Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे पोलीस आयुक्तालयाचा सेवानिवृत्त पोलीसांना गुगलव्दारे निरोप समारंभ तर पदोन्नती दिलेल्यांचा सत्कार

पुणे/दि/ प्रतिनिधी/
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे संपूर्ण जग एकमेकांपासून अंतर ठेवून कार्यरत आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयाने देखील पुणे शहर पोलीस दलातून सेवानिवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना गुगलव्दारे निरोप समारंभ आयोजित करण्यात आला तर पदोन्नती मिळालेल्या कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला आहे. याबाबत प्रसारित करण्यात आलेल्या वृत्तात नमूद केले आहे की,
कोरोना विषाणू संसर्ग बंदोबस्त काळातही स्वतःच्या वयाची, प्रकृतीची पर्वा न करता, निर्भय, खंबीर योद्धयाप्रमाणे अखेरच्या क्षणापर्यंत कर्तव्य बजावून पुणे शहर पोलीस दलातून एक सहायक पोलीस आयुक्त, ३ पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उप निरीक्षक व ३० पोलीस कर्मचारी हे सेवानिवृत्त झाले आहेत.
दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालयात ७३ पोलीस हवालदार यांना सहायक पोलीस फौजदार या पदावर, ७७ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार या पदावर तर ८१ पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
सध्या पुणे शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने सेवानिवृत्त व पदोन्नती कार्यक्रमाचे प्रत्यक्षदर्शी आयोजन न करता गुगुल मिट व्दारे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच पदोन्नतीधारक कर्मचारी यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. या कार्यक्रमास संबंधित पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांचे कुटूंबियदेखील सहभागी झाले होते.
सेवानिवृत्त होणार्‍या पोलीस अंमलदारापैकी खडकी पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक भागवत मिसाळ, सहायक पोलीस फौजदार श्री. चिपाडे, पोलीस मुख्यालय येथील सहा. पो. फौजदार शिंदे, बिनतारी संदेश विभागातील श्री. दरडे व प्रशासकीय अधिकारी श्री. अकोएसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करतांना पोलीस दलातील आपल्या प्रदीर्घ सेवेतील प्रमुख घटना, संस्मरणिय अनुभव मांडले.
सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी सेवानिवृत्त होणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करतांना आपण आपले कर्तव्य बजावित असतांना, कोणत्याही श्रेयाची अपेक्षा ठेवलेली नाही. पोलीस सेवेमध्ये असतांना आपण आपल्या सर्व वेदना विसरून कर्तव्याचा हा प्रवास केलेला आहे. आज जरी आपण पोलीस दलातून सेवानिवसृत्त होेत असला तरी आपण कायम पोलीस दलाचा एक घटक म्हणून समाजात वावरणार आहात. पदोन्नतीधारक कर्मचारी यांना मार्गदर्शन करतांना नव्या जबाबदारीची जाणिव करून दिली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पदोन्नतीधारक कर्मचारी यांना मार्गदर्शन करतांना नवीन कामे आपल्याकडे दिली जाणार आहेत, ती जबाबदारीने पार पाडणे आवश्यक ओ. तसेच सेवानिवृत्त होणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना व त्यांचे कुटूंबियांचे आभार मानले. कुटूंबाच्या भक्कम पाठींब्यामुळेच हे कर्मचारी त्यांचे कर्तव्य यशस्वीपणे पार पाडू शकले, त्यांच्या कर्तव्यामध्ये कुटूंबांचा देशखील महत्वाचा वाटा आहे अशी भावना व्यक्त केली. सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य सुखा समाधानाचे व आरोग्यदायी जावो अशी मनोकामना व्यक्त केली.
कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन उप आयुक्त श्री. वीरेंद्र मिश्र यांनी केले. या कार्यक्रमास पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सह पोलीास आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, सर्व अपर पोलीस आयुक्त, सर्व पोलीस उप आयुक्त, सर्व सहायक पोलीस आयुक्त, सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पदोन्नतीधारक पोलीस अंमलदार, सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय ऑनलाईन उपस्थित होते. अशी माहिती मानव संसाधन विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांनी दिली आहे.