
निवडणूक- पुणे महापालिकेची,
हातभट्टी – सहकारनगर पोलीसांची
चंगळ आहे, कार्यकर्त्यांची…
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुणे महानगरपालिकेच्या निवडणूका अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. पुणे शहरात निवडणूकीचा ज्वर पसरला असुन सर्वत्र लोकशाहीचा महाउत्सव सुरू आहे. गल्लीबोळातील प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते अंग झटकुन प्रचारात सहभागी झाले आहेत. दरम्यान यात सहकारनगर पोलीसांच्या सहकार्याने कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील बहुतांश झोपडपट्टयांमध्ये हातभट्टी दारूची खुलेआम विक्री आणि जागेवर बसुन पिण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. कार्यकर्ते कुठून फिरून आले की, एक मग्गा उचलायचा आणि थेट तोंडाला लावायचा… सोबतीला वजडी-पाव आणि तिखट मिठ लावलेला हरभरा…

पुणे महापालिकेची निवडणूक तब्बल 9 वर्षानंतर होत आहे. मध्यंतरी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका झाल्या, परंतु पुणे महापालिकेच्या निवडणूकीसारखी रंगत आजपर्यंत पहायला मिळाली नव्हती. ती आज पहायला मिळत आहे. झोपडपट्टया असो की, चाळी... लहान मोठ्या सोसायट्या असो की, व्यापारी संकुल. जिकडे तिकडे कार्यकर्त्यांना भाव आला आहे. प्रत्येकाच्या हातात ज्या त्या पक्षाचा झेंडा दिसून येत आहे.
बिबवेवाडी ओटा ते अप्पर इंदिरानगर- सरगम चाळ, अरण्येश्वर तावरे कॉलनी ते पद्मावती वसाहत, पुरग्रस्त वसाहती ते तळजाई, दाते स्टॉप ते तळजाई दक्षिण भाग, तळजाई वसाहत ते वनशिव वस्ती, चव्हाणनगर काळुबाई मंदिर ते धनकवडी, व्हाया शंकर महाराज मठ, संभाजी नगर, गुलाबनगर चौक ते आंबेगाव पठार, पवार संकुल ते भारती विद्यापीठ परिसर, कात्रज चौक ते डोंगर माथ्यावरील इंदिरा वसाहत कात्रज, या संपूर्ण 5 प्रभागात निवडणूकीचा ज्वर पसरलेला आहे. त्यात देशी विदेशी दारूपेक्षा हातभट्टी अधिक सक्रिय व लोकप्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी मिडीया समोर आजपर्यंत कितीही वल्गना केल्या तरी पुणे शहरातून अवैध धंदे बंद झालेच नाहीत. अवैध धंदे असले तर पोलीसांवर कारवाई करेन ही धमकी केवळ मिडीयाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुणे शहरातील सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत सर्वच अवैध धंदे अमितेश कुमार यांच्या येण्यापासून आजही सुरू आहे. ते वर्षानुवर्षे सुरू आहेत. जुगार मटका हा स्वतंत्र विषय आहे, नाहीतर पद्मावतीपासून ते तळजाई वनशिव वस्तीपर्यंत मटका जुगाराचा कसा बाजार भरलाय हे सांगावे लागेल. परंतु आजचा विषय निवडणूक आणि हातभट्टीचा आहे.
तसही सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत सर्वच अवैध धंदे सुरू आहेत. हातभट्टीने मात्र कहर केला आहे. हद्दीत पुरवठा करूनही लगतच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, बिबवेवाडी पोलीस स्टेशन, पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतही पुरेल इतका साठा सहकार नगर पोलीस स्टेशन हद्दीत साठल्याचे दिसून येत आहे. या पोलीस स्टेशन हद्दीतही सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतून हातभट्टीच्या कॅनची बिनदिक्कमपणे वाहतुक सुरू असते. सहकारनगर पोलीसांच्या सहकार्यामुळे नेत्यांची निवडणूक सहज सोपी झाली आहे. देशी विदेशीच्या खर्चापेक्षा हातभट्टीवर कार्यकर्ते जोमात कामाला लागल्यामुळे सर्वच पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्ते सहकारनगर पोलीस स्टेशनचे आभार व्यक्त करीत आहेत.
