
नॅशनल फोरम/पुणे/दि/
पुणे महानगरपालिका चाळ विभागाच्या एकूण 30 मनपा व बिगर मनपा वसाहती असून सदरच्या वसाहतीमध्ये एकूण 3 हजार 459 सदनिका आहेत. मात्र या वसाहतीमध्ये अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर क्षेत्रिय कार्यालयांनी थेट कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिले आहेत.
सदनिका वाटप समिती उपविधी 2011 नुसार मनपा वसाहतीमधील वर्ग 1 ते 4 मधील मनपा सेवकांना सदनिका वाटप करण्यात येत आहेत. मनपा सेवकांच्या दरमहाच्या वेतनातून त्यांना देय असलेले घरभाडे कपात केली जाते. तसेच पुणे महानगरपालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील घाण भत्ता देय असणाऱ्या सेवकांच्या त्यांच्या सेवानिवृत्ती ऐडीक सेवानिवृत्ती व मयत या कारणाने त्यांच्या वारसांची त्यांच्या जागी नियुक्ती झाल्यानंतर सदरची सदनिका वारसांच्या नावे हस्तांतरण करणे. तसेच सेवानिवृत्ती ऐच्छीक सेवानिवृत्ती सेवकांना निवृत्ती वेतन व मयत सेवकांच्या वारसांना कुटुंब वेतन प्रकरणी चाळ विभागाकडील नाहरकत दाखला देणे या बाबतचे कामकाज चाळ विभागामार्फत करण्यात येते. दरम्यान पुणे महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये वसाहतीची देखभाल व दुरुस्ती विषयक कामकाज करणेकामी चाळ विभागाकडे कोणतीही तरतूद उपलब्ध नाही.
पुणे मनपा चाळ विभागाकडील वसाहतींची देखभाल व दुरुस्ती करण्याबाबतची कार्यवाही पुणे मनपाच्या क्षेत्रीय कार्यालय व भवन रचना विभागामार्फत करण्यात येते. चाळ विभागामध्ये उपअधीक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक व शिपाई हाच संवर्ग उपलब्ध असून चाळ विभागामध्ये कनिष्ठ अभियंता, उपअभियंता हा तांत्रिक संवर्ग उपलब्ध नाही. त्यामुळे चाळ विभागाकडील वसाहतीच्या हद्दीमध्ये होणारे अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमण होत असल्याने वारंवार नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करणे अडचणीचे होत असून त्यांच्या रोषास सामोरे जावे लागत असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.
या अनुषंगाने चाळ विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व वसाहतीच्या हद्दीमध्ये होणारे अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमणची कार्यवाही क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर करण्यात यावी व याबाबत उपआयुक्त मनपा वसाहत व्यवस्थापन (चाळ विभाग) यांच्याशी समन्वय साधण्यात यावा असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.
