Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

प्रस्थापित प्रसार माध्यमांकडून वंचित बहुजन समाजातील उमेदवारांच्या बातम्या देणं बंद ५०० लोकांच्या सभेचं उदोउदो… ५ लाखांच्या सभेची चार ओळीची बातमीही नाही… वाऽऽ रे माध्यमं

wanchit aghadi pune

पुणे/दि/ प्रतिनिधी/
भारतातील इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडीया हा जातीयवादी स्वरूपाचा होता आणि आहे यात तिळमात्र शंका घेण्याचे कारण राहिले नाही. संपूर्ण देशात लोकसभेच्या निवडणूका सुरू आहेत. महाराष्ट्रात कॉंग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी सेना या प्रस्थापित व घराणेशाहीच्या पक्षा व्यतिरिक्त या देशात इतरही तुल्यबळ पक्ष संघटना आहेत. परंतु जशी निवडणूक जाहीर झाली आहे, त्या दिवसांपासून प्रस्थापित पक्षांव्यतिरिक्त कोणत्याही पक्षांच्या प्रचार सभांची बातमी इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडीयातून दिसून येत नसल्याची बाब दिसून येत आहे. प्रस्थापित पक्षांच्या निवडणूक सभेला काही ठिकाणी अवघे पाचशे ते पाच हजारापर्यंत लोक हजर असतांना त्याची मोठ मोठ्याला कॉलमची बातमी केली जात आहे, परंतु वंचित बहुजन आघाडीच्या सभेला दोन लाख, पाच लाखांच्या सभा होत असतांना, त्यांची एक कॉलमचीही बातमी कुठे आढळुन येत नाही किंवा इलेक्ट्रॉनिक मिडीयावर देखील कोणत्याही बातमीचे वृत्तांकन होताना दिसत नाही. थोडक्यात प्रस्थापित जातीयवादी वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक मिडीयाने बहुजन समाजातील पक्षाच्या प्रचार सभांचे वृत्तांकनावर अलिखित बंदी घातली आहे की काय अशी शंका येत आहे.

