Tuesday, January 27 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय हद्दीत दरदिवशी 80 मे.टन ओला कचरा येतो तरी कुठून….?कसा होणार … नवल किशोर रामांच्या स्वच्छतेचा पुणे पॅटर्न…?

नॅशननल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम आणि अति. आयुक्त पवनित कौर यांनी पुणे शहराला स्वच्छतेत टॉप स्थानावर ठेवण्यासाठी व देशात पुणे शहर हेच स्वच्छतेचा पॅटर्न म्हणून ओळखला जाईल यासाठी दिवसरात्र प्रयत्न करीत आहेत. आयुक्त आणि अति. आयुक्त यांच्या कार्यालयात घनकचरा विभागाच्या बैठकांवर बैठकांचे सत्र सुरू असते. क्षेत्रिय कार्यालय स्तरावर कार्यरत असणारे घनकचरा विभागाकडून येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडविल्या जात आहेत. कचऱ्यासाठी किंवा कचऱ्याच्या वाहतुकीसाठी वाहने कमी पडत आहेत असा बैठकीत सुरू आल्यानंतर, आयुक्तांनी तत्काळ भाडे तत्वावर लहान वाहने घेण्याचा निर्णय घेवून 24 तासात 48 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली. घनकचरा विभागाचा एकही शब्द आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त खाली पडू देत नाहीत. पुणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आयुक्त कार्यालय कमालिचे दक्ष झालेले असतांना, वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाचे दोन्ही वरिष्ठ आरोग्य निरीक्षक (डीएसआय) नितीन लोखंडे व संदीप चव्हाण यांनी मात्र बुद्धीची दिवाळखोरी लिखित स्वरूपात जाहीर केली आहे. दर दिवशी 80 मे.टन कचरा येतो कुठून या प्रश्नाला… थेटच बोध होत नसल्याचे उत्तर देवून, आयुक्तांच्या अंगावरच कचरा फेकण्याचे काम केले आहे. हा सर्व प्रकार वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या महापालिका सहायक आयुक्त अस्तिमा तांबे यांच्या समोरच घडला आहे.

इनसिटू व कम्युनिटी पद्धतीने कचरा जिरविणे आणि लोखंडे-चव्हाणांची बुद्धीची दिवाळखोरी-
आयुक्त नवल किशोर रामांच्या स्वच्छतेच्या पुणे पॅटर्नचे आत्ताच वाजेल महाबारा-

वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाने त्यांच्या हद्दीत बल्क वेस्ट जनरेटर्स अंतर्गत पॅनेलसह खाजगी संस्थेमार्फत ओला कचरा जिरवित असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाला दिलेली आहे. त्यावर वरिष्ठ आरोग्य निरीक्षक नितीन लोखंडे व संदीप चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याच धर्तीवर माहितीच्या अधिकारात माहिती विचारण्यात आली होती. वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय हद्दीत पुणे महापालिकेच्या पॅनेलवरील व पॅनेलबाहेरी ज्या खाजगी संस्था ओला कचरा जिरविण्याचे काम करीत आहेत त्यांची माहिती विचारण्यात आली होती. त्यावर लोखंडे-चव्हाणव्दयांनी ही माहिती पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याचे नमूद केले आहे.

लोंखडे-चव्हाण सारख्या बेजबाबदार डीएसआय यांनी पुणे महापालिकेची वेबसाईट कधी पाहली आहे काय असाच प्रश्न यातुन निर्माण झाला आहे. अशी कोणतीही माहिती क्षेत्रिय कार्यालयनिहाय पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध नाही. दरम्यान इनसिटू सह ज्या सोसायट्यांचा ओला कचरा कम्युनिटी कंपोस्टींग करीता घेतला जातो त्याचीही माहिती विचारण्यात आली होती. तथापी ही देखील माहिती पुणे मनपा वेबसाईटवर उपलब्ध असल्याचे नमूद करून लोखंडे-चव्हाणव्दयांनी बुद्धीची दिवाळखोरी जाहीर केली आहे. पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागात कचऱ्यासंबंधात बैठकांचे सत्र नेहमी सुरू असते, त्यावेळी अशीच उत्तर उपआयुक्तांना सादर केली जातात काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर अशा बुद्धीभ्रष्ट दिवाळखोर वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांची कानउघडणी का केली जात नाही या प्रश्नांसह, आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांना पुणे शहर स्वच्छ ठेवण्याची किती काळजी आहे हे यातून दिसून येत आहे. त्यामुळेच आयुक्त नवल किशोर रामांच्या स्वच्छतेच्या पुणे पॅटर्नचे आत्ताच महाबारा वाजले आहेत एवढे नक्की.

