Thursday, July 9 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत रोज-मध्यरात्री गुन्हेगारांना उच्छाद, हद्दीत एवढं क्राईम वाढते तरी कसे…?

विद्यार्थ्यांची गर्दी कॅश करण्याठी गुन्हेगार पाळणे आणि पोसणे जसे धोकादायक आहे तसे, नवीन कारागृहे आणि कारागृहात नवीन कोठड्या बांधणे म्हणजे राज्य आणि शहरातील कायदा सुव्यवस्था मोडकळीस आल्याचे द्योतक आहे.- संपादक

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी समीक्षण/
काल बुधवार दि. 8 जुलै रोजी मध्यरात्रौ 3 वाजता सिंहगड कॉलेज कॅम्पस, लॉ कॉजेज रोड वरील हॉटेल बंद केल्याने, एका टोळक्याने फिर्यादीस मारहाण करून धारदार हत्याराने डोक्यात, हातावर व दोन्ही पायांवर वार केल्याची घटना घडली, याच दिवशी लेक टाऊन कात्रज जवळ मध्यरात्रौ 2.30 (अडीज) वाजण्याच्या सुमारास एका टोळक्याने जुन्या भांडणाच्या कारणांवरून धारदार हत्याराने फिर्यादीच्या पाठीवर वार केले, दुसऱ्याच्या डोक्यावर, कानावर वार केल्याची घटना घडली आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत, गुन्हेगारांना पोलीसांची भीतीच राहिली नसल्याचे दिसून येत आहे. आणि विशेष म्हणजे गुन्हेगारांचा हा उच्छाद दररोज मध्यरात्रीच चालत असल्याने, भारतीच्या हद्दीत एवढं क्राईम कसे वाढले हा गहन प्रश्न आहे.

ज्या पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या झोपडपट्टया आहेत, एसआरएच्या कॉलनी आहेत, चाळी आहेत, किंवा मध्यवर्ती शहरातील वाडे व चाळी आहेत, तिथे भांडणे व हाणामारी होणे हे नित्याचेच असते. परंतु ह्या भांडणात कुणी लोखंडी हत्यार वापरत नाहीत असाही अनुभव आहे. परंतु भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत फारशा झोपडपट्टया नाहीत, कॉलनी देखील नाहीत तरी देखील एवढं क्राईम कसे वाढले आहे हा सहज प्रश्न निर्माण होत आहे. 

भारती पोलीसांचे शौर्य दाखविणारे व्हीडीओ-
कालपरवा, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत उच्छाद घालणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांना भर पावसात, भर रस्त्यात सर्व नागरीकांसमोर गुडघ्यावर बसवुन, त्यांना चालविण्यात आले, वरून पोलीसांचा तिर्थप्रसाद सुरू होता. असे व्हिडीओ सोशलमिडीयावर प्रसिद्ध झाले आहेत. यापूर्वी देखील भारतीच्या पोलीसांचे शौर्य दाखविणारे व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाले आहेत. तरी देखील गुन्हेगारांच्या मनांत पोलीसांविषयी भय राहिले नाही याचे आश्चर्य वाटते.

दक्षिण पुण्यातील शिक्षणाचे माहेरघर-
दक्षिण पुण्यातील शिक्षणाचे माहेरघर असलेल्या भारती विद्यापीठ कॉलेज कॅम्पस, सिंहगड रोड कॉलेज कॅम्पस, सरहद्द कॉलेज कॅम्पस, बरोबरच इतर शेकडो शाळा, महाविद्यालये कार्यरत आहेत. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी असणे स्वाभाविक आहे. विद्यार्थ्यांची ही गर्दी कॅश करण्यासाठी याच हद्दीत छोटे मोठे हॉटेल्स, पथारी व्यावसायिकांचे (स्ट्रीट फुड) धंदे थाटले गेले आहेत. लहान मोठे हॉटेल्सच्या बरोबरच चायनिज गाड्यांवर प्रचंड गर्दी असते. त्यात विद्यार्थ्यांसोबतच दारूडे, गर्दूले देखील घुसलेले असतात. हा उद्योग मध्यरात्रौ पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू असतो. यांच्यावर पोलीसांचे नियंत्रण राहिलेले नाही. एनी टाईम मनी आणि एनी टाईम फुड ही इथली संस्कृती बनली आहे. यामुळेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत स्पा आणि मसाज पार्लरच्या नावाखाली दिवस-रात्र वेश्याव्यवसायाला बहार आला आहे.