महाराष्ट्रात आज घडीस, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी, भाजपा- सेना आघाडी व वंचित बहुजन आघाडी यांची तिहेरी लढत दिसत आहे. कित्येक मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा दबदबा असल्याचे बोलले जात आहे. तसेच काही मतदारसंघात वंचित आघाडीमुळे प्रस्थापित पक्षांतील दिग्गजांना घरचा रस्ता मिळणार असल्याचा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे घाबरलेल्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी मोठ्या ताकदीनिशी वंचित बहुजन आघाडीच्या बातम्या बाहेर येणार नाहीत यासाठी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे.
काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी दुरंगी लढती
वंचित बहुजन आघाडीच्या नावाने बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात छोट्या मोठ्या राजकीय, गैरराजकीय संघटनांची ताकद निर्माण करून, लोकसभेच्या निवडणूकीला सामोरे गेले आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी व भाजपा-सेना, ह्या पक्षांना घराणेशाहीने ग्रासले आहे. तसेच मागील कित्येक वर्षातील राजवट ही घराणेशाहीची आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडे सर्वांचा कल वाढला आहे. जनतेचा कौल नेमका कुणाकडे आहे याची चाचपणी राजकीय विश्‍लेषक व तज्ज्ञ मंडळी ही नेहमी करीत असतात. यावेळेस राज्यातील लोकसभेच्या बहुतांश मतदारसंघात काही ठिकाणी दुहेरी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत.
यामध्ये प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडी विरूद्ध भाजपा सेना आघाडी तर कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडी विरूद्ध वंचित बहुजन आघाडी असा सामना रंगला आहे. तर काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजपा सेना आघाडी असा तिहेरी सामना पहावयास मिळत आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सुप्रिया सुळे, भाजपा सेनेच्या कुल तर वंचित बहुजन आघाडीचे नवनाथ पडळकर अशी तिहेरी लढत सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीचे पडळकर यांचे पारडे जड असल्याने निवडणूकीचा फॉर्म भरल्याच्या दिवसापासून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. कुल प्रचारात कुठेही दिसत नाहीत तरीही प्रसार माध्यमांकडूनच कुल यांचा प्रचार शिगेला पोहोचविण्यात कमालिची पळापळ सुरू ठेवली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी, भाजपा सेेना आघाडीचे गिरीष बापट तर वंचित आघाडीचे अनिल जाधव अशी सरळ तिरंगी लढत असतांना, पुण्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयाने मात्र जोशी व बापट यांच्याच नावाचा गजर सुरू ठेवला आहे. लढत तिरंगी असतांना, ती लढत दुरंगी असल्याचे चित्र पुण्यात भासविले जात आहे. वास्तविक पाहता, अनिल जाधव यांच्या वंचित बहुजन आघाडीने प्रचारात आघाडी घेतल्याने धसका घेतलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तुम्ही बारामती- मावळ व पुण्यात बरेच साटलोटं केले असल्याचे समजतय. त्यामुळे वंचित आघाडीच्या बातम्या प्रसारित होवू नये याची काटेकारपणे काळजी घेतली जात आहे.
देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका सुरू आहेत. निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडीया या दोन्ही वृत्तसंस्थाना पेड न्यूजबाबत मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत. तथापी महाराष्ट्रातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाची कपटनिती इतकी भयंकर आहे की, सर्वच मार्गदर्शक सुचनांमधून पळवाटा कशा काढायच्या यासाठी मोठ मोठ्याला मानधनावर यांच्याकडे तज्ज्ञ मंडळी दिवस-रात्र काम करीत आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रिंट माध्यम हे नेहमीच प्रस्थापितांच्या बाजूने उभे राहिले आहे. मुकनायक, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत व तत्कालिन बहुजन समाजाच्या वृत्तपत्रांतून याबाबतचे वृत्त प्रसारित झाले आहे. त्यामुळे हे बहुजन समाजासाठी नवे नाही.
कार्यकर्त्यांनो खच्ची होण्याचे काही कारण नाही –
बहुजन समाजाच्या बातम्या प्रसारित न करणं ही तर प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयाची जुनी खेळी आहे. मागच्या २५/३० वर्षापूर्वी आम्ही राजकीय कार्यकर्ते म्हणून काम करीत असतांना, प्रिंट मिडीयाने आमच्या केवळ फाटाफुटीच्या आणि आगलावीच्या बातम्या प्रसारित केल्या आहेत. त्या काळात इलेक्ट्रॉनिक मिडीया अस्तित्वात नव्हता. परंतु हल्ली मागील काही वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे प्रस्थ वाढले आहे.
तो मिडीया देखील प्रस्थापित प्रिंट मिडीया जुळा भाऊ असल्याने, या माध्यमांतून तुमच्या राजकीय पक्षांच्या बातम्या आल्या नाहीत तर घाबरू नका. तुमच्या बातम्या येत नाहीत याचा अर्थ तुमचा ट्रॅक बरोबर आहे. तुम्ही यशाच्या अगदी जवळ आहात. इथल्या दलित, आदिवासी,मुस्लिम, ख्रिश्‍चन अल्पसंख्याक वर्गातील वंचित समाज एकत्र येवून प्रस्थापितांबरोबर लढत देत आहे. त्याबरोबरच रहा. तुम्ही एक रहा. सर्व तुमच्या बरोबर येतील. आपल्यातील काही कानफाट्या, जळफाट्या, आगलाव्यांपासून सावध रहा. असे आवाहन आंबेडकरी चळवळीतील काही तज्ज्ञ मंडळींनी केले आहे.
महाराष्ट्रात लख्ख प्रकाश –
राज्यातील शोषित,पिडीत, वंचित व सर्वहारा वर्गातील सामाजिक, राजकीय व गैरराजकीय संघटनांनी एकत्र येवून, भांडवलशाही, घराणेशाहीविरूद्ध वंचितांची ताकद निर्माण केली आहे. त्याचे नेतृत्व आज बाळासाहेब आंबेडकर करीत आहेत. आजघडीस राज्यात कॉंग्रेस आघाडी, भाजपासेना आघाडी व वंचित बहुजन आघाडी असा तिरंगा सामना सुरू आहे. भाजपा-सेना आघाडी विरूद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असा राज्यात कुठेही सामना नाहीच. मुळातच कॉंग्रेस व राष्ट्रवादी मधील बहुतांश घराणेशाहीदार, भांडवलदार यांनी भाजपा सेना आघाडीत प्रवेश केला आहे. त्यामुळे यांची लढत आपआपसात नसुन वंचित आघाडीबरोबर आहे यात शंकाच नाहीये. या निवडणूकीनंतर राज्यात लख्ख प्रकाश पडणारत यात शंहा नाही.