मुंबई/दि/ प्रतिनिधी/
राष्ट्रवादी कॉंग्रेसला डिवचणारे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज भेट घेतली. यावेळी त्यांनी आंबेडकरांना भाजपविरोधी आघाडीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधान आले आहे.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माणिकराव ठाकरे यांनी आंबेडकर यांची त्यांच्या पक्ष कार्यालयात भेट घेतली. विशेष म्हणजे आंबेडकर यांनी एमआयएमशी युती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही भेट झाली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत . मात्र, त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही. विधानसभेच्या निवडणुकी नंतर शिवसेना भाजपला पाठिंबा द्यायला तयार नव्हती, तेव्हा राष्ट्रवादीने आमदारांच्या दबावाखाली भाजपला बाहेरुन पाठिंबा देण्याची सर्वप्रथम तयारी दर्शवली होती. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर जाण्यात आम्हाला अडचण आहे, असे आंबेडकरांनी सांगितले. मात्र, निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत कॉंग्रेससोबत जाण्याची वाट पाहू, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकीकडे राष्ट्रवादीला दूर सारण्याचा विचार आंबेडकरांनी बोलून दाखवला असताना विखे पाटल यांनी त्यांची भेट घेतल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संबंधातही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.