Saturday, December 27 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयात लोकशाहीचा महाउत्सव, पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2025

नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/
पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांचे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत आहेत. तर काही भावी इच्छुक उमेदवार कोणती आघाडी कशी होते याची वाट पाहत वेट ॲन्ड वॉचच्या भूमिकेत वावरत आहेत. परंतु पुणे महापालिकेच्या धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या सहायक महापालिका आयुक्त श्रीमती सुरखा भणगे यांनी सार्वत्रिक निवडणूकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. भावी नगरसेवकांच्या सुविधेसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सर्व कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. संपूर्ण धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या प्रांगणात भव्य-दिव्य मंडपाची उभारणी केली असून, जसे काय एखाद्या केंद्रीय मंत्र्याच्या वा राजकीय नेत्याच्या मुला-मुलीच्या विवाहाची तयारी आहे की काय असा भास होत आहे. सर्वत्र एखाद्या विवाहासारखी लगबग सुरू आहे. खऱ्या अर्थाने धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयात लोकशाहीचा महात्सव सुरू आहे.

धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाने भावी नगरसेवकांच्या सुविधेसाठी एक खिडकी योजना कार्यान्वित केली असून, त्यात उमेदवार राजकीय पक्ष यांचे निवडणूक खर्च व नियंत्रण कक्ष, अचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था कक्ष, मनुष्यबळ व्यवस्थापन कक्ष, एएमएफ सुविधा कक्ष, निवडणूक साहित्य व्यवस्थापन कक्ष, स्ट्राँग रूम कक्ष, इव्हीएम कक्ष, स्वीप कक्ष व दिव्यांग कक्ष, आवक-जावक व अधिकारी उपस्थिती नोंद कक्ष, तसेच नागरीक व उमेदवारांसाठी स्वतंत्रपणे तक्रार निवारण व मतदार मदत कक्षासह कर्मचाऱ्यांसाठी चहापान व भोजन कक्ष, सोबतच स्वतंत्रपणे झेरॉक्स मशीन, तक्रारींसाठी लँडलाईन फोनची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. स्वतः सहायक निवडणूक अधिकारी तथा सहायक महापालिका आयुक्त श्रीमती सुरेखा भणगे या स्वतः जातीने हजर राहून त्यांच्या नियंत्रणाखाली कामे करवुन घेत आहेत. 



दरम्यान 22 डिसेंबर 2025 पासूनच सकाळी 9.00 वाजता निवडणूक कामासाठी असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या, येत असलेल्या अडचणी, तसेच त्यांची मते जाणून घेण्यासाठी दैनंदिन मिटींग आयोजित करून, सर्व समस्यांचे निराकरण केले जात आहे. तसेच नामनिर्देशनपत्र घेण्यासाठी व भरून देण्यासाठी येणाऱ्या नागरीकांना अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. विशेष म्हणजे निवडणूकीत ज्या सदस्यांना वेगवेगळ्या एनओसीची आवश्यकता आहे, त्यांना त्या सर्व एनओसी घरपोच दिल्या जात आहेत. धनकवडी- सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयात एकन्‌‍एक कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या सहायक महापालिका आयुक्त श्रीमती सुरेखा भणगे यांच्या उपस्थित व मार्गदर्शनाखाली कामकाज सुरळीतपणे सुरू असल्याचे दिसून आले आहे. सकाळी 9 ते रात्रौ 10 वाजेदरम्यान श्रीमती भणगे ह्या स्वतः निवडणूक कार्यालयात बसुन यंत्रणा कार्यान्वित करीत असल्याचे आज पाहण्यास मिळाले.