Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

कालचा सनवार-एैतवार- दारू मटणाचा अन्‌‍ चोरी दरोड्याचा, दारू मटणाच्या पार्टीसाठी राखुन ठेवलाय रविवार, जिकडं – तिकडं बारच्या बाहेर चोरांनी मारलिया धाड-

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
आठवड्यातील सर्वांना सुटीचा असलेला वार म्हणजे रविवार. परंतु हाच रविवार मात्र पोलीसांना शांतपणे बसू न देण्याचा देखील वार ठरत आहे. काल शनिवार व रविवारी पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीत चोरी आणि दरोड्याचे प्रकार समोर आले असून, जिकडे तिकडे चोरी आणि दरोडा… पुढे काय तर घरेदारे सोडून आता भर रस्त्यावर चोर लुटारूंनी लुटालुटीचा खेळ सुरू करून पुणे पोलीसांना आव्हान दिले आहे. काल रविवारी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, येरवडा पोलीस स्टेशन व हडपसर पोलीस स्टेशन सह शनिवारी स्वारगेट, खडकी व येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत भर रस्त्यावर चोरी व दरोड्याच्या घटना घडल्या आहेत.

पुण्यातील हॉटेल चालकांचा सविनय कायदेभंग, पोलीस मात्र कशात आहेत दंग –
दुकान अधिनियम व पोलीस नियमानुसार, रात्रौ 11 वाजेपर्यंत सर्व खाजगी दुकाने उघडी ठेवण्याचे नियम आहेत. परंतु रात्रौ 11 वाजेनंतर दुकाने बंद करणे कायद्याने अपेक्षित आहे. पुणे शहरातील बहुतांश हॉटेल चालकांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांसह संपूर्ण पोलीस खात्याविरूद्ध सविनय कायदेभंगाची मोहिम सुरू केली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील कायदेभंग आणि स्वतंत्र भारतातील कायदयाला, त्यांच्याच रक्षकांकरवी आव्हान देऊन रात्रौ उशिरापर्यंत हॉटेल व बार सुरू असतात. हाच खऱ्या अर्थाने कायदेभंग म्हणावा लागणार आहे. सविनय म्हणजे कायदयाच्या रक्षकांकरवी कायदा मोडण्याचा प्रकार अशी आजची व्याख्या झाली आहे.
कालचा शनिवार व रविवार हा पुणे शहरात दरोडा व चोरीचा वार ठरला आहे. त्याबाबत दाखल गुन्ह्यांची माहिती खालील प्रमाणे आहे –
शिवाजीनगर पोलीस स्टेशन – मध्यरात्री पर्यंत सुरू असलेल्या बांबु हाऊसबाहेर 1 लाख 35 हजारांची चोरी –

शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कृष्णा प्रेसिडेन्सी, बांबु हाऊस समोर मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद येथे राहणारे एक 35 वर्षीय व्यक्ती त्यांची कार पार्क करीत असतांना, मोटारसायकल वरील चार अनोळखी इसमांनी त्यांच्या जवळ येऊन काहीएक कारण नसतांना त्यांच्याकडील पैसे व मोबाईल मागु लागले. फिर्यादी यांनी नकार दिल्यानंतर, या चार अनोळखी इसमांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, खाली पाडून, तसेच कोणत्यातरी वस्तुने डोक्यात मारून डोक्याच्या उजव्या बाजुला दुखापत करून त्यांच्या हातातील अंगठी व गळ्यातील सोन्याची साखळी असा एकुण 1 लाख 35 हजार रुपयांची चोरी झाली आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कृष्णा प्रेसिडेन्सी, बांबु हाऊस हे 24 बाय 7 दिवस सुरू असते. त्यामुळे या ठिकाणी चोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत.

पुणे सोलापुर हायवे वरील गारवा हॉटेलच्या बिर्याणीचा 12 लाखाला झटका –
पुण्याचे तापमान मे महिन्यात 40/42 डिग्री झालेले असतांना, गारवाचा गारवा बहुतांश शौकिन अनुभवत आहेत. लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे सोलापूर रस्त्यावरील हॉटेल गारवाच्या पार्कींग मध्ये फिर्यादी महेश पाटील वय- 52 वर्ष रा. नवी मुंबई हे त्यांच्या चारचाकी वाहनाचे ड्रायव्हर साईडचे पाठीमागील बाजुची काच कोणीतरी अज्ञात इसमाने कशाच्यातरी साहायाने फोडून कार मधील चामड्याची चॉकलेटी व काळ्या रंगाच्या पर्स व त्यातील 98 हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकुण 11 लाख 90 हजार 355 रुपयांचा किंमतीची चोरी झाली आहे.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील भिलारेवाडीत कारचालकाला लुटले –
भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे सातरा रोडवरील कात्रज घाटाचे मोठे वळणावर देवानंद गालफाडे वय 38 वर्ष हे मध्यरात्री पावणेदान वाजता कारने जात असतांना मोटारसायकलवरील तीन अनोळखी इसमांनी त्याच्या जवळ येऊन शस्त्राचा धाक दाखवुन त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व पेंडल असा एकुण एक लाख रुपयांची चोरी झाली आहे.

