Monday, November 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

टीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड

नवी दिल्ली/दि/  मागील अनेक दिवसांपासून टीकेचा मारा सहन करत असलेले सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी अखेर मौन सोडत टीकाकारांवर पलटवार केला. न्यायव्यवस्था किंवा व्यवस्थेवर टीका करणे खूप सोपे आहे. परंतु व्यवस्थेला योग्य दिशेने बदलणे आणि त्यात सातत्य कायम ठेवून ती मजबूत करणे फार अवघड आहे, असे ते म्हणाले.

                ७२ व्या स्वातंत्र्या दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालय परिसरात ध्वजारोहणप्रसंगी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमुर्तींनी पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवर टीका केल्यानंतर सुमारे ८ महिन्यानंतर न्या. मिश्रा यांनी सार्वजनिक मंचावरून मौन सोडले.

                ठोस आणि मजबूत सुधारणा तर्कसंगतता, परिपक्वता, जबाबदारी आणि स्थिरतेनेच घडवता येऊ शकतात. यासाठी काऊंटर प्रॉडक्टिव्ह ऐवजी प्रॉडक्टिव्ह होण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला.

                 न्यायव्यवस्थेत कार्यरत असलेले काही वकील टॉक शो किंवा इतर ठिकाणी न्यायाधीशांवर टीका करतात, त्यांच्यासाठी हे न्या. मिश्रा यांचे वक्तव्य होते, असे बोलले जात आहे.

                दरम्यान,दीपक मिश्रा हे सरन्यायाधीश झाल्यापासून वादात अडकले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या काही न्यायाधिशांनी न्या. मिश्रा यांच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्‍न उपस्थित केले होते. न्या. मिश्रा यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला होता. 

                न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी न्या. मिश्रा यांच्यावर टीका केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासन व्यवस्थित काम करत नसून लोकशाहीसाठी हे धोकादायक असल्याचा आरोप या चार न्यायाधीशांनी केला होता.