहेत ते-
- पुणे महापालिकेतील आरोग्य निरीक्षकांनी, आयुक्त व अति. आयुक्तांच्या बदली आदेशाला केराची टोपली दाखविण्याचे कारण काय आहे?
- आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांनी बदली आदेशांचे का उल्लंघन केले?
3.पुणे महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभाग आयुक्तांच्या आदेशाला ठोकरीने उडवून लावण्याची धमक यांच्यात येते तरी कुठून? - बदलीच्या अधिनियमाची घनकचरा व्यवस्थापन विभागात अंमबलजावणी का केली जात नाही?
- बदली कशी रद्द करावी किंवा बदली झाली तरी पुन्हा महिना पंधरा दिवसात पुन्हा मुळच्या ठिकाणी कसे यावे याबाबत घनकचरा विभागात गोपनिय प्रशिक्षण शिबीर घेतले जाते काय?
- मागील 10 वर्षात आरोग्य विभागात जेवढ्या बदल्या झाल्या आहेत, ते पुन्हा दोन/तीन महिन्यांच्या आतच मुळच्या ठिकाणी कार्यरत राहतात या मागचे नक्की इंगित काय आहे?
- बदली रद्द करणे किंवा बदलीचा आदेश कसा पायदळी तुडवावा यात घनकचरा विभागाचा सिंहाचा वाटा आहे हे मान्य केले जाते काय…?
