Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

येरवडा अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांच्याकडून जिल्हाधिकार्यांचा अवमान

Yedwada-FDO-office

आशा स्वामींवर शहर व येरवडा अन्नधान्य वितरण कार्यालय एवढे मेहेरबान कसे…

येरवडा अन्नधान्य वितरण कार्यालयात महा-ई-सेवा केंद्र चालकांची तुफानी लुटालुट, काही दुकानांना धान्याचा कोटा वाढविला, तर काही दुकानदारांकडून अन्न सुरक्षेचे धान्य वाटपात कमालिची लुच्चेगिरी

          पुणे/दि/ प्रतिनिधी/

          येरवडा अन्नधान्य वितरण कार्यालय म्हणजे वर्षानुवर्षे अनागोंदी कारभाराचं भव्य प्रदर्शन. शिधापत्रिकेतील नाव वाढविणे, नाव कमी करणे, आरोग्य सुविधेसाठी पिवळी शिधापत्रिका, जवळच्या दूकानदारांना धान्य कोटा वाढविणे, थैली न देणार्‍यांचा धान्य कोटा कमी करणे किंवा बंद करणे ह्या सारख्या घटना दर दिवशी येरवडा अन्नधान्य वितरण कार्यालयात होत असतात. मागील काही वर्षात तर राष्ट्रीय अन्न सुरक्षेचे अन्नधान्याचे वाटप काही दुकानदार करीत नाहीत. याबाबतच्या तक्रारी वारंवार करण्यात आल्या परंतु येरवडा अन्नधान्य वितरण अधिकारी श्री. प्रशांत खताळ आणि शहर अन्नधान्य वितरण कार्यालय मूग गिळून गप्प आहे. खरं तर येरवड्यातील या अनागोंदी कारभारावर शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाचे लक्षच नसते.

          अशाच काही बाबी समोर आलेल्या आहेत. येरवडा अन्नधान्य वितरण कार्यालयातील लिपिक टंकलेखक या वर्ग तीनच्या पदावर मागील सात/ आठ वर्षापासून श्रीमती अशा व्यंकट स्वामी या महिला कर्मचार्‍याची नियुक्ती केलेली आहे. या आशा स्वामी यांची बदली जिल्हाधिकारी कार्यालय पुणे महसुल शाखा यांनी ३१ मे २०१६ रोजी पमई/११११/(३३) दोन अन्वये करण्यात आली होती. तथापी आज फेब्रुवारी २०१९ साल उजाडले तरी श्रीमती आशा स्वामी यांना कार्यमुक्त करण्यात आले नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयाचा अवमान

          सर्वसाधारण बदल्या २०१६ आदेशान्वये दि. २० जुन २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी त्यांच्याकडील नायब तहसिलदार, अव्वल कारकुन / मंडळ अधिकारी व लिपीक टंकलेखक यांच्या बदली बाबत खरमरीत आदेश जारी केला आहे. या आदेशामध्ये जिल्हाधिकारी पुणे यांनी नमूद केल ेआहे की, ज्या अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या झालेल्या आहेत, अशा बदली झालेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना दिनांक ३१/५/२०१६ रोजी मध्यान्होत्तर कार्यमुक्त करणेत यावे व तसा अहवाल या कार्यालयास सादर करणेत यावा असे सुचित केले होते. संबंधित कर्मचार्‍यांचे वेतन व भत्ते दिनांक ३१/५/२०१६ नंतर सदर पदावर काढणेत येवू नयेत असेच अधिकारी व कर्मचारी यांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र, मुळ सेवा नोंद पुस्तक अद्ययावत करून १५ दिवसात संबंधित कार्यालयास सादर करावे असे सुचित केलेले असून सुद्धा आज अखेर ज्या कार्यालय प्रमुखांनी संबंधित कर्मचार्‍यांना कार्यमुक्त केले नाही, त्या कार्यालय प्रमुखाविरूद्ध मी दिलेल्या (जिल्हधिकारी पुणे) आदेशाचा अवमान केला असे गृहित धरून कारणे दाखवा नोटीस न देता शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे खरमरीत आदेश २०१६ रोजी देण्यात आला होता.

          तथापी येरवडा अन्नधान्य वितरण कार्यालय प्रमुख श्री. प्रशांत खताळ यांनी जिल्हाधिकारी पुणे यांचा जाणिवपूर्वक अवमान करून, त्यांच्याकडील लिपीक टंकलेखक श्रीमती आशा व्यंकट स्वामी यांना कार्यमुक्त केले नाही. त्यामुळे श्री. प्रशांत खताळ यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई नेमकी कधी होणार अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

आशा स्वामींवर शहर येरवडा अन्नधान्य वितरण कार्यालय एवढे मेहेरबान कसे

          येरवडा अन्नधान्य वितरण अधिकारी श्री. प्रशांत खताळ व आशा स्वामी यांच्या कार्यपद्धतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे व शहर अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे यांच्याकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान आशा स्वामी यांची बदली झालेली असतांना देखील त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे आशा स्वामी यांच्यावर शहर व येरवडा अन्नधान्य वितरण कार्यालय एवढे मेहेरबान कसे असा प्रश्‍न सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारला जात आहे.

          दरम्यान येरवडा अन्नधान्य वितरण कार्यालयात नेहमीच अन्नधान्याचा काळाबाजार सुरू असतो. काही दुकानदारांना धान्याचा कोटा वाढवुन दिला गेला आहे, तर काही दुकानदारांना जाणिवपूर्वक धान्याचा कोटा कमी केला गेला आहे. काही दुकानदार नेहमीच प्रशांत खताळ यांच्या केबिनमध्ये बसून असतात असेही सामाजिक कार्यकर्त्यांनी नॅशनल फोरमला सांगितले आहे.

महा सेवा केंद्राची लुटालुट

          येरवड्यापासून ते चंदननगर,खराडीपर्यंत सुरू असलेली महा ई सेवा केंद्राची येरवडा अन्नधान्य वितरण कार्यालयात नेहमीच लुटालूट सुरू असते. महा ई सेवा केंद्राचे काही लोक नेहमीच येरवडा अन्नधान्य वितरण कार्यालयात बसलेले असतात. नागरीकांना ज्या कामासाठी प्रतिज्ञापत्र आवश्यक नाही, ते प्रतिज्ञापत्र देखील १५० ते २०० रुपये घेवून बळजबरीने केले जात आहे. त्या शिवाय त्याचे कागदपत्रे दाखल करून घेतले जात नाही, त्यात नाहक त्रुटी दाखविल्या जात आहेत.

          याच कार्यालयातील काही कर्मचारी, महा ई सेवा केंद्रातील कर्मचारी आणि स्वतःला माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणविणारे लोकांची मोठी टोळी निर्माण झाली आहे. या तिघांच्या परस्पर संगनमतातून येरवडा रेशन कार्यालयात नागरीकांना लुटालूटीची प्रकरणे होत आहेत.

          या सर्व प्रकरणी जिल्हाधिकारी पुणे यांच्या झालेल्या अवमान प्रकरणी प्रशांत खताळ यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून, आशा स्वामी यांना शासन नियमानुसार कार्यमुक्त करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.