Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

मुस्लिमांना दुय्यम दर्जाच्या वागणूकीविरूद्ध आयएएस अधिकारी शाह फैजल यांचा राजीनामा

काश्मीर/ दि/

                 यूपीएससी परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावणारे पहिले काश्मिरी ठरलेले, सन २००९च्या तुकडीतील आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी बुधवारी सेवेचा राजीनामा दिला. काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या हत्या आणि भारतीय मुस्लिमांना दिली जात असलेली दुय्यम वागणूक याच्या निषेधार्थ राजीनामा देत असल्याचे ३५ वर्षीय फैजल यांनी सांगितले.

                फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही घोषणा केली आहे. ‘काश्मीरमध्ये सातत्याने होणार्‍या हत्या, त्या रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून केले जाणारे अपुरे प्रयत्न, ब्राम्हणवादी गटांकडून २० कोटी भारतीय मुस्लिमांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, जम्मू-काश्मीर राजाच्या स्वतंत्र ओळखीवर हल्ले करून ती पुसण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आणि अति-राष्ट्रवादाच्या नावाखाली राज्यात पसरवली जाणारी असहिष्णुता आणि वैरभाव या विरोधात कार्य करण्यासाठी मी राजीनामा देत आहे,’ असे फैजल यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

राजकारणात प्रवेश?

                पुढे काय करणार हे फैजल यांनी गुलदस्त्यातच ठेवले असले, तरी ते राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. फैजल हे नॅशनल कॉन्फरन्सकडून बारामुल्ला मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जाते. फैजल यांच्या राजीनाम्याच्या बातमीनंतर ‘प्रशासकीय सेवेने जे गमावले, ती राजकारणाची कमाई ठरेल,’ असे ट्विट पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केले. हे विधान फैजल यांच्या राजकारण प्रवेशाचे सूचक मानले जात आहे.