Friday, February 6 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

येरवड्यातील जुन्या इमारतीवरील हॉर्डींगच्या सांगड्यामुळे नागरीकांच्या जिविताला धोका, आकाशचिन्ह विभागातील निरीक्षकांच्या बेफिकीरीचा नमूना

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
येरवडा येथील स.नं. 24 प्रफुल्ल निवास या अतिशय जिर्ण व जुन्या इमारतीवर टार्गेट ॲडव्हरटायझिंग यांचे होर्डींग असून मागील दोन वर्षांपासून त्याचे नुतनीकरण करण्यात आले नाही. जुन्या इमारतींमुळे त्याला परवानगी नाकारण्यात आली असली तरी त्यावरील कपड्याचे बॅनर काढण्यात आले असले तरी हजारो किलोचा लोखंडाचा सांगाडा जागेवरच ठेवण्यात आलेला आहे. यामुळे स्थानिक नागरीकांच्या जिवीताला धोका निर्माण झालेला असतांना देखील पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या निरीक्षकांनी कारवाईकडे साफ दुर्लक्ष केले असून त्यांच्या बेफिकीरीचा नमूना समोर आलेला आहे.

येरवडा गावठातील प्रफुल्ल निवास या जुन्या इमारतीवरील होर्डींगला परवानगी नाकारल्यामुळे त्यावरील निव्वळ कापड काढण्यात आले असले तरी लोखंडी सांगाडा आहे तसाच ठेवण्यात आल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते रामभाऊ फुगे यांनी 13 नोव्हेंबर 2023 रोजी येरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालयाकडे केली होती. त्यानंतर देखील कारवाई न झाल्यामुळे व सततचा पाठपुरावा करून पुन्हा 2 फेब्रुवारी 2024 रोजी आयुक्त पुणे महापालिका यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतरही कारवाई करण्यात आली नसल्याने पुन्हा आज 2026 मध्ये तक्रार अर्ज देण्यात आलेला आहे. तथापी आकाशचिन्ह विभाग कारवाई करीत नसल्याची माहिती रामभाऊ फुगे यांनी दिली आहे. 


जुन्या व जिर्ण इमारतीवरील लोखंडी सांगाड्यामुळे नागरीकांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. तसेच पाऊस, वारा वादळामुळे कोणत्याही क्षणी हा धोका होवू शकतो अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे. तथापी अनेकदा तक्रार करूनही त्यावर कारवाई केली जात नसल्याने, येथे जिवितहानी झाल्यास आकाशचिन्ह विभागास जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी या आशयाचा तक्रार अर्ज आयुक्त पुणे महापालिका यांना सादर केला आहे.