येरवड्यात 9 हजाराची चोरी –
येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील वडगाव शेरी आदर्शनगर येथे एक 50 वर्षीय फिर्यादी महिला यांची सुन व तीची आई यांनी संगनमत करून चावी देण्याच्या कारणावरून फिर्यादी यांचे राहते घरात जबरदस्तीने घुसून त्यांना शिवीगाळ व हाताने मारहाण करण्यात आली. तसेच फिर्यादी यांच्या कानातील 9 हजार रुपये किंमतीचे सोन्याची रिंग जबरी चोरी करून नेली आहे. फिर्यादी यांची सुन व तिची आई यांच्याविरूद्ध येरवडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर मध्ये 6 हजारांची चोरी –
हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील ग्लायडींग सेंटर जवळ हडपसर येथे एक 43 वर्षीय फिर्यादी हे त्यांच सासरे सुमार काम संपवून त्यांच्या सासऱ्यासह रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात असतांना मोटारसायकल वरील एक अनोळखी इसमाने त्यांच्या मोटारसायकलला ओव्हरटेक करून फिर्यादी यांच्या गुगल पे खात्याचे शेवटचे ट्रान्सेक्शन दाखविण्याचे बहाण्याने फिर्यादी यांचे सारे यांना चापट मारून त्यांच्याकडील सुमारे 6 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरी चोरी करून नेला आहे.
हे झाले सर्व काल रविवारचे, आता शनिवारी देखील अशाच चोऱ्यांच्या घटना पुणे शहरात घडल्या आहेत.

येरवड्यात 25 हजाराची चोरी –
येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील विमाननगर रोड बारबीक्य व्हिले जवळ एक 21 वर्षीय महिला रा. लोहगाव त्यांच्या मैत्रिनीसह दुचाकीवरून जात असतांना मोटार सायकलवरील तीन अनोळखी इसमांनी दुचाकीवरून त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या हातातील 25 हजार रुपये किंमतीचा आयफोन मोबाईल जबरी चोरी करून नेला आहे.

स्वारगेट मध्ये 1 लाख 17 हजारांची चोरी –
स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील स्वारगेट बस स्टँड मध्ये दुपारी दीड वाजता कवठे महाकाळ ते स्वारगेट बस मधुन खाली उतर असतांना बसच्या दरवाज्या जवळ स्वारगेट एस.टी स्टँड वर गर्दीचा फायदा घेवून एका 55 वर्षीय महिलेच्या पर्समधील सुमारे 1 लाख 17 हजार रुपये किंमतीची सोन्याचे दागिने असलेली छोटी पर्स दागिन्यासह चोरी करून नेली आहे.

खडकीत 69 हजाराची चोरी –
खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील बोपोडी मेट्रो स्टेशन ट्रॅकच्या बाजुला फिर्यादी मंजुनाथ व्यंकटाचलाय वय 36 वर्ष या कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. फिर्यादी यांची कंपनी रेल्वेचे व मेट्रोचे सिंग्नलिंगचे कामकाज करते. त्यांच्या कंपनीचे काम सध्या खडकी ते रामवाडी पर्यंत सुरू असल्याने रेंजहिल्स ते बोपोडी सिग्नलिंगसाठी बसविलेली 69 हजार रुपयांची कॉपरची/ तांब्याची वायर 260 मीटरची पॉवर केबल चोरी झाली आहे. मोटारसायकलवरील दोन अनोळखी इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सारांश, पुणे शहरात चोरी आणि दरोड्याचे सत्र वेगात सुरू आहे. दरदिवशी प्रत्येक पोलीस स्टेशन जबरी चोऱ्या होत आहेत. सार्वजनिक रस्त्यावर चोऱ्या होत आहेत. रोजच चोऱ्या होत असतांना त्यावर पोलीसांचे नियंत्रण असल्याचे कुठेही दिसत नाही. पोलीस स्टेशन हद्दीत येऊन चोऱ्या करणारे इसम कोण आहेत, पोलीस स्टेशन हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेरे फक्त दुचारी वाहनावरील इसमांच्या डोक्यावर हेल्मेट आहे की नाही आणि नसले तर दंड आकारणीसाठीच वापरले जात आहेत काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पुण्याचे पोलीस आणि पुण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पूर्ण उपयोग होत आहे की नाही याबाबत आता विचार होणे गरजेचे झाले आहे.