Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे शहरात दरोड्याचे सत्र सुरूच, पोलीस अभिलेख्यातील एफआयआर मध्ये नोंद असलेले अज्ञात इसम नावाचे दरोडेखोर सापडणार आहेत तरी कधी

Pune darodey

पुणे/दि/ प्रतिनिधी/
नोटाबंदी आणि आता कोरोना महामारीच्या संकटामुळे प्रजासत्ताक सार्वभौम गणराज्यातील नागरीक सध्या धास्तावले आहेत. नोटाबंदीत मध्यम व लघु उद्योग बंद पडले, आता कोरोना महामारीच्या संकटामुळे कुटीरोद्योग व मोठ्या उद्योगांना घरघर लागली आहे. या महामारीत कोट्यवधी लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. परंतु ज्यांना नोकर्‍याच नव्हत्या, परंतु नोकरीसाठी प्रयत्न करीत होते, ते कोट्यवधी बेरोजगार तरूण कोरोना महामारीच्या संकटामुळे अधिकच्या संकटात पडले आहेत. शिक्षण आहे, डिग्री आहे, पण नोकरी नसल्यामुळे हा वर्ग उद्याच्या आशेवर जीवन जगत आहे. परंतु उद्याच्या आशेचा किरण देखील दिसायला तयार नाहीये. यात कोरोना महामारीमुळे सर्व नागरीक धास्तावले असतांनाच, पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वांचा आटापिटा सुरू आहे. आजचा दिवस भागला, आता उदयाचे काय ह्या काळजीने सर्व नागरीक जगत आहेत. महाराष्ट्रात १९७२ साली दुष्काळ पडला होता, त्याच्या अगोदर अशी परिस्थिती होती. ७२ ते ८० या काळात केंद्र सरकारच्या खंबिर धोरणामुळे ऐंशीच्या दशकानंतर, हळुहळु देश आणि नागरीक सावरत गेले परंतु आज २०२० मध्ये पुन्हा १९७२ हे वर्ष अवतारल्या सारखे दिसत आहे. थोडक्यात मध्यवर्ती शासन खंबिर असेल तर दुष्काळ असो की महामारी या सर्वांवर उपचार करता येतात. परंतु मध्यवर्ती शासनच जर सरकारी कंपन्या विकुन खाजगीकरणाचा सपाटा लावत असेल तर नेमक जायचं तरी कुठं हा गहन प्रश्‍न आहे. गावात कामधंदा नाही म्हणून शहरात आलेले लोंढेच्या लोंढे आता विचार करू लागले आहेत की, आता शहरातही काम राहिले नाही. आणि आपलं गाव कुठं आहे त्याचा पत्ताच राहिला नाही. आज अशी अवस्था आणून ठेवली आहे. त्यातुन शहरी भागात गुन्हेगारी वाढत चालली आहे. खुन, दरोडे, हाणामारी, छोट्या छोट्या कारणांमुळे देखील खुन्नसबाजी वाढत चालली आहेत. जीवन जगण्याची सर्वांची धडपड सुरू आहे.


एवढं सगळ विवेचन करण्याची आवश्यकता अशी की, संपूर्ण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यत पुणे शहरात दरोड्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. सोनसाखळी चोरी ही तर नित्याची बाब होती. परंतु घर कुलूपबंद असतांना, कुणीतरी अज्ञात इसम घराचे कडी कोयंडे उचकटून चोरी करीत असेल तर बोंब मारायची तरी कुठ हा प्रश्‍नच आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या दप्तरी अज्ञात इसमाने चोरी केली असेच जर नियमित चोरीच्या घटनाप्रसंगी एफआयआरमध्ये येत असेल तर ज्याच सर्वस्व लुटल जात, घरातील किडूक मिडूक चोरीला जातं तेंव्हा काय कराव आणि काय करू नये असा साहजिकच प्रश्‍न सर्वसामान्यांच्या डोक्यात घोळत असतो.


नॅशनल फोरम वृत्तपत्राने नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांवर आवाज उठविला आहे. कंगणाच काय झालं… ह्या नटीनं ड्रग घेतलं… त्या हिरोने मफॅड्रोन, ड्रग घेतलं… आता कालपासून संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट का झाली… गण्याचं काय झालं… बाळ्याच काय झाल… असल्या नको त्या प्रश्‍नांवर वारेमाप बातम्या प्रसारित करून, सर्वसामान्यांचे लक्ष इतरत्र वळविण्याचा आमचा कधीच प्रयत्न नसतो. आता काही वेब मिडीया देखील जनतेच्या प्रश्‍नांवर थोडथोडकसं बोलतोय पण, जेवढी जागृती आवश्यक आहे, तेवढी होत नाही.
मराठा आरक्षण देणार आहात की नाही, न्यायालयाची नेमकी कोणतीही भूमिका आहे, कोणत्या कारणांमुळे न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण होते नव्हते ते देखील काढुन घेतले, राज्य सरकारने बाजू व्यवस्थित मांडली काय… ज्यांच्या नोकर्‍या गेल्या आहेत, त्याबाबत दुःख तर आहेच परंतु ज्यांना नोकर्‍या नव्हत्या, जे बेरोजगार आहेत, त्यांचे काय… जिल्हा नियोजन किंवा जिल्हा उद्योग, वा इतर महामंडळाकडून उद्योग उभारणीसाठी अर्थसहाय्य आणि उत्पादन ते विक्री पर्यंत कर्जाचे हप्ते भरण्यासाठी टाईम पिरीयड देणार आहेत काय… शासनात तशी तरतूद नसेल तर सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपण शासनापर्यंत आवाज उठविणे आवश्यक आहे.. समस्या अनेक आहेत… परंतु दैनिक असो की खाजगी वृत्तपप्रसारण करणारे टिव्ही चॅनेल्स.. उठ सुट कंगणा आणि ड्रग, ह्याच्या शिवाय यांच्याकडे बातमच्याच दिसत नाहीत. इथ महागाईचा आगडोम उसळलाय, सिलेंडर चढ्या दराने विकत आहेत… दिवाळी जवळ येत असल्याने तूर डाळीची पुण्यात साठवणूक सुरू आहे… नोव्हेंबरपर्यंत तूर डाळ १५० ते २०० रुपये किलोपर्यंत जाण्याचा संभव आहे.. कडधान्याची व्यापार्‍यांकडून साठवणूक सुरू आहे… याच्यावर बोलणेच अधिक महत्वाचे असतांना, शहरात सुरू असलेल्या गुन्ह्यांबाबत आज सादरीकरण करीत आहोत. गुन्हेगार अज्ञात आणि सापडत नाही अशी कारणे कायदा आणि सुव्यवस्था राखणार्‍या शासन यंत्रणेला न शोभणारी आहेत. अज्ञात इसम किंवा अज्ञात चोराटा हा काही परग्रहावरून आलेला नाही. तो जवळचाच असणार यात शंकाच नाही. मग गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एवढा विलंब का होत आहे…. दिवसात १०/१० दरोड्याच्या घटना घडत असतील तर पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था नेमकी आहे तरी कुठे… असा साहजिकच प्रश्‍न उद्भवत आहे. तशी सप्टेंबरच्या शेवटच्या १५ दिवसातील काही घटना समोर आल्या आहेत.


विश्रामबाग पोलीस स्टेशन –
विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीतीतील पीएमसी कॉलनी, राजेंद्र नगर येथील फिर्यादी संज्योत कोंढरे वय ३५ यांनी फिर्याद दिली आहे की, २२/९/२०२० रोजी मध्यरात्री २ ते सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास राहते घर कुलूप लावून बंद असतांना, कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे राहत्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप कशाचे तरी सहाय्याने उचकटून त्यावाटे आत प्रवेश करून, बेडरूम मधील कपाटातील सोन्याच ेदागिने असा एकुण १ लाख ४६ हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला आहे अशी नोंद केली आहे. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. समाधान कदम करीत आहेत.


