Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते उघड पैसे खात , तर भाजपकडून कॉर्पोरेट भ्रष्टाचार : आंबेडकर

prakash-ambedkar

सोलापूर/दि/ प्रतिनिधी/

                 सर्वसामान्यांच्या पैशावर आजवर कॉंग्रेस व राष्ट्रवादीसह भाजप-शिवसेनेने डल्ला मारला. फरक इतकाच, की कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उघड पैसे खात होते, तर भाजपकडून कॉर्पोरेट भ्रष्टाचार केला जातोय’’, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी सोलापुरात आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या महाअधिवेशनात केला.  

                बाळासाहेब आंबेडकर पुढे म्हणाले ,२०१४च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्‍वासने अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. मोदी हे सर्वाधिक खोटारडे पंतप्रधान आहेत. पुण्यातील सभेत मोदी यांना चोर म्हटल्याने माझ्यावर गुन्हा दाखल झाला. परंतु, माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले, तरीसुद्धा मी त्यांना चोरच म्हणणार. भाजपची मोदी लाट घालविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीसमवेत कॉंग्रेसला घेऊ. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलवरून भाजपवर टीका केली. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी त्यांचे आरोप फेटाळले. त्यामुळे आता कॉंग्रेस राष्ट्रवादीसमवेत युती करणार का? त्यांची नीतिमत्ता पाहावी लागेल.

                भाजप सरकार ७१४ कोटी रुपयांचे राफेल विमान तब्बल एक हजार ६०० कोटी रुपयांना खरेदी करत आहे.

                दुसरीकडे त्याच्या देखभाल-दुरुस्तीवर वर्षाला तब्बल एक लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याची जबाबदारी अदानी-अंबानी यांच्या कंपनीकडे देऊन त्याद्वारे पक्षनिधी उभा करण्याचा घाट भाजपकडून घातला जात असल्याचा आरोप  ऍड.  आंबेडकर यांनी केला.  

                 या वेळी पद्मश्री लक्ष्मण माने, आमदार बळिराम शिरसकर, माजी आमदार ऍड. विजय मोरे, अर्जुन सलगर, एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख, समीउल्ला शेख, शिवानंद हैदापुरे, जयसिंग शेंडगे, डॉ. इंद्रकुमार भुसे, अरुण जाधव, शंकरराव लिंगे, शफी हुंडेकरी, अश्‍विनी राठोड, डॉ. दशरथ भांडे, राजाभाऊ शिंदे, बबन जोगदंड, विष्णू गायकवाड, श्रीशैल गायकवाड, भारती कोळी, विश्रांती भुसनर, राजन दीक्षित आदी उपस्थित होते.