Friday, January 10 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिका पथ विभाग व बिबवेवाडी पोलीसांचा असहकार, धार्मिक- जातीय सहिष्णुतेला तडा मुख्यमंत्र्यांकडील नगरविकास – गृहविभागाने उचललाय बदनामीचा विडा

Rajabaug-Darga

पुणे/दि/ प्रतिनिधी/

      रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, मॉंसाहेब जिजाऊँ यांनी अन्याय आणि अत्याचाराविरूद्ध रणशिंग फुंकले. अत्याचार करणार्‍यांना आणि अत्याचारी यंत्रणांना त्यांच्या तळपत्या तलवारीने कापुन काढल्याचा इतिहास आहे. शिवकाळात धर्म वा जातीभेद हा प्रकारच नव्हता. अत्याचार करणारा मुघल सैनिक आहे की, रांज्याचा पाटील. सर्वांनाच एकसमान दंड दिला. छत्रपतींच्या स्वराज्या विरूद्ध मराठे सरदार मुघलांच्या बाजूने लढत असले तरी शिवरायांच्या किल्यांची जबाबदारी ही तत्कालिन महार समाजाकडे होती. तोफखाना, दारूगोळा विभागाचे प्रमुख मुस्लिमच होते. त्याच छत्रपती शिवरायांच्या राज्याला एकसंघ कायदयाचे स्वरूप देवून भारतीय संविधान या देशात लागु झाले. कायदयाने सर्व समान झाले. परंतु इथल्या शासन यंत्रणेतील मंडळीच्या सडक्या डोक्यातून आजही उच्च-निच, भेदभाव जायला तयार नाही. आजच्या काळातही पुणे महापालिकेतील पथ विभाग आणि बिबवेवाडी पोलीसांनी मुस्लिम प्रार्थनास्थळ म्हणून कायम दुय्यम दर्जाची वागणूक दिली आहे. आता दर्ग्याचा उरूस २८ पासून सुरू होत असतांना देखील पुणे पालिकेच्या पथ विभागानं जाणिवपूर्वक काम संथ गतीने ठेवलय, तर पोलीसांनी हट्टवादी भूमिका घेवून,  धार्मिक कार्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशा दृष्ट प्रवृत्तींना लगाम घालण्याची नितांत आवश्यकता आहे.

स्वारगेटचा इतिहासभुगोल

      देश व राज्यातील इतर जिल्ह्यांतून जे पुण्यात येतात व जातात, त्यांना स्वारगेट हे ठिकाण माहिती नाही अस्सं होतच नाही. मुंबईत जस्सं दादर आहे, अगदी तस्संच स्वारगेटच आहे. एखादा व्यक्ती राज्याच्या कोनाकोपर्‍यातून १० नव्हे १५/२० वर्षांनी पुण्यात आला तरी स्वारगेटला उतरून पुढे जायचे असते हे त्याला पूर्णपणे ठाऊक असते. आता हे स्वारगेट नाव कशामुळे पडले हे मात्र बर्‍याच जणांना माहिती नाही.

      पुण्यात सुमारे सव्वा दोनशे वर्षापूर्वी सुफी संत धर्माचा प्रचार व प्रसार करीत असतांना, त्यातील हजरत राजाबाग शेर सवार नावाचे संत होवून गेले. त्यांची कबर (दर्गा) आजच्या स्वारगेट चौकाच्या मधोमध होती.तथापी सवार गेट अर्थात स्वारगेट मोठ्ठं करण्यासाठी या दर्ग्याचे स्थलांतर करण्यात आले. तत्कालिन पुणे नगरपालिकेचे स्थलांतर मंगळवार पेठेतून भांबुर्डा अर्थात आजचे शिवाजीनगर येथे झाले.

      पुणे महापालिकेची इमारत अस्तित्वात आल्यानंतर  पुणे महापालिका व अमुनुद्दीन पेनवाले यांनी मध्यस्थी करून ती दर्गा सवारी गेट अर्थात स्वारगेट पासून एक किलोमिटरवर बिबवेवाडी येथे स्थलांतरीत करण्यात आली. त्यांच्या नावानेच स्वारगेट हे नाव पडले आहे. * सवारी गेट= शेर सवार = स्वारगेट. त्यांच्या दर्ग्याच्या उरूसावेळी सर्व जातीधर्मातील लोक त्यांच्या दर्शनासाठी येतात. मागील सव्वा दोनशे वर्षापासून हा उरूस भरला जातो.

