Wednesday, February 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या शीतल वाकडे यांची कार्यकर्त्यांना आरेरावी, गनिमा कावा संघटनेतर्फे मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे वाकडे यांच्याविरूद्ध फिर्याद दाखल!

नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/
बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील अप्पर,सुपर व शेळके वस्ती येथील ड्रेनेज चेंबर फुटून त्यातील मैला-पाणी नागरिकांच्या घरात घुसत असल्याने व सर्वत्र दुर्गंधी पसरून डास, मच्छर यांचा उपद्रव वाढला होता. दरम्यान ड्रेनेज चेंबरची तातडीने दुरूस्ती करण्याबाबतचे निवेदन गनिमी कावा संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या सहायक महापालिका आयुक्त शितल वाकडे यांना देण्यासाठी गेले होते. तथापी निवेदन घेऊन गेल्यानंतर त्यांना अतिशय उर्मट उत्तरे देऊन त्यांच्याबरोबर अरेरावी केल्याची घटना बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालय येथे घडलेली आहे. तसेच दलित नागरी वस्तीमध्ये असा प्रकार घडत असल्याने त्याबाबतचे निवेदन घेऊन गेलेल्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकी वस्तुस्थिती काय आहे-
बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील अप्पर सुपर व शेळके वस्ती येथे 80 टक्के दलित नागरिकांची वस्ती आहे. पुणे महानगरपालिकेच्या अभिलेख्यांंमध्ये देखील अप्पर व शेळके वस्ती हा दलित वस्तीचा भाग असल्याच्या नोंदी आढळून येतात. येथील चेंबर अनेकदा फुटून त्यातील मैलायुक्त पाणी नागरिकांच्या घरात घुसण्याचे अनेकदा प्रकार झालेले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या व्हाट्सअप ग्रुप वर अनेकदा तक्रार करूनही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत होते. दरम्यान फुटलेल्या चेंबर मधून वाहत असलेल्या मैलायुक्त पाण्यामुळे या भागात दुर्गंधी पसरून डास, मच्छर यांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांना घरात राहणे देखील मुश्किल झाले होते.

गनिमी कावा संघटनेचे निवेदन-
गनिमी कावा सामाजिक संघटना ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून पुणे शहरांमध्ये कार्यरत आहे. या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून नागरिकांच्या, स्थानिक नागरिक समस्या तसेच इतर अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये सातत्याने लढा देणारी ही संघटना कार्यरत आहे. दरम्यान शेळकेवस्ती, सुपर या भागातील नागरिकांनी गनिमी कावा संघटनेचे अध्यक्ष श्री संजय वाघमारे यांच्याकडे त्यांची कैफियत मांडली असता, संबंधित नागरिकांसह व कार्यकर्त्यांसह निवेदन घेऊन श्री. संजय वाघमारे हे बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक महापालिका आयुक्त शितल वाकडे यांना निवेदन देण्यासाठी गेले. तथापि निवेदन व नागरी समस्या ऐकून घेणे ऐवजी संबंधित कार्यकर्त्यांना थेट उर्मट उत्तर देऊन त्यांच्यावर आरवी केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. संबंधित कार्यकर्ते नागरिक समस्यांच्या संदर्भामध्ये माहिती देत असताना याबाबतचे मोबाईल वरून फोटो घेत होते तसेच फेसबुक लाईव्ह चित्रण करीत असतांना, त्याला देखील वाकडे यांनी हरकत घेतली. त्यांच्या सुचनेनुसार कार्यकर्त्यांनी मोबाईल वरील चित्रण बंद केले, तरी शितल वाकडे ह्या उर्मटखोर उत्तरे देवून कार्यकर्त्यांच्याच अंगावर धावून जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

   दरम्यान बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालय मध्ये कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ शूटिंग करण्यास त्यांनी मज्जाव केला. याबाबत काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले की,  मूळतः सर्वोच्च न्यायालयाचे आदेश तसेच पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी देखील नागरी प्रश्नांच्या संदर्भामध्ये शासकीय कार्यालयात व्हिडिओ शूटिंग करण्यास कुठलीही हरकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निवाडा सांगून निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तथापि नागरी समस्या मांडत असताना त्याबाबतचे मोबाईल वरून फेसबुक लाईव्ह चित्रण करीत असताना त्याला आक्षेप घेण्याचे शितल वाकडे यांना काहीच कारण नसल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला-
शितल वाकडे यांनी कार्यकर्त्यांना आरेरावी व उर्मट उत्तरे दिल्यानंतर देखील कार्यकर्ते संयमाने माहिती देत असताना, उलट त्यांच्याविरुद्ध मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे अदाखल पात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती गनिमी कावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून सर्व कार्यकर्त्यांनी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.

शितल वाकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी-
बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक महापालिका आयुक्त यांनी केलेल्या अरेरावी विरुद्ध तसेच दलित वस्ती विकास योजनेचा निधी या भागात वापरण्याबाबत त्यांनी अतिशय उर्मटखोर उत्तरे दिल्याने तसेच मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे केलेली आहे.

वादातीत शितल वाकडे-
शितल वाकडे ह्या शासनाच्या प्रतिनियुक्तीवरील सेवक असून, बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयात येणारे अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांना अतिशय अपमानास्पद वागणूक देण्यात येत असल्याची माहिती समोर आले आहे. शितल वाकडे या अतिशय उर्मटखोर व अरेरावी करणाऱ्या अधिकारी असल्याची माहिती बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयातीलच काही कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. थोडक्यात माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांना अपमानास्पद वागणूक देणे तसेच क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील कोणतेही कारण नसताना धारेवर धरण्याचे प्रकार अनेकदा घडले असल्याचे समोर आले आहे. तसेच हडपसर वानवडी येथे असताना देखील शितल वाकडे यांनी गैरवर्तन केल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली होती. आता देखील बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय येथे उर्मटखोरपणे त्यांचं वर्तन ठेवल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयातून अशा उर्मटखोर अधिकाऱ्याची बदली करण्यात येवून त्यांच्या विरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी गनिमी कावा संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय वाघमारे यांनी केली आहे.