तक्रारदार नसतांना केवळ तथाकथित व्हिडीओच्या आधारे
राजेश पुराणिक यांचा सामाजिक सुरक्षा विभागाचा पदभार काढुन घेतला
पोलीस आयुक्तांच्या अवसानघातकी निर्णयामुळे, पुणे पोलीसांच्या मनोधैर्यावर दुष्पपरिणाम
पोलीस आयुक्तांची अवैध धंदेवाल्यांच्या पुढे शरणागती –
पुणे/दि/ प्रतिनिधी/National forum/ aniruddha shalan chavan/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडील पदभार काढुन घेण्यात आला असल्याचे वृत्त आले असून त्यांच्या जागी आता विजय कुंभार यांना पदभार देण्यात आलेला आहे. एका तथाकथित व्हिडीओच्या आधारे, कोणताही तक्रारदार नसतांना एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा बळी घेण्याचे काम पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी केले असल्याने याबाबत पुणेकरांनी तीव्र नापसंती व्यक्त करून, या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस आयुक्तांनीच कोणत्याही परिणामांचा विचार न करता, पुणे पोलीसांच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने दोन नंबर धंदेवाल्यांचे मनोबल अधिक वाढले आहे. त्याचे दुष्पपरिणाम अनेक काळ पुणेकरांना सहन करावे लागणार असल्याने, त्यामुळे राजेश पुराणिक यांच्याकडे पुनः सामाजिक सुरक्षा विभागाचा पदभार देण्याची मागणी होत आहे.
धडाकेबाज कारवाईमुळेच बदली केली आहे काय –
श्री. राजेश पुराणिक यांनी सामाजिक सुरक्षा विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून मार्च ते ऑगस्ट 2022 या सहा महिन्यांच्या कालावधीत जुगार अड्डे, मटका अड्डा, क्लब, वेश्याव्यवसाय, अंमली पदार्थ विक्री करणारे, दुधात भेसळ, खाद्यतेलात भेसळ, पेट्रोल- डिझेल चोरी करणारे, रेशनिंगवर माप मारणाऱ्यांवर कारवाई करून 10 कोटी 33 लाख 30 हजार 29 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तर 682 आरोपींवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. तसेच 51 ठिकाणी जबरी धाडी टाकुन धडाकेबाज कारवाई केली आहे.
तसेच 1) सामाजिक सुरक्षा विभागाचे श्री. राजेश पुराणिक यांनी मागील सहा महिन्यात वेश्याव्यवसाय अर्थात पिटाच्या एकुण 11 ठिकाणी धाडी टाकुन कारवाई करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सुमारे 53 आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 10 लाख 44 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
2) मटका अड्डा, जुगार अड्डे, रमीचे क्लब, ऑनलाईन लॉटरी थोडक्यात ज्या ठिकाणी पैसे लावुन जुगार खेळला जातो त्या 34 ठिकाणी धाडी टाकुन 606 आरोपींना जेरबंद केले आहे तर सुमारे 68 लाख 8 हजार 872 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
3) नशेखोरीचा अव्वल नमुना म्हणजे हुक्का पार्लर. या हुक्का पार्लरवर 2 ठिकाणी कारवाया करण्यात आल्या असून, 10 आरोपींवर कारवाई करून सुमारे 1 लाख 37 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
4) प्रोव्हीबिशनच्या 2 ठिकाणी कारवाया करून 4 आरोपींना अटक केली आहे तसेच 42 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
5) पेट्रोल, डिझेल चोरी प्रकरणी सुमारे 20 डिझेल-पेट्रोल जप्त करून केवळ एका ठिकाणाहून सुमारे 9 कोटी 52 लाख 96 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
6) जे. जे. ॲक्टनुसार एक ठिकाणी कारवाई करून सुमारे 157 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
थोडक्यात 51 ठिकाणी धाडी टाकुन सुमारे 682 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत तर 10 कोटी 33 लाख 30 हजार 29 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. थोडक्यात महाराष्ट्र शासनाचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान करून सरकारची फसवणूक करणाऱ्यांना श्री. राजेश पुराणिक यांनी कठोर कारवाई करून एक आदर्श पोलीसाची प्रतिमा निर्माण केली आहे.