भाई किंवा डॉन बनण्याची खुमखूमी-
काही चौकातील हॉटेलमध्ये बसून तर काही ठिकाणी फिरून मटका चिठ्ठया घेतल्या जात आहे. एनी टाईम मनी, एनी टाईम फुड बरोबरोच एनी टाईम वाईन सुविधा देखील येथे उपलब्ध आहे. तसे बारही मध्यरात्रौ 12 ते 2 वाजेपर्यंत सुरू असतात ही बाब वेगळी परंतु, मद्याच्या बाटल्या देखील सहज उपलब्ध होत असतात. गुन्हेगारांची जशी साखळी आहे, तशी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या एका बाजुला आंबेगाव पोलीस स्टेशन तर दुसऱ्या बाजूला सिंहगड रोड पोलीस स्टेशन आहे. तीनही पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारांना उच्छाद सुरू असतो. हॉटेल व्यावसायिक, चायनिज व्यावसायिक, बारचालक यांच्यासुरक्षेसाठी हीच गुन्हेगार मंडळी पोसली गेली असल्याचा संशय आहे. यात ज्या मुलांना भाई किंवा डॉन बनण्याची खुपच खुमखुमी आहे, अशा मुलांची निवड करून व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी ठेवले जात असल्याची चर्चा आहे. आता भाई किंवा डॉन बनण्यासाठी हीच मुले कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात असे बऱ्याचदा दिसून आले आहे. आता ही बाब भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला माहिती नाही असे म्हणणे अतिशोक्ती ठरेल.

भारतीच्या हद्दीत सर्वाधिक अग्निशस्त्र-
याच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत आजपर्यंत सर्वाधिक अग्निशस्त्र व लोखंडी हत्यारे पकडल्याच्या शेकडो बातम्या यापूर्वी प्रसारित झाल्या आहेत. म्हणजे गुन्हेगार, अग्निशस्त्र, लोखंडी हत्यारे हे सर्वच्या सर्व भारतीच्या हद्दीत अधिक मिळून येतात ही धोकादायक बाब आहे. भारतीचे पोलीस कसोशिने गुन्हेगारांना व त्यांच्याकडील शस्त्रे पकडतात ही अभिमानाची बाब आहे, परंतु हे सर्व भारतीच्याच हद्दीत कसे ह्या अनुत्तरीत प्रश्नाचे उत्तर कोणाकडे आहे….

नवीन कारागृहे व कारागृहातील नवीन कोठड्यांत वाढ-
नव्या पिढीमध्ये गुन्हेगारीचे आकर्षण वाढणे देशहिताचे नाही, दरम्यान येरवड्याच्या कारागृहात आजमितीस 18 ते 30 या वयोगटातील 80 टक्के बंदी आहेत. त्यात अंडरट्रायलची संख्या अफाट आहे. किशोर वयात गुन्हे केलेल्यांना धुळे येथे पाठविण्यात येते. परंतु पुढे 20/22 वर्ष झाल्यानंतर याच गुन्हेगारांना त्यांच्या त्यांच्या जिल्हा व मध्यवर्ती कारागृहात पाठवुन दिले जाते. येरवडा कारागृहात ही संख्या 80 टक्क्याच्या पुढे गेली आहे ही वस्तुस्थिती आहे. आता तर मोशी येथे देखील नवीन कारागृह बांधून पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. येरवडा कारागृहातच नवीन कोठड्या बांधल्या जात आहेत. कारागृहे आणि कारागृहातील कोठड्यांची नवीन बांधकामे म्हणजे, शहरात कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न गंभिर झाल्याचे द्योतक आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पाळणाऱ्या व पोसणाऱ्यांवर प्रथम कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा इथुन पुढे सर्वसामान्यांना रस्त्यावर फिरणे देखील मुश्किल होईल यात शंकाच नाही.