पुणे महापालिकेच्या पथ विभागानं जातीय व्देषाचा पुरावाच सादर केला –

पथ विभागाचे तडवी स्वतःला विजापुरचे आदिलशहा समजताय की काय

      पुणे महापालिकेच्या पथ विभागाने मागील सहा-सात महिन्यांपासून सुमारे २२ कोटी रुपयांचा खर्च करून,इथल्या पदपथाचे व रस्ते दुरूस्तीचे काम कासवाच्या संथ गतीने सुरू ठेवल आहे. बिबवेवाडी अशोका चौकापासून ते अप्पर इंदिरानगर पर्यंत हे काम सुरू आहे. दरम्यान पुणे महापालिकेच्या पथ विभागाने ठेकेदार, अधिकारी व नगरसेवकांच्या मनाला वाटेल त्या पद्धतीने काम सुरू असल्याचेही दिसून येत आहे. दि. २८ मार्च २०१९ पासून या हजरत राजाबाग शेर सवार यांचा उरूस सुरू होत आहे. हजारो भाविक येथे दर्शनाला येत असतात. रस्त्याची कामे सुरू असल्याने वाहतुकीस व नागरीकांना येण-जाण्यासाठी अडचण होणार आहे. याबाबत संबंधित पथ विभागाचे अभियंता श्री. तडवी यांना वारंवार सांगितल्यानंतर देखील त्यांनी कामे उरकण्याचे नाव घेत नाहीत. वसंतबागेजवळील काम लगेच झाले. परंतु दर्ग्यासमोरील कामे मात्र प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.

      पुणे महापालिकेचं पथ विभाग हे गब्बर ठेकेदार, नगरसेवक, मान्यवर बदलीबहाद्दरांच्या इशार्‍यावर नाचणारे खाते आहे. दरवर्षी पुणे महापालिकेचं संपूर्ण बजेट रस्त्यावर खर्च केलं तरी रस्त्यावरील खड्डे कधीच भरले जाणार नाहीत. हा इतिहास आहे. चांगले रस्ते उखडून नवीन रस्ते तयार करणे, चांगले पदपथ उखडून, तेथे नवीन पदपथ तयार करणे, पदपथांची रूंदी वाढवुन, भांडवलदारांना बेकायदा धंद्यांना जागा मोकळी करून देणं ही सर्व कामे पथ विभागामार्फत सुरू असतात. पुणे महापालिकेच्या पथ विभागातील अभियंता आदिल तडवी यांना वारंवार कळवून देखील दर्ग्यासमोरील कामे केली जात नाहीयेत. हा जातीय-धार्मिक विव्देष आहे की, नगरसेवक ठेकेदारांच्या थैलीवर पळणारे सांड आहेत….

मुख्यमंत्र्यांकडील नगरविकासगृहविभागाने उचललाय बदनामीचा विडा

      यथ राजा तथा प्रजा ही म्हण शेकडो वर्षांपासून सुरू आहे. राजा जसा वागतो तस्से त्यांचे सेवक वागतात आणि सेवकांचे पाहून प्रजा देखील त्या प्रमाणे वागत असते. आता राजाच्या पदावर मुख्यमंत्री फडणवीस आहेत. त्यांच्याकडे नगरविकास विभाग व गृह मंत्रालयाचा पदभार आहे. त्यामुळे नगरविकास व गृहविभागातील प्रशासकीय कर्मचारी-अधिकारी कसे वागतात यावरूनच राजाचे वर्णन करता येवू शकते.

      पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक राजकीय कार्यक्रम, ईद, पैगंबर जयंती,दर्ग्याच्या उरूसावेळी प्रत्येक कार्यकर्त्यांवर १४९ नोटीस दिली जाते. बौद्ध,दलित मुस्लिमांवर सातत्याने कायदयाचा बडगा उगारला जातोय. नाहक कोर्टाच्या पायर्‍या चढविल्या जातात. पण जेंव्हा गणेशोत्सव, महाशिवरात्री वा इतर सण-सणावळी वेळी मात्र हाच नियम इतरांना का लावला जात नाही. कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली बौद्ध, दलित- मुस्लिमांना शासनस्तरावरून झोडपून काढण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते. तस्सं नसत तर याच आदिल तडवीने सर्व कामे विहीत वेळेत करून पुणेकरांसमोर अडचणी निर्माण केल्या नसत्या एवढे मात्र नक्की. हाच तडवी स्वतःला विजापुरचा आदिलशहा समजोय की काय अशी शंका येते. कारण दक्षिणेतील आदिलशाही, निजामशाही यांनी महाराष्ट्राला नेहमीच दुय्यम वागणूक दिली आहे हा इतिहास आहे.

बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या गणेश तनपुरेंची तणतण

      पोलीस स्टेशनला हद्दीचा वाद घालण्याची नेहमी सवयच झाली आहे. पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीचा वाद घालत बसू नका असे आदेश असतांना देखील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या गणेश तनपुरे यांनी तनतण सुरू ठेवली आहे.

      हद्दीनुसार पहायला गेलं तर हजरत राजाबाग शेर सवार यांची दर्गा मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीत येते. तर दर्ग्यासमोरील रस्ता हा बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत येतो. त्यामुळे दर्ग्याच्या उरूस कार्यक्रमाची माहिती मार्केटयार्ड पोलीस ठाणे यांना कळवुन त्याची पोहच पावती बिबवेवाडी पोलीस ठाण्याला देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांवर बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गणेश तनपुरे यांनी तोंडभांड केली. तुम्ही इथ अर्ज करू नका, तिकडं करा, आम्हाला काही सांगु नका वेगैरे… वगैरे तोंडभांड केली.

      तनपुरें सारखे पोलीस कर्मचारी तीन वर्षासाठी हद्दीत कर्तव्यावर येतात. परंतु ही दर्गा सव्वा दोनशे वर्षापासून येथे आहे. परंतु तनपुरे यांच्या वागण्यामुळे विशिष्ठ धर्मियांच्या मनांत नाहक शासनाविषयी व मुख्यमंत्र्यांविषयी व्देषभावना वाढीस लागत आहे.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंंती, बुद्ध जयंती, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक राजकीय कार्यक्रमावेळी देखील तनपुरे हे चळवळीच्या कार्यक्रमावेळी तनतण करीत असतात. परंतु गणेशोत्सव व इतर सणसभारंभ, प्रस्थापित राजकीय पक्षांचे कार्यक्रम असतांना, हेच तनपुरे कुठे गेलेले असतात. त्यावेळी संबंधित मंडळींना १४९ नोटीस देत नाहीत. यावेळी तनपुरेंच्या हाताला मेंहदी लावलेली असते काय असा उव्दिग्न सवाल सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.  बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गणेश तनपुरे हे जाणिवपूर्वक दलित, मुस्लिम समाजात गृहमंत्रालय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी व्देषभावना पसरवित असल्याचा आरोपही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. मागील सव्वा दोनशे वर्ष कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार

घडला नाही, तो अचानक झाल्यास त्याला मनुवादी शक्तींचा हात असेल एवढे मात्र नक्की.

पुणेकरांनो, एकदा आवश्य भेट दया

      पुण्याच्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवात ज्यांनी ज्यांनी भर घातली, त्यात हजरत राजबाग शेर सवार यांचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे बिबवेवाडी येथील दर्ग्याला आवश्यक भेट देवून, ज्यांच्यामुळे स्वारगेट हे नाव पडले त्यांना भेटायला नक्की याच.       हजरत राजाबाग शेर सवार दर्ग्याचा उरूस २८ मार्च २०१९ पासून सुरू होत असून, २८ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दर्ग्याचे प्रमुख विश्‍वस्त जावेद शेख यांनी नॅशनल फोरमला कळविले आहे.