दरम्यान सहा महिन्यात धडाधड कारवाया करून गुन्हेगारांची आर्थिक रसद बंद केली. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचे अथक प्रयत्न केले. तसेच मागील 20/30 वर्षांपासून अवैध धंदे करणारे परंतु कोणत्याही पोलीस स्टेशन हद्दीत एकही गुन्हा नोंद नसल्याने त्या व्हाईट कॉलरवाल्यांची श्री. राजेश पुराणिक यांनी गचांडी पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून खरे गुन्हेगार कोण आहेत ते पुणे शहराला दाखवुन देण्याचे महत्वाचे कार्य श्री. पुराणिक यांनी केले आहे. ही एक एैतिहासिक कामगिरी श्री. पुराणिक यांनी करून खाकी वर्दीतील पोलीस काय करू शकतो हे जगाला दाखवुन दिले आहे.
बेकादेशिर धंदयाची कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली –
पुणे शहरातील व्हाईट कॉलर वाल्यांचे पितळ उघडे केल्याने, पुणे शहरातील बहुतांश 32 पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद झाले होते. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांच्या पोलीस कारवाईच्या भितीमुळे अनेक व्हॉईट कॉलर पुणे शहरातून परागंदा झाले होते.सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल बंद झाली होती. त्यामुळे भेदरलेल्या व्हॉईट कॉलरने त्यांच्या अंतर्गत करावाया सुरू ठेवून, श्री. राजेश पुराणिक यांना एका तथाकथित व्हिडीओच्या आधारे त्यांची बदनामी सुरू करण्यात आली. त्यात खात्यातील काही मंडळींचा सहभाग असल्याचेही दिसून आले आहे.
गुन्हेगारांवर कारवाई करायची नाही, मग … काय त्यांना कडेवर घेवून मिरवायचे काय –
तथाकथित व्हिडीओमध्ये राजेश पुराणिक कारवाई करीत असतांना दिसत असले तरी हा व्हिडीओ नेमका कुठला व कधीचा आहे त्याचे रहस्य आजपर्यंत उलगडलेले नाही. जुगार अड्डे, मटका अड्डा, क्लब, वेश्याव्यवसाय, अंमली पदार्थ विक्री करणारे, दुधात भेसळ, खाद्यतेलात भेसळ, पेट्रोल- डिझेल चोरी करणारे, रेशनिंगवर माप मारणाऱ्यांवर गुन्हे केल्यानंतर मेरी आवाज सुनो ची प्रक्रिया राबविणे आवश्यक असणे स्वाभाविक आहे. गुन्हेगार कबुली देत नसतील तर मग काय, पुणे पोलीसांनी अशा प्रकारच्या गुन्हेगारांना कडेवर घेवून गावभर मिरवायचे काय असाही सवाल पुणेकर व्यक्त करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या निर्णयांचा पुणे पोलीसांच्या मनोधर्यावर दुष्परिणाम होतील –
पोलीस आयुक्तांची अवैध धंदेवाल्यांच्या पुढे शरणागती –
धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या श्री. राजेश पुराणिक यांच्याकडील सामाजिक सुरक्षा विभागाचा पदभार काढुन घेवून, एका धाडसी अधिकाऱ्याला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्याचे काम पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी केले आहे. आय.पी.एस. अधिकारी दोन/ तीन वर्षांसाठी पुण्यात कर्तव्य बाजावतील, आय.पी.एस. येतील आणि जातील. परंतु त्यांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयांचा पोलीसांच्या मनोधर्यावर परिणाम होत असतात. राजेश पुराणिक यांनी 32 पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांच्या विरोधात जावून केवळ सामाजिक न्यायासाठी व कायदयाद्वारा स्थापित कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली आहे. दरम्यान सर्वच आय.ए.एस, आय.पी.एस., आय.आर.एस. येतील आणि जातील. परंतु पुणे शहरात आम्हाला कायम रहायचे आहे. श्री. अमिताभ गुप्ता यांनी एका प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावर कारवाई करतांना, पुणेकरांचा थोडातरी विचार करायला हवा होता. पुणे शहर पोलीसांच्या मनाधैर्याचा देखील विचार करून निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु मनमानीपणे एका नादीरशहा सारखे निर्णय घेवून, आम्हा पुणेकरांवर विनाकारण संक्रात का आणली जात आहे.
