Monday, February 16 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

फरासखाना पोलीसांच्या कामगिरीवर अविश्वास दाखविणाऱ्या पोलीस आयुक्तांचा पुण्याच्या रेड लाईट एरियात फ्लॉप शो,बुधवार पेठेत पोलीस फौजा घुसविल्या, दार आणि कपाटांचे कुलूप तोडले, कित्येकांचे पैसे आणि दागिनेही गायब!

नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
गंगुबाई काठीयावाड या हिंदी चित्रपटातील एक डॉयलॉग आहे… हमारी गल्ली और हमारा मोहल्ला वैसे भी बदनाम है, तुम और क्या बदनाम करोगे, तसंच काल पुण्यातील साडेचारशे पोलीसांनी एका बदनाम ठरलेल्या गल्लीला आणखी बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. फरासखाना पोलीसांच्या कामगिरीवर अनाकलनिय अविश्वास दाखवुन, चार/पाचशे पोलीसांच्या फौजा रेड लाईट एरियात घुसविण्यात आल्या. हाती काहीच लागले नाही. तरी देखील पोलीस खात्याची इज्जत वाचविण्यासाठी बांगला देशी मुली म्हणून चार स्थानिक शाळकरी मुलींना अटक केली आहे. त्यांच्या शाळेतही हेच पोलीस वर्दी घालून मुलींना घेवून गेले. रात्रभर टॉर्चर करून पहाटे चार वाजता त्यांची मेडीकल केली, 7 वाजता फरासखाना पोलीसांच्या हवाली केले, आता पर्यंत ह्या शाळकरी मुलींना पोलीसांनी डांबुन ठेवले आहे. स्थानिक पोलीसांवर अविश्वास दाखवुन पोलीस आयुक्तांनी नेमकं काय सिद्ध केलं आहे अशी चर्चा संपूर्ण पोलीस दलात रंगली आहे. बुधवार पेठेत आलेल्या ग्राहकाकडील 7 ग्रॅम चर्रस आणि दोन सिरींज… बस्स… एवढंच. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे. एवढेच कशाला, आयएएस आणि आयपीएस यांच्याही संघटना आहेत. परंतु पोलीसांना संघटना स्थापन करण्याचा अधिकार नाही. पोलीस संघटनेमुळे, पोलीस दलात बेकी निर्माण होईल असे कारण देवून, पोलीस दलात संघटना स्थापन करू दिली जात नाही. परंतु पोलीस आयुक्तानींच पोलीसांवरच अविश्वास दाखवुन पोलीस दलात बेकी निर्माण केली तर दाद मागायची कुठे असेही खात्यात बोलले जात आहे. शेवटी एकच प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे- रेड लाईट एरियात कोंबिंग ऑपरेशन करून पोलीस आयुक्तांनी सिद्ध काय केले…. स्थानिक पोलीसांना विश्वासात घ्यायचे नाही, अनुभवी पोलीसांना विश्वासात घ्यायचे नाही, मनमानीपणे निर्णय घेण्याच्या वृत्तीमुळे पुणे शहरातील पोलीसांची उर्मी मारून टाकल्याने, धाडसी कामे करण्यास पोलीस पुढे येण्यास तयार नाहीत. पूर्वीसारखी उर्जाच पुणे शहर पोलीस दलात उरली नाही. याला केवळ पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारच जबाबदार असल्याचे दलात बोलले जात आहे.

बदनाम गल्ली आणि गरीब ग्राहक-
चर्रस,एमडी घेणारे महागडे ग्राहक आता रेडलाईट एरियात येत नाहीत, तसंही, जिथं ऑनलाईन दारू मिळते, तिथे ऑनलाईन बाई पण मिळते. पुणे शहरात एस्कॉर्टच्या नावाखाली महिला, मुली पुरविण्याचा धंदा तेजित आहे. पुण्यात जागो जाग मसाज पार्लर आणि स्पा च्या नावाखाली मिनी वेश्यालये आहेत. त्यात भरीस भर सर्व लॉज मधुनही मिनी वेश्यालये सुरू आहेत. त्यामुळे या बदनाम ठरविल्या गेलेल्या गल्लीत महागडा शौक असणारे, महागडे ग्राहक येणे बंदच झाले आहे.

