Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील येरवडा अन्नधान्य कार्यालयाचा भोंगळ कारभार, दुकानदारांकडून मात्र भेटवस्तुंचा भडीमार

Rationing-Office-Yerwada

पुणे/दि/ प्रतिनिधी/

            पुणे शहरातील येरवडा अन्नधान्य वितरण कार्यालय अर्थात रेशन कार्यालयाचा भोंगळ कारभार सर्वश्रृतच आहे. गरजुंना अन्नापासून वंचित ठेवायचे आणि काळ्या बाजारात सरकारी अन्न धान्याची सर्रास विक्री करायची याची मोठी स्पर्धा रेशन दुकानदारांमध्ये सुरू असते. त्यात भरीस भर महा-ई-सेवा केंद्रच येरवडा अन्नधान्य कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी कार्यरत असल्याने महा ई सेवा केंद्र सोन्याहून पिवळी झालेली आहेत. त्यातच काही रेशन दुकानदारांकडून अन्नधान्य वितरण अधिकारी श्री. खताळ आणि आशा स्वामी यांच्यासाठी भेटवस्तुंचा एवढा भडीमार होताय हे पाहून सर्व सामान्य नागरीक आणि स्वयंसेवी संघटनांकडून या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी करीत आहेत.

            राज्य शासनाने थम्ब इप्रेशन मशिन्स आणल्या तरी बीपीएल व अन्न सुरक्षा योजनेच्या अन्नधान्याचे संबंधित लाभार्थ्यांना वितरण केले जात नसल्याची ओरड आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या नागरीकांना उलट उत्तरे देवून पिटाळून लावले जात आहे. दरम्यान येरवडा अन्नधान्य वितरण कार्यालयात सध्या कार्यालयाच्या आस्थापनेवर नसलेली काही मंडळी  येवून शासकीय कामकाज करीत असल्याचे दिसून येत आहे. या कार्यालयात कपिल नावाचा इसम ही कामे करीत असल्याचे दिसून येत आहे.

            सध्या येरवडा अन्नधान्य वितरण कार्यालयाशी निगडीत असलेले महा ई सेवा केंद्रावर श्री.खताळ व आशा स्वामी यांचा वरदहस्त आहे. त्यामुळेच ज्या ५० रुपयांच्या प्रतिज्ञापत्रासाठी २०० रुपये नागरीकांना मोजावे लागत आहेत. रेशनकार्डात नवीन नाव दाखल करणे, नाव कमी करणे, वा इतर दाखल्यांसाठी महा ई सेवा केंद्रात गेल्याशिवाय कामे होत नाहीत. अधिकारी व कर्मचारीच त्यांना महा ई सेवा केंद्रात जाण्याचे आदेश देतात. त्यामुळे येरवडा अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या बाहेर बाजूस असलेल्या महा ई सेवा केंद्रात नेहमीच गजबज असते. या केंद्राच्या चालक मिरा जंगम असल्या तरी नियंत्रण मात्र या कार्यालयातील कर्मचारी सौ. आशा स्वामी यांचे असल्याचे सांगण्यात येते.

            सौ. आशा जंगम ह्या येरवडा येथील शासकीय निवासस्थानात राहत आहेत. त्यामुळे येरवडा भागातील बहुतांश दुकानदार, महा ई सेवा केंद्र चालक, राजकीय पुढारी यांच्याशी संपर्क आहे. त्यामुळे बहुतांश रेशनदुकानदार, महाई सेवा केंद्र चालक व राजकीय पुढारी सौ. आशा स्वामींशी जवळीक करून असल्याचे समजते.

शनिवारी देखील उशिरापर्यंत कार्यालय सुरू होते-

काल शनिवार दि. २३ फेब्रूवारी २०१९ रोजी चौथा शनिवार असल्याने शासकीय कार्यालये बहुतांश बंद असतात. परंतु काल शनिवारी देखील येरवडा रेशनिंग कार्यालय उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे. दरम्यान येरवडा रेशन कार्यालयातील काही महत्वाचे रजिस्टर सौ. आशा स्वामी ह्या घरी घेवून जात असल्याचे दिसून आल्याने या सर्व गंभिर प्रकरणांची चौकशी करण्याची सामाजिक संघटनांकडून मागणी होत आहे.