Tuesday, January 13 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

पुणे महापालिका निवडणूकः चंदननगर भागात 25 लाखाचा मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त

नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक दोन हे पुणे महानगरपालिका निवडणुक 2026 च्या अनुषंगाने पुणे शहर आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ गैरव्यवहाराचे अनुषंगाने प्रतिबंधक कार्यवाही करीता पेट्रोलिंग करत असताना सुमारे 25 लाख रुपयांचा मॅफेड्रोन जप्त केला आहे. दरम्यान मागील काही काळात याच पुणे शहरात सुमारे 8 हजार कोटी रुपयांचा एमडी जप्त केला होता. आता देखील जागोजाग अंमली पदार्थांवर कारवाई केली जात असली तरी, पुणे शहरात मेफेड्रॉन (एम.डी), गांजा, चर्रस, अफीम सारखे अंमली पदार्थ सहज मिळतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले होते की, ज्याच्या हद्दीत अवैध धंदे आढळुन येतील, त्या पोलीसांवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान पुण्यात बहुतांश ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री होत असतांना, आता का कारवाई केली जात नाही असाही प्रश्न पुणेकर व्यक्त करीत आहेत. पोलीस आयुक्तांच्या कारवाईची धमकी केवळ मिडीयाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे एवढच…

चंदननगर येथे पकडलेल्या अंमली पदार्थ गुन्ह्याची हकीकत अशी की, पोलीस अंमलदार संदिप देवकाते यांना त्याचे गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की योगी आईसक्रिम फॅक्टरी, सोपान नगर येथील सायरस पेडर यांचे फार्म हाऊस मध्ये वडगांवशेरी रोड पुणे येथे इसम नामे रतननाथ मोहननाथ योगी, वय 42 वर्षे, रा. स.नं. 23. सोपान नगर, वडागांव शेरी पुणे हा मुळचा राजस्थान स्थित रहीवासी असून चंदननगर भागात मोठ्या प्रमाणात मॅफेड्रॉन (एम.डी.) ची विक्री करीत असल्याचे समजले.

 बातमी मिळाल्यावरून गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक 02 कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कार्यवाही करून नमुद आरोपी यास शिताफीने पकडून त्याचे कब्जातून एकुण 25 लाख रुपये किंमतीचा 120 ग्रॅम 79 मिलीग्रॅम मॅफेड्रॉन (एम. डी.), इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, ॲन्डरॉईड फोन व रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याचे विरूध्द चंदननगर पोलीस स्टेशन  येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री पकंज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.2. श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक 2. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री सुदर्शन गायकवाड यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक पोलीस उप-निरीक्षक अस्मिता लाड, पोलीस अंमलदार, राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनिल महाडीक, गणेश गोसावी, अमोल जगताप, संदिप देवकाते, दिनेश बास्टेवाड, महेश बोराडे, शुभांगी म्हाळसेकर यांचे पथकाने केली