
काँग्रेसला 15 तर शिंदेसेना व मनसेला भोपळाही फोडता आला नाही, बारामती पार्टी 26+3
काँग्रेसला वंचितची मते हवीत परंतु उमेदवार नको म्हणणाऱ्यांना पुरोगामी आंबेडकरी जनतेचा जोर का झटका
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपाने एकहाती सत्ता खेचून आणली आहे. भाजपा-आठवले गटाने 120 जागा पदरात पाडून, आम्हाला आता कोणत्याही पक्षाची गरज नसल्याचे भाजपाने दाखवुन दिले आहे. तिकडे निवडणुकीच्या तोंडावर दोन राष्ट्रवादी एकत्र आणून निवडणुकीसाठी सामोरे गेलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अक्षरशः धुळदाण उडाली आहे. पुण्यामध्ये मोठा बोलबाला करूनही तसेच साम,दाम,दंड भेद नितीचा वापर करूनही अजित पवारांच्या हाती नेमकं लागलं तरी काय हे आत्तापर्यंतच्या मनसुब्यातून विचारणा करण्याची वेळ आली आहे. शरद पवार 3 तर अजित पवार गटाला 26 जागा मिळाल्या आहेत. शिंदेसेना आणि मनेला भोपळाही फोडता आलेला नसला तरी काँग्रेसने 15 जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. वंचितला पुणे महापालिकेत खाते उघडता आले नसले तरी मायक्रो ओबीसी, मुस्लिम व पुरोगामी आंबेडकरी मतदारांनी वंचितच्या पदरात मतांचे भरभरून दान टाकले आहे.
राज्यातील (शुक्रवारी ता 16) जाहीर झालेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालात त्यांनी भाजपलाच नव्हे तर महायुतीतील मित्रपक्षांनाही जोरदार यश मिळाले आहे. भाजपने जवळपास 9 महापालिकांवर स्वबळावर सत्ता स्थापन करत येईत इतका आकडा गाठला असून 29 पैकी 24 महापालिकांवर भाजप-शिंदेसेना युतीने वर्चस्व मिळवले आहे. काही ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी त्यांना मित्रपक्षांची सोबत घ्यावी लागणार आहे. महापालिकांमध्येही भाजप सर्वाधिक जागा मिळवत नंबर एकचा पक्ष ठरला असून जवळपास सर्वच ठिकाणी भाजपच्या जागा मागील वेळेपेक्षा वाढल्या आहेत.
तर शिवसेना ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी, मनसे यांना आपल्या आधीच्या जागा देखील मिळवता आल्या नाहीत. शिवसेना ठाकरे गटाला एक तर शिवसेना शिंदे गट व मनसेला भोपळाही फोडता आलेला नाही. अजित पवार गटाचीही स्थिती काहीशी तशीच आहे. काँग्रेसल्या त्यातल्या त्यात बऱ्या जागा मिळाल्या आहे, पण त्यांचीही कामगिरी मागील वेळेपेक्षा सुमार राहिली आहे. पुण्यातील काँग्रेसजनांना भलताच कॉन्फीडन्स आहे. काँग्रेसला जवळचा असला वंचितला दूर करून काँग्रेसने ठाकरे सेना व मनसेला जवळ केले. परिणामी काँग्रेसचा पारंपारिक मतदार दुखावला गेला. काँग्रेस-ठाकरे-मनसे युतीत काँग्रेसला फायदा झालेला असल्याचे दिसून येत आहे.
पुण्यात 165 कोणाला किती जागा मिळाल्या
भाजप -120
काँग्रेस -15
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) -3
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) -26
शिवसेना (ठाकरे गट) -1
शिवसेना(शिंदे गट) -0
मनसे -0
शिवसेना, मनसेला मोठ्या धक्का
शिवसेनेसह, मनसेची देखील पुणे महापालिकेतील सुरुवात निराशाजनक राहिली आहे. दोन्ही पक्षांना महापालिकेत साधे खातेही उघडता आलेले नाही. भाजपसोबत युती करून शिंदेची शिवसेना एकत्र लढणार होती. मात्र, जागा वाटपावरून भाजपने अखेरपर्यंत दोन्ही पक्षांचं जमलं नाही. युती होईल, इच्छेप्रमाणे जागा मिळतील या भ्रमात अखेरपर्यंत पक्षाचे स्थानिक नेते चर्चा करत राहिले, मात्र शेवटच्या दिवशी स्वबळाचा नारा दिला. शिंदेच्या शिवसेनेने 119 जागांवर उमेदवार उभे केले. मात्र व्यवस्थित नियोजन आणि सभा यांच्या अभावामुळे पक्षाच्या पदरी निराशा आल्याचं चित्र दिसून येत आहे.
दरम्यान शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुख नाना भानगिरे, महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मुलगा प्रणव धंगेकर, माजी उपमहापौर आबा बागूल यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. शहरात नेतृत्वाचा अभाव या निवडणुकीच्या पराभवामुळे ठळकपणे दिसून येत असल्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन सभा घेतल्या होत्या. पक्षाचे वरिष्ठ नेते, मंत्री उदय सामंत यांचेही लक्ष होते. सोबत विजय शिवतारे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे हेदेखील पुण्यावर लक्ष देऊन होते. मात्र, त्याचा अपेक्षित परिणाम पुणेकरांवर पडला नाही.
पुण्यात फक्त एका जागेवर पेटली मशाल
ठाकरेसेना, काँग्रेस आणि मनसे आघाडीने पहिल्यांदाच एकत्रित पुणे पालिका निवडणुकीला सामोरे गेले आहेत. परंतु 2017 मध्ये 10 जागा जिंकणाऱ्या शिवसेना (ठाकरे गट) यंदाच्या निवडणुकीत केवळ एकच जागा जिंकत त्यांनाही मोठा धक्का बसला आहे. एका जागेवर मशाल पेटवल्याचे चित्र आहे. शहरातील प्रभाग क्र. 16 क मध्ये ठाकरेंचे नितीन निवृत्ती गावडे यांनी विजय मिळवून शहरात मशाल पेटती ठेवली आहे.
ठाकरेंचे कल्पना थोरवे, माजी आमदार पुत्र प्रसाद बाबर, रूपेश मोरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. प्रमुख उमेदवारांचा पराभव झाल्याने ठाकरेंच्या जागा कमी झाल्या. शिवाय काँग्रेस आणि मनसेसोबत युतीचा फायदा झाला नसल्याचे दिसून आले. तसेच पुण्यात उद्धवसेनेच्या एकाही मोठ्या नेत्याची सभा न झाल्याने त्याचाही फटका ठाकरेसेनेला बसला आहे.
राष्ट्रवादीचे काटे फिरले
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे दोन गट एकत्र आले. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या पालिकेतील कारभारावर प्रचारात टीका केली होती. अजित पवार यांनी जाहीरनाम्यात मोफत मेट्रो, पीएमपी बस देण्याची घोषणा केली होती. या घोषणेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. “घोषणा करायला तुमच्या बापाचं काय जातं,“ आणि मोफत योजनेवरून खिशात नाही आणा, मला बाजीराव म्हणा, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर भाजपने पालिकेच्या तिजोरीत आणा ठेवला नाही. मी बाजीराव आहेच, असे प्रतिउत्तर दिले होते, पण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 30 जागा मिळाल्या, त्यामुळे घडळ्याचे काटे उलटे फिरले. हा निकाल अजित पवार यांच्या राजकीय वर्चस्वाला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे.
काँग्रेसला वंचितची मते हवीत पण उमेदवार नकोत-
काँग्रेस हा पक्ष स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतो. डाव्या विचारसणीचे लोक काँग्रेसकडे साहजिकच वळले जातात. काँग्रेसला सर्वाधिक जवळचा वंचित बहुजन आघाडी हाच पक्ष होता. तथापी काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीच्या पुरोगामी मायक्रो ओबीसी व आंबेडकरी मते हवी असतात, परंतु त्यांचे उमेदवार काँग्रेसला नको असतात असा इतिहास आहे. वंचित बहुजन आघाडी देखील, ओबीसी मधील मायक्रो ओबीसींना उमेदवारी देतात. ज्यांना राजकीय वारसा व पार्श्वभूमी नसते, ज्यांच्याकडे रग्गड पैसा नसतो, अशा सर्वहारा समाजाला राजकीय प्रतिनिधीत्वासाठी वंचितचे प्रयत्न सुरू असतात. तथापी काँग्रेसला राजकीय पार्श्वभूमी असलेला, निवडणूकी पैसे खर्च करणारा उमेदवार पाहिजे असतो. काँग्रेस अशा सर्वहारा समाजाला उमेदवारीही देत नाही, त्यामुळे मायक्रो ओबीसी व आंबेडकरी मतदार हा वंचितच्या बाजुने उभा ठाकला आहे. ह्याच मायक्रो ओबीसी व आंबेडकरी, पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या मतदारांची मते काँग्रेसला हवी असतात, परंतु त्यांचे उमेदवार नको असल्यानेच काँग्रेसचा राज्यात धुव्वा उडाला असल्याचे पहायला मिळत आहे.
पुणे महापालिकेत वंचित बहुजन आघाडीला खातेही उघडता आले नसले तरी पुरोगामी विचाराच्या मतदारांनी वंचितच्या पदरात मतांचे भरभरून दान टाकले असल्याचे पहावयास मिळत आहे. प्रत्येक उमेदवाराने दोन हजार ते पाच हजारापर्यंत उडी मारल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसची हीच खरी मळमळ आहे. लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करून प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना 5 हजार मतेही पदरात पाडून घेता येत नाही, परंतु दुसऱ्या बाजुला आदिवासी, मायक्रो ओबीसी, मुस्लिम, ख्रिश्चन समाजासह पुरोगामी आंबेडकरवादी उमेदवार खर्च करण्याची ऐपत नसतानाही एवढी मते कशी मिळतात हा प्रश्न काँग्रसेला नेहमी सतावत असतो.
काँग्रेसमुळे वंचित समाज सत्तेत आला तर काँग्रेसची भांडवलशाही टिकणार नाही हे काँग्रेसजनांना माहिती आहे. त्यामुळे आदिवासी, मायक्रो ओबीसी, मुस्लिम, ख्रिश्चन आणि आंबेडकरी उमेदवार काँग्रेसला नकोच आहेत हेच यावरून दिसून येत आहे. काँग्रेस वंचित सोबत असती तर लातुर सारखी त्सुनामी राज्यात आली असती. परंतु हेच पुण्यातील काँग्रेसवाल्यांना नको असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