बुधवार पेठ हे जुन्या काळापासून व्यापारी केंद्र आहे, त्यामुळे गैरसमज आधी डोक्यातून काढुन टाका-
पुण्यातील अप्पा बळवंत चौकातील पुस्तकांचे दालन बुधवार पेठेत येते, फरासखाना, विश्रामबाग पोलीस स्टेशनसह पोलीस उपआयुक्तांचे कार्यालयही बुधवार पेठेत येते. दगडुशेठ मंदिरही बुधवार पेठेत, मंडई बुधवार पेठेत, जीवनावश्यक असलेल्या व प्लास्टीकच्या कटलरी मालाचे सर्व उत्पादक, होलसेल व घाऊक बाजार पेठ बुधवार पेठेतच आहे. किर्तन करणाऱ्यांचे मृदुंग आणि टाळचिपळ्याही बुधवार पेठेत आणि नर्तन करणाऱ्यांसाठी ढोलकी, तबला हे देखील बुधवार पेठेतच मिळते. पुणे शहरातील जुन्या काळापासून बुधवार पेठ हे व्यापारी केंद्र होते व आहे. सांगण्यासारखे खुप आहे. याच बुधवार पेठेत रेड लाईट एरिया असला तरी याच रेड लाईट एरियात स्थानिकांची जुनी घरे व वाडेही आहेत. त्यामुळे सर्वच वेश्याव्यवसाय करतात किंवा बुधवार पेठेत येणारे हे सर्वच नागरीक गमनासाठी येतात हा गैरसमज सर्वांनी प्रथम डोक्यात काढुन टाकला पाहिजे. विशेषतः पोलीस आयुक्तांसह, पुणे शहरात येणाऱ्या डीवायएसपी व आयपीएस अधिकाऱ्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. (15/20 वर्षापूर्वी इथे सोन्याचा धुर निघत होता, आता कोळसाही शिल्लक राहिलेला नाही.)

मंगळवार दि. 10 फेब्रुवारी मध्यरात्रौ साडेबारा वाजता बुधवार पेठेत काय घडले-
फरासखाना पोलीस स्टेशनजवळ शेकडो पोलीस जमा होत होते. स्थानिक एक/दोन पोलीसांना विचारणा केली परंतु त्यांनाही काही कल्पना नसल्याचे दिसून आले.परंतु मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान रेड लाईट एरियात एकाच वेळी सर्वच पोलीसांनी धाव घेतली. (एखादा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर, जसे वातावरण असते अगदी त्या सारखे वातावरण निर्माण झाले होते.) जाण्या-येणाच्या रस्त्यावर बॅरीकेडस लावण्यात आले. प्रत्येक वाड्यातील, घरातील महिला व मुलींना रस्त्यावर बोलाविण्यात येवून त्यांना उभे करण्यात आले. त्यानंतर काही पोलीसांच्या तुकड्या एक/एक घरात व एक/एक वाड्यात घुसून घरातील कपाटांचे, काही खोल्यांना लावण्यात आलेले कुलूप तोडून टाकत होते.
तिकडे रात्रीचे जेवण करून शतपावली करण्यासाठी रस्त्यावर थांबलेल्या स्थानिकांसह गमनासाठी आलेल्या इसमांना रस्त्यावर बसविण्यात आले होते. त्यांचे व्हिडीओ शुटींग केले जात होते, फोटो काढले जात होते. तेच व्हिडीओ व्हायरल केले जात होते. घरात घुसून कपाटांचे कुलूप, लॉकरचे कुलूप तोडून अस्ताव्यस्त टाकले जात होते. तरी देखील पोलीसांच्या हाती काहीच लागले नाही.

