Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

उध्दवा.. अजब तुझा कारभार तक्रारी खरीप विमा भरपाईच्या, सेनेचा मोर्चा रब्बीच्या कंपनीवर!

नाशिक/दि/ खासगी विमा कंपन्यांना ‘ठाकरी’ इशारा देत राज्यातील शेतकर्यांच्या हिताचा कळवळा दाखवणार्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचा मोर्चा ‘आग सोमेश्‍वरी अन् बंब रामेश्‍वरी’ ठरला आहे.

       ‘मातोश्री’पासून सोयीच्या अंतरावर असलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील ‘भारती एक्सा जनरल इन्शुरन्स’ या खासगी विमा कंपनीच्या कार्यालयावर बुधवारी ठाकरेंनी मोर्चा काढून १५ दिवसांत शेतकर्यांचे पैसे न दिल्यास पेकाटात लाथ घालण्याचा इशारा दिला आहे. परंंतु पीक विमा योजनेतील खरिपाच्या हंगामातील नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या राज्यातील शेतकर्यांच्या सर्वाधिक तक्रारी असताना शिवसेनेने मोर्चा काढलेली कंपनी फक्त रब्बी हंगामासाठी असल्याचे पुढे आले आहे.

       परभणीसह सहा जिल्ह्यांतील शेतकर्यांना पीक विमा न मिळाल्याच्या तक्रारींचे निवेदन उध्दव ठाकरेंनी विमा कंपनीला दिले. मात्र, परभणीच नव्हे, तर राज्यातील शेतकर्यांच्या बहुतांश तक्रारी या खरीप हंगामातील नुकसान भरपाईच्या आहेत. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात पेरण्यांनंतर ७ आठवडे पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांचे शेतकर्यांचे सर्वाधिक नुकसान झाले होते. मात्र, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत प्रीमियम भरूनही त्यांना भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकर्यांमध्ये या खासगी कंपन्यांविरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या खरीप योजनेतही भारती एक्सा कंपनीचा समावेश नाहीच

       भारती एक्सा ही रब्बी हंगामातील विमा कंपनी असल्याने यंदाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१९ अंतर्गत तिचा समावेशच करण्यात आलेला नाही. २२ मे २०१९ रोजी कृषी विभागातर्फे काढण्यात आलेल्या आदेशात करार केलेल्या कंपन्यांची नावे देण्यात आली आहेत. त्यानुसार ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंंडिया लिमिटेड आणि बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याच दोन कंपन्यांचा समावेश आहे.