Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

आगामी काळात उजव्या विचारसरणीचा अधिक धोका -मा. पोलीस महासंचालक

पुणे/दि/ प्रतिनिधी/

                डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यासारख्या विचारवंतांच्या हत्या करून त्यांचे विचार संपणार नाहीत. अशाप्रकारची विचारधारा बाळगणेच चुकीचे आहे. कारण प्रत्येक प्रश्न बंदुकीने सुटत नाहीत. या विचारवंतांची हत्या करणारे सापडले तरी उजव्या विचारसरणीचा धोका काही संपणार नाही तर तो आगामी काळात आणखी वाढेल. त्यामुळे सर्वसामान्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत निवृत्त पोलीस महासंचालक एस.एस.विर्क यांनी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आगामी काळात सायबर क्राईमचे मोठे आव्हान

                आगामी काळात देशासमोर सायबर क्राईमचे मोठे आव्हान असणार आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वी कॉसमॉस बँकेवर पडलेल्या सायबर दरोड्याचे उदाहरण देताना ते म्हणाले, दाऊद इब्राहिम सारखा गुंड धमकी देऊन १० कोटी रुपयांची फसवणूक करू शकतो. पण त्याच वेळी सायबर हल्ल्याद्वारे आरोपी इतर देशात बसून काही मिनिटांत कोट्यावधी रुपये लुटू शकतात. त्यामुळे आगामी काळात सायबर क्राईमचेच मोठे आव्हान आपल्यासमोर असणार आहे. त्यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

सुधा भारद्वाज मावनाधिकार कार्यकर्त्या, त्या नाहीत नक्षलवादी

                नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी देशभरात विविध ठिकाणी छापेमारी करत पाच जणांना अटक केली होती. याविषयी बोलताना ते म्हणाले, नक्षलवादी कारवायात सहभाग असणे वेगळे आणि नक्षलवाद्यांचे सहानूभुतीदार असणे वेगळे. सुधा भारद्वाज यांना मी ओळखतो, त्या नक्षलवादी नाहीत तर मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. परंतु पोलिसांनी कारवाई केली म्हणजे, त्यांच्याकडे पुरावे असतील असे सांगत पोलिसांचीही बाजू त्यांनी घेतली.