नाशिक/दि/
ज्या प्रमाणे कंगनाची भेट घेतलात, त्याप्रमाणे कांदा उत्पादक शेतक-यांचीही भेट घ्या, अशी मागणी आता शेतक-यांकडून केली जात आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी संवेदनशील मनाचे आहेत. न्यायासाठी दाद मागणा-यास ते नक्की भेट देतात, असं शेतकरी संघर्ष संघटनेने म्हटलं आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी यासंदर्भात निवेदन आणि सोशल मीडियातील एका व्हिडीओद्वारे आवाहन केले. १४ सप्टेंबरला अचानक केंद्राने कांदा निर्यातबंदीची भूमिका घेतली. या संदर्भात शेतक-यांना कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एका सैनिकास भेट दिली होती. इतकेच नव्हे तर प्रसिद्ध सिनेतारका कंगना राणौत हिचे मुंबईतील कार्यालय पालिकेने तोडल्याच्या तक्रारीवर तिलाही भेटले होते.
इथे कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाने तर राज्यात लाखो शेतक-यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत, या शेतक-यांसाठी केंद्राकडे राज्यपाल मध्यस्थी करून शुक्रवारी आम्हाला ते नक्कीच भेट देतील’, अशा शब्दात शेतकरी संघर्ष संघटनेने कांदाप्रश्नी राज्यपालांच्या भेटीची मागणी केली आहे.सरकारने स्वत:च बनविलेल्या नियमनमुक्तीच्या कायद्यास कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाने फाटा दिला आहे. तसेच शेतक-यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. यामुळे शेतक-यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अन्यायाची भावना असलेले अनेक लोक राज्यपाल महोदयांची भेट घेतात. राज्यपालदेखील संवेदनशील मनाचे आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटी देऊन त्यांनी त्यांच्या अन्याय सोडवण्यासाठी प्रयत्नही केले आहेत, असंही वडघुले म्हणाले आहेत.