Saturday, August 2 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

भीमा-कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांवर कारवाईचे गृहमंत्र्यांचे संकेत

मुंबई/दि/ दि. १ जानेवारी २०१८ रोजी पुण्यात घडलेल्या कोरेगाव-भीमा हिंसा प्रकरणाचा पुणे पोलिसांचा तपास संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे. नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा दिल्याने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचाराला एल्गार परिषद आणि त्यांचे नेते जबाबदार असल्याचा ठपका पुणे पोलिसांनी ठेवला होता. मात्र, राजकीय आकसातून पुणे पोलिसांनी कारवाया केल्याचा ठपका पुणे पोलिसांवर ठेवण्यात आल्याने अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी अडचणीत आल्याचे सांगण्यात येते.
१ जानेवारी २०१८ रोजी पुण्याजवळील कोरेगाव-भीमा येथे दोन गटांत झालेल्या वादानंतर हिंसाचार उफाळला होता. मात्र, या हिंसेला या घटनेच्या आदल्या दिवशी पुण्यातील शनिवारवाड्यावर पार पडलेल्या एल्गार परिषदच कारणीभूत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरूनच पुणे पोलिसांनी फरासखाना पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा नोंदवला होता. त्यावेळी रश्मी शुक्ला पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या, तर रवींद्र कदम हे सहपोलीस आयुक्त होते. याप्रकरणी पोलिसांनी राजकीय दबावातून कारवाई केल्याचा आरोप होत होता.
कोरेगाव-भीमा हिंसाप्रकरणी पुणे पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी यांच्या घरावर छापे टाकून रात्रीतूनच अटक केली होती. तसेच एल्गार परिषद व त्यात सहभागी झालेल्या नेत्यांचा मोदींच्या हत्येचा कट, काश्मीर आणि जेएनयूतील विद्यार्थ्यांच्या घोषणा व आंदोलन आदी घटनांशी जोडण्यात आला. आजही सुरेंद्र गडलिंग, सुधा भारद्वाज, शोमा सेन, वरवरा राव, अरुण परेरा, व्हर्नन गोन्सावलीस, महेश राऊत असे अनेक नेते, कार्यकर्ते गजाआड आहेत