श्री. राजेश पुराणिक यांच्याकडील पदभार काढुन घेतल्याने, पुणे शहर पोलीसांच्या मनोधैर्यावर पुढील काळात दुष्पपरिणाम होण्याची शक्यता आहे. इथुन पुढे कोणताही अधिकारी दोन नंबर धंदेवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पुढे येणार नाही. त्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढतच जाणार आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोणतेही सबळ कारण न देता दोन नंबर धंदेवाल्यापुढे शरणागती पत्करली असल्याचे दिसून येत आहे.
महिला आयोगचे पत्र सबळ कारण कसे होऊ शकते –
दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कुठेही महिला असल्याचे दिसून येत नाही. तसेच ज्या कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या व राज्य शासन, पुणे पोलीसांच्या आदेशाविरूद्ध वर्तन व नाकावर टिच्चुन रात्रौ- अपरात्रौपर्यंत नाईट क्लब सुरू ठेवणाऱ्या व स्पा आणि मसाज पार्लरमध्ये उघडा नागडा धिंगाणा घालणाऱ्यांवर कारवाई केल्याचे प्रकरण देखील समोर आले होते. त्यामध्ये पोलीसांनी महिलांच्या अंगाला हात लावला असता तर विनयभंग ठरला असता, त्यामुळे हातातील काठी हवेत फिरवुन, किंवा दर्शवुन अर्धनग्न महिलांना तेथून हुसकावून लावले असल्याचे ऐकिवात होते. तथापी त्यांनी देखील कुठे तक्रार केल्याचे आढळुन आले नाही. असे असतांना देखील महिला आयोगाचे पत्र आले म्हणून कारवाई केल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे.
पोलीस आयुक्त सर्वच आयोगाच्या पत्रांवर कारवाई का करीत नाहीत –
राज्य महिला आयोग, राज्य व राष्ट्रीय अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोग, मानवी हक्क आयोग यांच्याकडे नागरीकांकडून करण्यात येणाऱ्या सर्वच तक्रार अर्जांवर, संबंधित आयोग कोणतीही चौकशी करीत नाहीत. केवळ संबंधित पोलीसांना पत्र पाठवुन तक्रार अर्जाचा तपास करावा अशा सुचना देते. त्यामुळे वरील तीन आयोगाकडून पुणे पोलीसांना किमान 200 च्या आसपास पत्रे व निवेदने आली आहेत. पैकी काही निवेदनांच्या प्रती आमच्याकडे देखील आहेत. मागील दोन/ तीन वर्षांपासून त्याच्यावर कारवाई केली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राजेश पुराणिक यांची कोणतीही चौकशी न करता मनमानीपणे पदभार काढण्याचा प्रकार संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. केवळ महिला आयोगाने पत्र दिले म्हणून पदभार काढुन घेतला हे सबळ कारण ठरू शकत नाहीये.
पुनः पदस्थापना हीच विनंती –
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी अवैध धंदेवाल्यांविरूद्ध कठोर कारवाई करून, व्हाईट कॉलरवाल्यांना येरवडा कारागृहाचा रस्ता दाखविण्यात आला आहे. शहरातील गुन्हेगारी कमी झाली आहे. हे सर्व श्रेय श्री. पुराणिक यांचेच आहे. त्यामुळे कोणत्याही अवैध धंदेवाल्यांपुढे शरणागती न पत्करता, पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी राजेश पुराणिक यांची पुनः पदस्थापना व पूर्ण कार्यभार श्री. पुराणिक यांच्याकडे देण्याची सर्व पुणेकरांची मागणी आहे.
दरम्यान पुणे शहराचे पोलीस आयुक्त यांनी घेतलेल्या निर्णयाविरूद्ध पुणे शहर न्यूज पोर्टल, दैनिक,साप्ताहिक वृत्तपत्र संघटनांचे प्रतिनिधी आजपासून सात दिवस दंडावर काळी रिबिन बांधून पोलीस आयुक्तांच्या निर्णयाचा निषेध करणार असल्याचे संघटनेच्यावतीने जाहीर केले आहे.