Tuesday, December 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेच्या भवानी पेठेवर कारवाई, सिंहगडावर मात्र एवढी दया कशासाठी….

पुणे/दि/ प्रतिनिधी/
भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या स्थापत्य विभागातील टेंडर महाघोटाळ्याने भ्रष्टाचार किती खोलवर रूजला असल्याचे दाखवुन दिले आहे. कारवाईच्या भितीने एका अभियंत्यांचा मृत्यू झाला. धनकवडी क्षेत्रिय कार्यालयातील एक उपभियंता आणि कनिष्ठ अभियंता निलंबित झाला. परंतु सिंहगड क्षेत्रिय कार्यालयातील प्रभाग क्र. ४२ मधील फाईल्स दक्षता विभागात धुळखात पडल्या असतांना, त्यांच्यावर मात्र कारवाईचे नाव नाही. असा भेदभाव का केला जात आहे असा सवाल सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते विचारत आहेत.


पुणे महापालिकेतच्या भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाने काढण्यात आलेले टेंडर मध्ये कामे न करताच बिले अदा केल्याचे निदर्शनास आले. तसेच टेंडर नुसार करण्यात आलेली कामे अतिशय निकृष्ट दर्जाची, दर्जाहीन हीणकस कामे केल्याचेही चौकशीत आढळुन आल्यानंतर, उपआयुक्त कार्यालयाने, संबंधित क्षेत्रिय कार्यालयातील अभियंत्यावर ठपका ठेवून, त्यांना निलंबनाचे प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आले. त्यातही एका अभियंत्यांचा धक्क्याने मृत्यू झाला.
धनकवडी क्षेत्रिय कार्यालयातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांची मालिका संपण्याचे नाव घेत नाही. ज्या निविदा कामांविषयी तक्रारी आहेत, त्याबाबत कोणतीही चौकशी केली जात नाही. दरम्यान सहकारनगर येथील क्रिडांगण व इतर कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी दोन अभियंते निलंबित झाले असले तरी, इतर निविदा कामांची चौकशी केली जात नाही. धनकवडी क्षेत्रिय कार्यालयातील एकुण २२ निविदा कामांमध्ये भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाला असून, कामे न करताच बिलांचे देयक अदा करण्यात आले आहेत.
उपआयुक्त परिमंडळ क्र. ३ यांच्याच सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयातही तत्कालिन उपअभियंता श्री. संभाजी खोत यांनी भ्रष्टाचार व गैरव्यवहार करून सेवानिवृत्त झाले आहेत. प्रभाग क्र. ४२ मधील निविदा कामांच्या फाईल्स दक्षता विभागाने ताब्यात घेतल्या आहेत. त्याबाबतचा अहवाल दडवून ठेवला असतांना, प्रभाग क्र. ३० मधील निविदा कामांतील भ्रष्टाचार व गैरव्यवहारांची चौकशी न करता ते प्रलंबित ठेवण्यात आले आहे. चौकशी न करता अभियंत्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्त यांनी तातडीने दोषी अभियंत्यावर कारवाईची मागणी केली आहे. तथापी महेंद्र बहिरम आणि विजय पाटील यांची पदोन्नती झाली असून, त्यांच्या जागी नवीन अभियंते रूजु झाले आहेत. तथापी प्रभाग क्र. ३० मधील निविदा कामाबाबत विजय पाटील यांनी खुलासा केला असून, यामध्ये त्यांचा काहीच सहभाग नसल्याचे नमूद केले आहे. यामुळे या प्रकरणातील दोषी अभियंत्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान उपआयुक्त कार्यालयाकडून या सर्व प्रकरणांची पाठराखण केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त कार्यालयाने या प्रकरणी लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे.