पुण्याचे पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी पदभार स्वीकारल्या दिवसापासूनच शहरातील हुक्का पार्लर, मटका जुगार अड्ड्यांसह अवैध धंद्यावर धडाधड कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. पुणे पोलीस आयुक्तालय आणि शहर पोलीसांनी मागील १०० वर्षात जे काम केले नाही, ते काम एकट्या बर्गे यांनी एका दिवसात करून दाखविल्याने पुण्यातील प्रसार माध्यमे, जनसंपर्क विभागासह पुणे शहर पोलीस आयुक्तालय चक्रावुन गेले आहे. त्यामुळे सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, ११ पोलीस उपायुक्त, चारपाच डझन सहाय्यक आयुक्तांसह, १२ हजार पोलीस कर्मचारी हे निव्वळ नामधारी असून सध्या नियुक्तीवरील या वरीष्ठ अधिकार्यांची तातडीने बदली करून, त्यांची गरजु जिल्ह्यात बदली करावी व ती पदे रिक्त करण्यात यावीत. आयुक्तालयाची सर्व कामे एकटे भानुप्रताप बर्गे करण्यास सक्षम ठरल्याने, पोलीस ठाणी देखील कामचुकार ठरली आहेत. श्री. बर्गे यांच्या सारखे सक्षम व परिपूर्ण अधिकारी पुणे शहराला लाभल्यामुळे १२/१५ हजार पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या वेतनावर उगाच खर्च करण्यापेक्षा एकट्या बर्गे सारख्या अधिकार्यांना पाठबळ देण्याची गरज असल्याचे मतही पुणे शहरातील व्यक्त केले जात आहे.
श्री. बर्गे यांनी पदभार स्वीकारताच, त्यांनी कोंढवा, मुंढवा, कोरेगाव पार्क पोलीस ठाणी हद्दीत व कल्याणी नगर, विमानगर या परिसरातील हुक्का पार्लरवर धडक कारवाई केली. पंचतारांकित हॉटेल्स, पब, अतिशय महागडे हुक्का पार्लर यामध्ये येणार्या ६ ते ७ हजार नाईट लाईफ जीवन जगणार्या तरूणाईवर धडक कारवाई केली आहे. मात्र हे धंदे चालविणार्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. ही कारवाई फक्त पुण्यातील तीन वर्तमान पत्रांच्या बातमीत आढळुन येत असली तरी कोणत्या पोलीस ठाण्यात कुणावर कोणते गुन्हे दाखल आहेत. किती प्रकरणे न्यायालयात गेली आहेत, याची मात्र मागील आठवड्यापासून खानेसुमारी सुरू असतांना, एकही कागद हाती आला नाही. त्यामुळे हुक्का ओढणे – जुगार खेळणे हा दंडनिय अपराध आहे, परंतु हुक्का पार्लर चालविणे, जुगार अड्डा चालविणे, क्लब चालविणे हे मात्र बर्गेंच्या दृष्टीने गुन्हा नाहीये. त्यांचे आजपर्यंतचे वाढदिवसाचे कार्यक्रम पाहिले तर त्यांना नेमकं कोण शुभेच्छा देतय हे नव्याने सांगण्याची गरज नाहीये. आयुक्तालयाला सर्व समजतं.