Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

संभाजी महाराजांनंतर आता संत तुकाराम महाराजांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण

मुंबई/दि/प्रतिनिधी/

                छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर आता संत तुकाराम महाराज यांच्या पत्नीबद्दल एका पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण केल्याचे आढळले आहे. आता तर हद्द झाली, सर्व शिक्षा अभियानातली ही पुस्तकं अभ्यासक्रमातून काढून घ्या. संबंधितांवर कारवाई कराच, पण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जबाबदारी पेलवत नसेल तर राजीनामा द्यावा,  असा हल्लाबोल अजितदादा पवार यांनी केला.

                सर्व शिक्षा अभियानाच्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण केल्याचा वाद शमत नाही तोच, या अभियानातील आणखी एका पुस्तकात संत तुकाराम महाराज व त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण असल्याची माहिती समोर आली आहे. गोपीनाथ तळवलकर यांनी लिहिलेल्या ‘संतांचे जीवन प्रसंग’ या पुस्तकात हे वादग्रस्त लिखाण आहे. ‘तुकाराम महाराजांची बायको फार रागीट. तोंडाला कुत्रे बांधावे ना तसे, तिच्या तोंडून कायम शिव्याच बाहेर यायच्या’ असा उल्लेख या पुस्तकात करण्यात  आला आहे. यावरूनच शिक्षण खात्यावर ताशेरे ओढणार्‍या अजितदादांनी विनोद तावडेंची चांगलीच खेचली आहे. आता तर हद्द झाली असून तावडे यांनी जबाबदारी पेलवत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असी मागणीही केली आहे.

संभाजी ब्रिगेड संतप्त

                छत्रपती संभाजी महाराज आणी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करुन त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्व शिक्षा अभियानातील या सर्व पुस्तकांचे वितरण थांबवून ती त्वरित मागे घ्यावीत. तसेच याप्रकरणी जे दोषी आहेत त्या सर्वांवर कठोर कारवाई करावी. या प्रकरणाची जबाबदारी स्विकारुन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.