
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहर पोलीस भरतीला पोलीसांच्या 1633 जागांसाठी 1.39 + 46,000 = 1.85 लाख अर्ज, आरएफआयडी-सीसीटीव्हीच्या निगरानीत पारदर्शक प्रक्रिया पुणे शहर पोलीस दलात 1633 + 130 पदांसाठीची भरती प्रक्रिया 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, या भरतीसाठी 1.39 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ही प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने राबविण्याची तयारी पोलीस प्रशासनाने केली आहे. पोलीस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक दोनच्या मैदानावर भरतीची मैदानी चाचणी होणार असल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) श्री. संजय पाटील यांनी दिली आहे.
दिलेल्या वृत्तात नमूद केले आहे की, या भरतीत पोलीस अंमलदार, 105 वाहनचालक आणि 33 पोलिस बैंडसमन अशा एकूण 1633 पदांचा तसेच कारागृह पोलीसांच्या 130 पदांचा समावेश आहे. मैदानी व शारीरिक चाचणीला 16 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. या चाचणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. भरती प्रक्रियेचे वेळापत्रक टप्याटप्याने जाहीर केले जाणार असून, उमेदवारांना संबंधित सूचना अधिकृत संकेतस्थळ आणि संदेशांद्वारे दिल्या जाणार आहेत.
शारीरिक चाचणीत उमेदवारांची उंची व छाती मोजणी, 100 मीटर धावणे, 1,600 मीटर धावणे (महिला उमेदवारांसाठी 800 मीटर) आणि गोळाफेक अशा घटकांचा समावेश असेल. या चाचणीसाठी 100 गुण असून, त्यात किमान 50 गुण मिळवणे आवश्यक राहणार आहे.
भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी संपूर्ण शारीरिक चाचणी 'आरएफआयडी' तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि सीसीटीव्हीच्या निगरानीखाली घेण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांची उपस्थिती, धावण्याची वेळ आणि चाचणीतील कामगिरी अचूक नोंदविता येणार आहे. या प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेपाचा प्रश्नच उद्भवत नाही.
लेखी परीक्षेच्या टप्प्यातही विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. अधिका-यांना मोबाइल वापरण्यास किंवा बाह्य संपर्क साधण्यास मनाई करण्यात येणार आहे. परीक्षेच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवून गैरप्रकारांना आळा घालण्यात येणार आहे.
उमेदवारांनी कोणत्याही कर्मचारी किंवा मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये. कोणी पैशांची मागणी केल्यास अपर पोलिस आयुक्तांच्या (7391082611) क्रमांकावर किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असेही अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी नमूद केले आहे.
