एक गुन्हा माझ्याकडे का बघितले म्हणून आणि दुसरा गुन्हा मला का हाक मारलीस म्हणून लोअर इंदिरा नगरात तुफान हाणामारी
पुणे/दि/ प्रतिनिधी/
बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवस असो की रात्र, लाठी-काठी, कुर्हाड-कोयता, गुप्ती – तलवार आणि राहिलं तर मग गावठी कट्टा… दोन्ही गटात आणि कधी कधी आपआपसात गुन्हेगारांचे दे दणादण वाजणं नेहमीच झालं आहे. ठिकाणही नेहमीचीच आहेत. गुन्हेगार देखील ओळखीचेच. परंतु कायद्याचा धाक मात्र शून्य. कायदा आणि सुव्यवस्थेला कशा वाकुल्या दाखविल्या जातात हे बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील राड्यावरून सहज लक्षात येत.
पुरेशा प्रमाणात देशी विदेशी दारू आणि जोडीला सुरू असलेली हातभट्टीचे फुगे, मटका आणि जुगारांचे दिवस-रात्र सुरू असलेले डाव यामुळे तर दिन दूनी आणि रात चौगुणी होत असते. यातूनच मग नंतर एकमेकांशी खुनशी वाढत जातात.
रविवार आणि सोमवारी बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत हाणामारीच्या जबरी दुखापतीच्या दोन तीन घटना सहज घडल्या आहेत. त्यातील पहिली घटना रविवारी रात्री १० वाजता लोअर इंदिरानगर येथील गल्ली नं. १२ मध्ये घडली. अजिंक्य काळे वय १९ वर्षांचा युवकाने बिबवेवाडी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे, फिर्यादीत नमूद केले की, अजिंक्य काळे व त्याचा मित्र बालाजी हा त्याच्या राहत्या घराजवळ थांबला असता, तीन आरोपी (नाव नाही आणि अटकही नाही) अजिंक्य व बालाजी जवळ येवून तु माझ्याकडे का बघितले, इथुन जाताना आमच्याकडे बघायचे नाही, परत इथ यायच नाही तुला माहित आहे का मी कोण आहे असे म्हणून तीन आरोपींनी अजिंक्य व बालाजी याला लाथा- बुक्क्यांनी जबरी मारहाण केली. तसेच त्यांच्याकडे असलेल्या धारदार हत्याराने अजिंक्य काळे याच्या डोक्यात वार करून त्याला जखमी केले.
बिबेवाडी पोलीस स्टेशन मध्ये तीन इसमांवर भादवी ३२४, ३२३, ५०४, ३४ व म. पो. का. क. ३७ (१) १३५ आर्म ऍक्ट क ४(२५) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस फौजदार व्ही.एस. महाजन करीत आहेत.
तर दुसरी घटना गल्ली नं. १२ लोअर इंदिरानगर बिबवेवाडी येथे बरोबर १०च्याच सुमारास घडली आहे. यातील फिर्यादी विशाल भोसले वय ३५ वर्षे रा. लोअर इंदिरानगर. विशाल त्याच्या मित्रासह गल्ली नं. १२ लोअर इंदिरानगर येथे थांबला असता, विशालच्या घराजवळ राहणारा त्याचा तोंडओळखीचा मुलगा बालाजी साका याला हाक मारण्याच्या कारणावरून त्याच्या बरोबर असणारा त्याचा मित्र यातील अज्ञात आरोपी याने विशाल याला शिवीगाळ करून त्याच्याकडे असणार्या धारदार शस्त्राने विशाल याच्या डोक्यात वार करून जखमी केले.
बिबेवाडी पोलीस स्टेशन मध्ये एका इसमांवर भादवी ३२४, ३२३, ५०४, ३४ व म. पो. का. क. ३७ (१) १३५ आर्म ऍक्ट क ४(२५) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बांदल करीत आहेत.