Tuesday, December 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेत विविध पदांची नोकरभरती, सर्व खात्यांकडून रिक्त पदांचा तपशील मागविला

पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/
पुणे महापालिकेत नोकर भरती करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या १४ डिसेंबर २०२१ च्या पत्रानुसार मान्यता देण्यात मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात पुणे महापालिकेतील नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.


पुणे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने, सर्व खातेप्रमुखांना एक परिपत्रक पाठविले असून, त्यामध्ये त्यांच्या त्यांच्या विभागाकडील रिक्त पदांचा तपशील तातडीने कळविण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. या पत्रात नमूद केले आहे की, पुणे महापालिकेच्या आस्थापनेवर सरळसेवेने पदभरती करण्यासाठी संवर्गनिहाय बिंदू नामावली नोंदवह्या तपासून घेणे आवश्यक आहे. तसेच पुणे महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागांना कुठल्या पदांची आवश्यकता आहे याची माहिती घेवून सरळसेवेने भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने पुणे महापाकिलेच्या वेगवेगळ्या विभागांनी महाराष्ट्र शासन यांनी मान्यता दिलेल्या आकृतीबंधानुसार आपल्या विभागासाठी संवर्गनिहाय सरळसेवेने भरती करावयाच्या पदांबाबत विहीत नमून्यातील माहिती आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या विहीत नमून्यात पदाचे नाव, मंजुर पदसंख्या, कार्यरत पदसंख्या, रिक्त पदसंख्या, सरळसेवेने भरावयाची रिक्त पदसंख्या यांचा समावेश आहे. विहीत नमून्यानुसार सर्व माहिती आस्थापना विभाग यांना आठ दिवसात कळविण्यात यावी असे निदेश उपआयुक्त श्री. राजेंद्र मुठे यांनी सर्व खातेप्रमुखांना दिले आहेत.