पोलीस कारवाईसाठी आले की दरोड्यासाठी –
पोलीस आयुक्तांच्या सुचनेनुसार दोन डीसीपी + 8 अेसीपी + 19 पीआय + 55 एपीआय-पीएसआय+ 375 अंमलदार =459 पोलीस घरात आणि वाड्यात घुसले होते. कपाटांची व लॉकरची कुलूपे तोडून त्यातील काहींचे पैसे व सोन्याचे दागिने गायब झाल्याची माहिती अनेक नागरीकांनी दिली आहे. पैसे व दागिन्यांची चोरी पोलीसांनीच केल्याचा संशय स्थानिक नागरीकांनी व्यक्त केला आहे. परंतु पोलीसांनीच हे कृत्य केल्यामुळे दाद मागायची तरी कुठे, फिर्याद दयायची तरी कुठे हा प्रश्न स्थानिक नागरीकांच्या मनांत निर्माण झाला आहे. त्यात आता तर पोलीस कारवाईसाठी आले होते की, दरोड्यासाठी असाही प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. काही पोलीसांनी तर ज्या दुकानाच्या व घराच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते, त्या सीसीटीव्हीच्या वायर तोडून, घरातील डीव्हीआर घेवून गेले आहेत. काहींच्या घरातील हात खर्चासाठी ठेवलेले पैसेही पोलीस घेवून गेले असल्याची माहिती स्थानिक नागरीकांनी नॅशनल फोरमला दिली आहे.

चार शाळकरी मुलींना पोलीसी टॉर्चर –
दरम्यान बुधवार पेठेत ज्यांची जुनी घरे व वाडे आहेत व ज्यांच्या वेश्याव्यवसायाशी कोणताही संबंध नाही, त्यांच्याही घरातील लहान शाळकरी मुलींना पोलीसांनी चौकशीसाठी उचलुन नेले आहे. मध्यरात्री साडेबारा ते पहाटे चार वाजेपर्यंत रेड लाईट एरियात पोलीस धुमाकुळ सुरू होता. दरम्यान मुलींच्या पालकांनी पोलीसांकडे दाद मागतांना, त्यांच्या शाळेचे आयडी कार्ड, त्यांची वह्या पुस्तके दाखविली तरी, पोलीस त्या शाळकरी मुलींना सोडण्यास तयार नव्हते. पहाटे चार ते 5 वाजवण्याच्या सुमारास त्या शाळकरी मुलींची ससुन हॉस्पीटल मध्ये मेडीकल करण्यासाठी पोलीस घेवून गेले. या मेडीकलला त्यांच्या त्यांच्या पालकांनी विरोध केला तरी मेडीकल करण्यात आली. सकाळी 7 नंतर पोलीसांनी खाकी वर्दीमध्येच त्या शाळकरी मुलींना त्यांच्या शाळेत घेवून गेले. त्यांच्या त्यांच्या प्रिंसीपल यांची भेट घेतली, त्या मुलींच्या वर्ग शिक्षकांची भेट घेतली, त्यावेळी त्या शाळकरी मुली पोलीसांसोबत होत्या. सर्व वर्गातील वर्गमित्र त्या मुलींकडे पाहत होते. दरम्यान त्यातील दोन मुली कराटे चॅम्पियन आहेत, त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे.
शाळेतील शिक्षक व प्रिंसीपल यांनी त्यांच्या त्यांच्या पालकांना फोन करून विचारणा केली. पोलीस संबंधित विद्यार्थ्यानींना घेवून शाळेत का आले होते याचीही विचारणा केली. बातमी करण्यापर्यंत तरी पोलीसांनी या शाळकरी मुलींना सोडून दिले नाही. स्थानिक सामाजिक संघटना देखील दाद देत नसल्याने शाळकरी मुलींचे पालक हवालदिल झाले आहेत.

बांगला देशी मुली भयंकर चलाख, त्यांचे एजंटही भलतेच चलाख –
पुण्याच्या रेड लाईट एरियात बांग्लादेशी महिला व मुलींनी घुसखोरी केल्यापासून राजचे रोज भांडणे होत आहेत. चाकुने वार कर, ब्लेडने वार करून, ह्याला मार, त्याला मार असे सर्व प्रकार सुरू आहेत. फरासखाना पोलीसांनी स्थानिकांना विश्वासात घेवून, त्यांच्या नियंत्रणामध्ये हा भाग ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. तथापी बांग्लादेशी देहविक्री करणाऱ्या मुली व महिला तसेच त्यांचे एजंटही भयंकर चलाख आहेत. कुठून तरी चाहुल लागली आणि पाच/पन्नास बांग्लादेशी मुली व महिलांनी रेड लाईट एरियातून धुम ठोकल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तसेच जे स्थानिक राहत आहेत, जे या व्यवसायात नाहीत, त्यांना पोलीसांची भिती बाळगण्याचे काही कारण नसल्यामुळे तेथून पळून जाण्याचा प्रश्नच नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तरी देखील पोलीसांनी दडपशाही करून, मध्यरात्रौ साडेबारा ते पहाटे चार पर्यंत पोलीसी धुमाकुळ सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

बांग्लादेशी महिलांचे कारणामे- पोलीसांनाच बळीचा बकरा कसा बनवायचा, एैका किस्से-
1. ज्यांच्या बरोबर देण्या-घेण्यात, व्यवहारात काही बिनसले तर, फुकटात पुण्यातून निघून जाण्यासाठी पोलीसांचा वापर केला जातो. अल्पवयीन आहे, वेश्या व्यवसाय करायला लावले म्हणून खोटी फिर्याद द्यायची आणि अटक करून घ्यायची. पुढे पोलीसी संरक्षणात ते मायदेशी परतात.
2. परराज्यात धुमाकुळ घालुन महाराष्ट्रात व पुण्यात आल्यानंतर, व्याजाने पैसे घेणे, व्याजाने पैसे देणे, व्याजाच्या पैशांची वसुली करणे, तसेच पुणे व पिंपरी चिंचवड मधील चिखली, पिंपरी, हिंजवडी, बाणेर, मुंढवा,कात्रज, अप्पर इंदिरा नगर येथील त्यांचे सगे सोयरे यांना कामासाठी, धंदयासाठी मदत करणे, यासाठी व्यापारी, राजकीय लोकांना आपल्या पाशात अकडकाविणे, भुलथापा मारून त्यांचा कार्यभाग उरकणे असे उद्योग बांग्लादेशी करीत आहेत. जिथं व्यवहारात अडचण आली, की तिथं लगेच पोलीसांत फिर्याद देवून स्वतःला अटक करून घेणे आणि पोलीस संरक्षणात मायदेशी निघून जाणे असे प्रकार पुण्यातही सर्रासपणे सुरू आहेत. व्यापारी व राजकारणी देखील बांग्लादेशीच्या प्रेमात पडत आहेत. दिसायला देखील गोऱ्यापान, नाकीडोळी सरळ, लालभडक, उंचापुऱ्या असल्याने त्यांच्या सौंदर्यावर इथले भले, भले अडकलेत व अडकत आहेत. त्यात नवीन काहीच नसल्याची माहिती स्थानिक नागरीकांनी दिली आहे.

पोलीस आयुक्तांनी कारवाई करतांना, स्थानिक पोलीसांचे मत विचारात घेणे आवश्यक होते –
पुण्याच्या बुधवार पेठेतील रेड लाईट एरियाची परिस्थिती पूर्वीसारखी राह्यली नाही. तसंही पुण्यात जागो जाग मसाज पार्लर आणि स्पा च्या नावाखाली मिनी वेश्यालये आहेत. त्यात भरीस भर सर्व लॉज मधुनही मिनी वेश्यालये सुरू आहेत. त्यामुळे या बदनाम ठरलेल्या गल्लीत महागडे ग्राहक येत नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. एमडी, चर्रसचा वापर करणारे ग्राहक श्रीमंत व महागडे असतात. ते या ठिकाणी आता येत नाहीत. आता ज्यांच्या खिशाला परवडत असलेले शौक म्हणजे, गुटखा, तंबाखु खाणारे, गांजा फुकणारे, देशी व हातभट्टी वालेच इथे येत असल्याचे स्थानिकांचे मत आहे. आता इथ येणाऱ्यांच्या खिशात शे दोनशे फार फार तर शे पाचशे रुपये वालेच येतात. त्यांना महागडे शौक असण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे अंमली पदार्थ वैगरे ही तर दुरची बाब असल्याचेही अनेकांचे निरीक्षण आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी, स्थानिक पोलीसांना विश्वासात घेवून कारवाई करणेच अपेक्षित होते. परंतु खोदा पहाड और निकला चुहा अशी अवस्था कोंबिंग ऑपरेशन करणारांची झाली आहे.