Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

हवाला प्रकरणांत १ कोटी २९ लाख जप्त, पंचनामा मात्र ९१ लाखांचा… बाकीची रक्कम गेली कुठे… पोलिस उपायुक्त परिमंडळ क्र. १ कार्यालयाचा असाही कारभार

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र. १ यांच्या नेतृत्वाखाली श्रीमंत दगडुशेठ गणपती जवळील तिरंगा बिल्डींग येथे आंगडीया अर्थात हवाला प्रकरणांतील कारवाई करण्यात आली. यामध्ये १ कोटी २९ लाख रुपये जप्त करण्यात आले परंतु प्रत्यक्षात ९१ लाख रुपयांचा पंचनामा केला असून, बाकीची रक्कम नेमकी गेली कुठे अशी चर्चा सध्या पोलीस उपायुक्त परिमंडळात सुरू आहे.


याबाबतची तक्रार पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत गेली असल्याची माहिती मिळाली आहे. अगदी याच प्रकारची दुसरी कारवाई शनिवारवाडा फुटका बुरूजासमोर झाली आहे. परदेशी नामक व्यक्तीच्या जुगार क्लब वर पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र. १ यांनी कारवाई केली. या ठिकाणी क्लबमध्ये येणार्‍या गिर्‍हाईकाच्या गाडीतून सुमारे अडीच लाखापेक्षा मोठी रक्कम जप्त करण्यात आली. परंतु त्याचा पंचनामा करण्यात आलेला नसून तेही प्रकरण अतिशय गंभिर स्वरूपाचे झाले आहे.
दरम्यान पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र. १ यांच्या हद्दीतील सर्व धंदे बंद असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील कुख्यात गुंडाचा धंदा सुरू आहे. अप्पा कुंभार याचाही मटका व क्लब आजपर्यंत सुरू असून, त्याला समर्थ पोलीस स्टेशनकडील (व)कसुलदार पोलीस कर्मचारी श्री. साबळे यांच्यावर सर्व भिस्त ठेवून कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. खडकच्या हद्दीतही मोठ्या संख्येने जुगार सुरू आहेत. नंदू नाईक याचाही धंदा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. विश्रामबाग पोलीस हद्दीतही धंदे वेगाने सुरू आहेत. या सर्व धंद्यामागे उपायुक्त परिमंडळ क्र. एक यांचे संरक्षण असून, ते बंद झाले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
वरील सर्व प्रकरणांची माहिती पोलीस आयुक्तांकडे गेलेली असतांना, कारवाई मात्र शून्य आहे. त्यामुळे शहरातील सर्वांच्याच भूवया ताणल्या गेल्या आहेत.