Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

रखवालदारी करणारा चौकीदारच निघाला चोर, राजस्थानमधील सभेत राहूल गांधीची मोदींवर सडकून टीका

डुंगरपुर – पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य करत राहुल गांधींनी गुरुवारी राजस्थानमधील सभेत नवीन घोषणा दिली. ’गली गली मै शोर है हिंदुस्तान का चौकीदार चोर है’ असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला. राजस्थानमधील डुंगरपुर येथील सभेत त्यांनी ही घोषणा दिली. विशेष म्हणजे राहुल यांचे वडिल राजीव गांधीच्या विरोधात बोफोर्स घोटाळ्याप्रकरणी ’गली गली मै शोर है राजीव गांधी चोर है’ हीच घोषणा ८०च्या दशकात विरोधकांनी गाजवली होती.

                सभेत बोलताना राहुल यांनी निवडणूकांमध्ये स्त्रीयांनी सक्रीय  सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. भारतात जर बदल घडवायचा असेल तर स्त्रीयांचा सहभाग अनिवार्य असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे आश्वासन त्यांनी दिले. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या मागच्या बाजूला पाहाल तेव्हा त्यावर ’मेड इन राजस्थान’ असे लिहिलेले मला पाहायचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले.                 काही दिवसांपूर्वीच राहुल गांधीनी निवडणूका तोंडावर असणाऱया मध्यप्रदेशमध्ये रोड शो केला होता. राजस्थानमध्येही विधानसभेच्या निवडणूका होणार असून या सभेतून कॉंग्रेसने प्रचाराची रणधुमाळी सुरु केली आहे.  दोनच दिवसांपूर्वी अमित शाहांनी राजस्थानमधील किसान सभेत राहुल यांना खरीप व रबी मधील फरक तरी कळतो का असे म्हणत निशाणा साधला होता. यावर स्वत:ला देशाचे चौकीदार म्हणवणाऱया मोदींनाच चोर म्हणून राहुल यांनी जोरदार पलटवार केला असून निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमधील आरोप प्रत्यारोपांचे राजकारण चांगलेच तापले आहे.