कोंढवा पोलीस स्टेशन –
कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील श्रीकुंज सोसायटी व्हीआयटी कॉलेज जवळ, कोंढवा बु॥ येथील फ्लॅट क्र. बी ११ व बी १२ हे दोन्ही फ्लॅट कुलूप लावून बंद असतांना कुणीतरी अज्ञात इसमाने दोन्ही राहते फ्लॅटचे मुख्य दरवाजाचे कुलूप कशाचे तरी सहाय्याने उचकटॅन त्यावाटे आत प्रवेश करून सोसायटी मधील दोन्ही फ्लॅट मध्ये घरफोडी करून चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद कावेरी दोरगे वय ५३ वर्षे यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक उजणे हे करीत आहेत.


माहिती तंत्रज्ञान म्हणजे सायबर गुन्हेगारांसाठी हात की सफाई – सर्वसामान्यांसाठी मात्र दोन पैसे मिळविण्याची लालसा –
चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन –

मालोजी नवले वय २८ वर्षे रा. गोखले नगर पुणे यांनी फिर्याद दिली आहे की, माझ्या मोबाईलवरून एका इसमाने फोन करून मी नामांकित खाजगी बँकचा कस्टमर केअर वरून बोलत आहे असे सांगुन त्यांना खात्याचे स्टेटमेंट देण्याचे आमिष दाखवुन तशी मोबाईालवर लिंक पाठवुन त्यामध्ये मालोजी नवले यांच्या बँके खात्याची गोपनीय माहिती भरण्यास भाग पाडून, त्यांच्या बँक खात्यावर ४ लाख ६२ हजार ५३९ रुपयांचे कर्ज मंजुर करून ती रक्कम दुसर्‍या बँक खात्यात ट्रान्सफर करून मालोजी नवले यांची फसवणूक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक करीत आहेत.


फरासखाना पोलीस स्टेशन –
फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत ऑनलाईन माध्यमाव्दारे एका ५५ वर्षे वयाच्या महिलेला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून तुम्ही एस.बी. आय. के्रडीट कार्डचा अद्याप पर्यंत वापर केला नसल्याने त्याचा पिन नंबर मी जनरेट करून तो चालु करून देतो असे सांगुन फिर्यादी यांची वैयक्तिक माहिती घेवून त्यांचे एसबीआय केे्रडीट कार्डावरून चार वेळा ट्रान्झेक्शन करून त्यांच्या खात्यातून ६१ हजार ५७४ रुपये ऑलनाईन ट्रान्झेक्शन करून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे दादासाहेब गायकवाड करीत आहेत.


नोकरीचे आमिष दाखवुन फसवणूक –
कोथरूड पोलीस स्टेशन –

कोथरूड येथील एक महिलेने फिर्याद दिली आहे की, फिर्यादी यांच्या राहत्या घरी ऑनलाईन माध्यमांव्दारे एका अज्ञात मोबाईलधारक महिला हिने तसिेच एका कंपनीच्या एच.आर. यांनी संगनमत करून फिर्यादी यांना फोन करून, तुम्हाला एका कंपनीमध्ये ऍप्लीकांट सपोर्ट इंजिनीअर या पोस्टसाठी चांगल्या पगाराचे नोकरी देण्याचे आमिष दाखवुन फिर्यादी यांच्याकडून ३३ हजार ३४० रुपये घेवून त्यांना नोकरी न लावता त्यांचे पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे के. बी. बालवडकर करीत आहेत.


वरील सर्व गुन्हे हे एका दिवसात घडले आहेत. एकाच दिवसात ३० पोलीस ठाण्यापैकी दोन/दोन गुन्हे घडत असतील तर दर दिवसाला ६० गुन्हे, तर दर महिन्याला १८०० गुन्हे घडत आहेत. पोलीसांची संख्या मुळातच कमी आहे. एका एका पोलीसाकडे दरोड्याचा तपास दिला तर इतर गुन्ह्यांचा तपास कधी लागणार हा प्रश्‍नच आहे.
दरम्यान हेल्मेट आणि मास्कच्या कारवाईचा अधिभार देखील पोलीसांवर असल्यामुळे तपास करण्यापेक्षा महसुल गोळा करण्याकडेच पोलीसांचा अधिक कल राहिला आहे. त्यामुळे खरे गुन्हेगार सापडणार तरी कधी हा प्रश्‍नच आहे.