वारजे कर्वेनगरातील बीडब्ल्युजी प्रकल्पधारक कंपोस्ट खताचे काय करतात-
वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय हद्दीत सरसकट इनसिटू पद्धतीने ओला कचरा जिरवित आहेत, तर तयार झालेले कंपोस्ट किती व कुठे वापरले जाते या प्रश्नाचे उत्तर लोखंडे-चव्हाणव्दयांनी दिले आहे. ते म्हणतात खाजगी संस्थेची माहिती वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाकडे उपलब्ध नाही. दरम्यान नेमका मुद्दा काय आहे, आपण उत्तरे काय देत आहोत, याचेही भान या दोन्ही डीएसआय यांना नाही. याचा अर्थ आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक हे कधीच सोसायट्यांमध्ये जात नाहीत, ओला कचरा कसा जिरविला जातो ते पाहत नाही, हद्दीत फिरत नाहीत, त्यामुळे ओला कचरा जिरवितात की नाही हेच त्यांना माहिती नसल्यामुळे कंपोस्ट म्हणजे काय हेच या बुद्धीच्या दिवाळखोरांना माहिती नसल्याचे समोर आले आहे. खरं तर घनकचरा विभागाने एसआय व डीएसआय यांचे प्रशिक्षण घेण्याच वेळ आली आहे.
त्याच्याही पुढे जावून पॅनेलवरील व पॅनेलबाहेरील खाजगी संस्थाकडून दैनंदिन किती ओला कचरा जिरविला जातो या प्रश्नाचे उत्तर टँगोपंच मारून दिले आहे की काय अशी शंका येत आहे. पुणे महापालिका घनकचरा विभागाला दिलेल्या उत्तरात 50 मे.टनावर प्रक्रिया केली जाते असे नमूद आहे. माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरात 11.573 ही आकडेवारी लोखंडे-चव्हाणव्दयांनी आणली तरी कुठून यासाठी समिती गठीत करावी लागणार असे बहुदा दिसते.

खाजगी संस्था सर्व ओला कचरा जिरवितात तर हद्दीत 80 मे.टन कचरा कसा –
वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय हद्दीत दैनंदिन 50 ते 70 मे. टन ओला कचरा पॅनेलवरील व खाजगी संस्थेमार्फत जिरविला जात असल्याचे अभिलेखे पुणे महापालिकेत लेखी स्वरूपात उपलब्ध आहेत. तरी देखील कात्रज रॅम्पवर दैनंदिन 50 ते 70 मे. टन ओला कचरा कसा पाठविला जातो, ओला कचरा जिरविला असेल तर हा कचरा आपल्या हद्दीतून कुठून आला आहे… या मुद्याला देखील लोखंडे-चव्हाणांनी टँगो पंच मारूनच उत्तर दिले आहे. ते म्हणतात अर्जदारांनी विचारलेल्या प्रश्नांचाच बोध होत नाही. आता काय डोक आपटून घ्यायचं का… ह्या दोघांपुढे… अशी उत्तर जर वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दर्जाचे अधिकारी देत असतील तर… आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपआयुक्त नेमकं… कचऱ्यासंबंधी कसल्या बैठका घेतात… हा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे.

वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयातील लोखंडे-चव्हाण डीएसआय आहेत की, खड्डा बिगारी-
आपण ज्या क्षेत्रिय कार्यालयात वर्षानुवर्षे काम करीत आहोत, तिथला ओला व सुका कचरा कोणत्या प्रकल्पावर जातो, दरदिवशी ओला किती व सुका कचरा किती संकलित होतो, त्याची आकडेवारी ज्या एसआय व डीएसआयला माहिती नसेल तर, तो संबंधित सेवक कामावर हजर असतो की नाही या बाबत शंका उपस्थित होते. वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील ओला व सुक्या कचऱ्याबाबत देखील दोन्ही डीएसआय यांनी टँगो सोडून हातभट्टीचा फुगा ओढल्यासारखे उत्तर दिले आहे. पुणे महापालिकेच्या अभिलेख्यासह कात्रज रॅम्पच्या अभिलेख्यात देखील वारजे कर्वेनगरच्या ओला व सुका कचऱ्याची माहिती उपलब्ध आहे. तरी देखील उरूळी देवाची,नोबेल व शेतकऱ्यांना कचरा दिला जातो अशी उत्तरे देवून दोन्ही डीएसआय यांना स्मृतीभ्रंश झाल्याचे त्यांनी लेखी उत्तरातून दाखवून दिले आहे. एखादया सफाई सेवकाने एकवेळ अशी उत्तरे दिली असती तर समजु शकतात. परंतु जबाबदार अधिकाऱ्यांनी अशी उत्तरे देणे म्हणजे बुद्धीची दिवाळखोरी जाहीर करण्यासारखी आहे.

आयुक्त आणि अति. आयुक्तांना आमचाही प्रश्न-
आयुक्त नवल किशोर राम हे स्वच्छतेचा इंदौर पॅटर्नच्या पुढे जावून, त्यांनी आता देशात स्वच्छतेचा पुणे पॅटर्न राबविण्याचा संकल्प जाहीर केला आहे. त्यासाठी दिवसरात्र बैठकांचे सत्र सुरू असते. परंतु लोखंडे आणि चव्हाणांसारखे डीएसआय असतील तर पुणे शहर हे स्वच्छतेचा पुणे पॅटर्न होणार तरी कसे याचे उत्तर (वेळ मिळाल्यास) आयुक्तांसह अति. आयुक्तांनी पुणेकरांपुढे सादर करणे आवश्यक आहे. एसआय,डीएसआयसह कचरा प्रकल्पांच्या भरवश्यावर पुणे शहर सोडणे किती धोक्याचे आहे, हे वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या पत्रातून दिसून येत आहे. पुणे महापालिकेने आजपर्यंत स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात 21 वा, 16 वा, 9 वा, 10 वा, 5 वा असा क्रमांक आजपर्यंत आणला आहे. पहिला, दुसरा तर सोडा आता 50 च्या आतमध्ये तरी नंबर आणणार काय असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.
आयुक्त, अति. आयुक्तांसह उपआयुक्तांनी लोखंडे-चव्हाणांचा योग्य तो समाचार घेणे आवश्यक आहे. नाहीतर बल्क वेस्ट गार्बेज सह हॉटेलगाडी, खाजगी कचरा ह्याची भली मोठी यादी पुढील काळात पुणेकरांसमोर मांडणे क्रमप्राप्त ठरते.