Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

कोट्यवधी रुपयांचा बांधकाम घोटाळा लपविण्यासाठी पोलीसांनी, पुणे पालिका आयुक्तांकडे पाठविलेले पत्र गहाळ, बांधकाम झोन क्र. ७ च्या अभियंता आणि कर्मचार्‍यांची दिमाखदार कामगिरी

पुणे/दि/ प्रतिनिधी/
कोरोना महामारीचा कहर आणि मनपा कर्मचार्‍यांच्या उपद्रवामुळे, पुणे महानगरपालिका आर्थिक संकटात सापडली आहे. चार महिने लॉकडाऊन आणि चार महिने अनलॉकडाऊनच्या आठमाही सत्रात, शासन आणि महापालिकांचे दिवाळे निघाले आहे. आवश्यक तो महसुल प्राप्त होत नसल्यामुळे विकास कामांना निधी अपुरा पडत आहे. त्यामुळे आता शिमग्यापर्यंत थांबावे लागणार असले तरी, पुणे महापालिकेतील कर्मचार्‍यांच्या उपद्रवामुळे दिवाळीच्या तोंडावरच महापालिकेत शिमगा साजरा करण्याची वेळ आली आहे.


पुणे महापालिकेला वेगवेगळ्या स्तरातून महसूल प्राप्त होतो. त्यापैकी बांधकाम विभागाकडून बर्‍यापैकी महसुल जमा होतो. बांधकाम विभागाने चालु वर्षात निच्चांकी उत्पन्न मिळवुुन महापालिकेला डबाघाईस आणण्यास मदत केली आहे. बांधकाम विभागाचा चुलत भावासारख्या टॅक्स विभागाने देखील अनेक योजना आणून देखील महसुल जमा करण्यात अपयशी ठरत आहेत.
दरम्यान पुणे महापालिकेतील बांधकाम विभागाने घोटाळ्यांची मालिका सुरू ठेवली आहे. ही पोलखोल टॅक्स विभागानेच केली आहे. बांधकाम विभागातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याबाबतचे एक पत्र शिवाजीनगर पोलीस स्टेशनने, पुणे महापालिका आयुक्तांकडे चौकशीसाठी पाठविण्यात आले होते. आयुक्त पुणे महापालिका यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे कार्यालयीन पत्र जा.क्र. ३९३९/२०२० दि. ११/६/२०२० रोजी देणेत आले असल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस स्टेशनने यांनी दि. १७/१०/२०२० रोजी अर्जदारांना कळविले आहे. आयुक्त पुणे महापालिका यांचेकडील आवक क्रमांक – महा आयु/३४४४ दि. ११/६/२०२० आहे. आयुक्त कार्यालयाने अतिरिक्त महाालिका आयुक्त (ज), सामान्य प्रशासन विभाग व शहर अभियंता पुणे महापालिका यांना आयुक्त कार्यालयाकडील जावक क्र. ३५२१ दि. १५/६/२०२० व्दारे पाठविणेत आले.


अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी त्यांचे जावक क्रमांक – २४४५ दि. १८/६/२०२० रोजी सामान्य प्रशासन विभाग/ सेवक वर्ग यांना पाठविणेत आले आहे. दरम्यान सेवक वर्ग विभाग यांनी त्यांचेकडील आवक क्र. २४६९ दि. १८/६/२०२० नुसार प्रशासन कार्यासन क्र. ७ यांचेकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविणेत आले होते. सेवक वर्ग विभाग यांचेकडील प्रशासन कार्यासन क्र. ७ यांनी शहर अभियंता कार्यालय पुणे महापालिका यांना १७४६ दि. १८/६/२०२० रोजी पाठविणेत आले. शहर अभियंता कार्यालय यांचेकडील आवक क्रमांक – १५०३ दि. २२/६/२०२० नुसार हे पत्र बांधकाम विकास विभाग झोन क्र. ७ यांचेकडे त्यांचे कार्यालयीन पत्र जावक क्रमांक – १७६७ दि. २३/६/२०२० रोजी पाठविणेत आले. तथापी उपरोक्त पत्रावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती घेणेसाठी अर्जदार गेले असता, उपरोक्त क्रमांकाचे पत्र बांधकाम विकास विभाग झोन क्र. ७ यांचे रजिस्टर व रेकॉर्डवर नसल्याचे सांगण्यात आले आहे.
आवक जावक बारनिशी यांनी हे जाणिवपूर्वक रजिस्टरमध्ये नोंद न घेता गहाळ केले आहे. तसेच ही बाब वरीष्ठांच्या निदर्शनास येवू नये याची पुरेपूर दक्षता घेतली असल्याचे दिसून येत आहे. आवक जावक बारनिशी मध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे अभियंता व बांधकाम व्यावसायिक यांचेशी संबंध असल्याकारणामुळेच आयुक्तांकडील पत्र रजिस्टरमध्ये नोंद न घेता गहाळ केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कर्मचार्‍यांनी पुरेपूर सेवाशिस्तांचा भंग केला असून त्यांनी हा प्रकार का केला असावा याबाबत चौकशी होणे आवश्यक असल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे.


शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पत्र गहाळ का केले असावे –


पोलीस उपायुक्त परिमंडळ १ यांचे पत्र शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी कोणतीही चौकशी न करता थेट पुणे महापालिकेशी निगडीत असल्याने पाठविण्यात आले असले तरी हे पत्र गहाळ करण्यात नेमका कुणाचा हात आहे. त्यांनी या पत्रावर चौकशी का होवू दिली नाही. कोणत्या बांधकाम प्रकल्पाचं गुपित यात दडले आहे, या सारखे अनेक प्रश्‍न असून, येत्या काही काळात हे उजेडात येण्याची शक्यता आहे. परंतु आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त कार्यालयाने चौकशीसाठी पाठविलेले पत्र अशा प्रकारे गहाळ होत असेल तर बांधकाम विभागात नेमकं काय चाललय हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाहीच.