Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशन म्हणजे रिअल इस्टेटचे जंक्शन

Market yard police

खाकीचा धाक दाखवुन गाळा खरेदी विक्री करणं, जुन्या भाडेकरूला दम देवून काढून टाकणं, जागा, गाळे खाली करून देणं हा नव्याने सुरू केलाय धंदा


पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी हे आयुक्तालयाअंतर्गत येणार्‍या हद्दीतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम सातत्याने करीत आहेत. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावात देखील पोलीसांनी अत्यंत जिद्दीने आणि चिकाटीने त्याचा मुकाबला करून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम केलं आहे. राज्यातील व पुण्यातील बहुतांश वृत्तपत्रांनी व प्रसार माध्यमांनी पोलीसांचे कौतूक केले आहे. परंतु दुधात मिठाचा खडा पडावा असे कृत्य मार्केटयार्ड पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचार्‍यांचे दुर्वतन सुरू असल्याची बाब दिसून आली आहे.
मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असून, दररोज शेकडो वाहने आणि हजारोंनी नागरीक येथे खरेदी विक्री करण्यासाठी येत असतात. त्याच नियोजन करण्याच सोडून, मार्केटयार्ड पोलीसांनी आता पोलीस खात्यातील नोकरी बरोबरच खाकीचा धाक दाखवुन रिअल इस्टेटचा धंदा सुरू केला असल्याचे दिसून येत आहे.
मार्केटयार्डातील फळभाजीपाला विभाग, फुल बाजार, तसेच गुळ भुसार विभागातील बहुतांश गाळेधारकांनी आपले स्वतःचे गाळे बाजार समितीची कोणतीही मंजुरी न घेता परस्पर भाड्याने दिले आहेत. तसेच गाळ्या समोरील जागा देखील भाड्याने दिली गेली आहे. त्यामुळेच फळ विभागात बहुतांश गाळे धारकांनी गाळ्याच्या समोर पत्र्याचे शेड टाकुन त्या जागेचाही वापर भाड्याने देण्यासाठी केला जात आहे.


एखाद्याचा गाळा भाड्याने दयायचा असेल, एखादया भाडेकरूने गाळा खाली करून देण्यास नकार दिला किंवा टाळत असेल तर कायदयाच रक्षक असलेले मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमधील काही पोलीस अधिकारी व कर्मचारी हे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या अधिकार व पदाचा आणि खाकीचा वापर करून, कुणाला गाळा भाड्याने दयायचा आणि एखादा भाडेकरू गाळा रिकाम करून देण्यास टाळाटाळ करीत असेल तर संबंधिताला पोलीस स्टेशन मध्ये बोलावून त्याला खाकीचा धाक दाखवुन, स्टॅम्पपेपर लिहून गाळा खाली करून देण्याचे काम देखील मार्केटयार्ड पोलीस स्टेशन मधील कर्मचारी करीत आहेत.
दरम्यान मार्केटयार्ड आंबेडकर नगर येथील झोपडपट्टीत देखील घर खरेदी करणे, भाड्याने दिलेले घर, भाडेकरू खाली किंवा रिकामे करून देत नसेल तर अर्जदाराकडून तक्रार अर्ज स्वतः तयार करून, तो पोलीस स्टेशन मध्ये दाखल करणे आणि त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने, भाडेकरूला बोलावून घेणे आणि खाकीचा धाक दाखवून, त्याला घर खाली करून देण्याचे काम मार्केटयार्ड पोलीसांनी सुरू केले आहे. काल शनिवारी देखील आंबेडकर एका इसमाला बोलावून, तुझ्याकडे घराचे खरेदीखत आहे काय, तु लाईट बील दाखवतोय, आधार कार्ड दाखवतोय, पॅन कार्ड दाखवतो, शॉप ऍक्ट लायसन दाखवतोय, पण खरेदीखत आहे काय अशी विचारणा करून, तुला हे प्रकरण अतिशय महागात जाणार आहे अशी धमकी देवून त्याचे घर खाली/रिकामे करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान मार्केटयार्ड आंबेडकर नगर येथील जागा ही गोवर्धन सोसायटीची जागा आहे. ती खरेदी विक्री करण्याचा किंवा भाड्याने देण्या घेण्याचा कुणालाच अधिकार नाही. पुणे महापालिकेने निव्वळ नागरीकांच्या सुविधेकरीता ही झोपडपट्टी घोषित करून, तेथे नागरी सुविधा पुरविल्या आहेत. धोरणात्मक कामे करण्यासाठी पुणे महापालिकेला देखील मूळ मालकाच्या मान्यतेने काम करावे लागते हा नियम आहे. दरम्यान आंबेडकर नगर झोपडपट्टीत अशा प्रकारे घर दुकाने खरेदी विक्री करण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. तसेच घर दुकाने खाली करण्यासाठी मार्केटयार्ड पोलीसांच्या खाकीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याची माहिती स्थानिक वार्ताहर व नागरीकांनी कळविले आहे.
मार्केटयार्ड बाजार समितीमधील बहुतांश खरेदी विक्रीच्या प्रकरणांत मार्केटयार्ड पोलीसांचा थेट सहभाग येत असून, सर्वसामान्य नागरीक, व्यापारी व गाळेधारक घाबरलेले आहेत. दरम्यान या सर्व प्रकरणी पुणे शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त श्री. सुहास बावचे यांनी या प्रकरणी लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे.